ख्‍यातकीर्त खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना पहिला ‘ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप’ जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 11 Months ago
जयंत नारळीकर पुरस्कार स्वीकारताना
जयंत नारळीकर पुरस्कार स्वीकारताना

 

पुण्यातील आयुका चे संस्थापक संचालक आणि ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ प्रा. जयंत विष्णू नारळीकर हे पहिल्या ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराचे सर्वोत्कृष्ट मानकरी आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला आयआयटी इंदूर येथे झालेल्या एएसआय च्या 41 व्या बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असला, तरी प्रा. नारळीकर तो स्वीकारण्यासाठी प्रवास करू शकले नाहीत. एएसआयचे अध्यक्ष प्रा. दीपंकर बॅनर्जी हे स्वतः प्रा. नारळीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी पुण्यात आले होते.

 
या प्रसंगी प्रा. बॅनर्जी म्हणाले, " कार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भिन्नता असली, तरी प्रा. स्वरूप आणि प्रा. नारळीकर या दोघांनीही खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्राच्या वाढीसाठी देशात आदर्श संस्था उभारून आणि तरुण पिढीच्या प्रशिक्षणासाठी प्रचंड परिश्रम  घेऊन अमूल्य योगदान दिले. हे दोघे महान संशोधकांनी   भावी अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत  कार्य केले आहे, करत आहेत.
आमचे लाडके शिक्षक - जयंत सर, यांना हा पुरस्कार सुपूर्द करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.” एनसीआरए मधील सहकाऱ्यांनी देखील प्रा. नारळीकर यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या संस्थापकाच्या नावे असलेला हा पुरस्कार नजीकच्या आयुका संस्थेचे संस्थापक प्रा. नारळीकर यांना प्रदान करण्यात आल्याचा त्यांना आनंद आहे.
 
आयुकाचे  संचालक आर. श्रीआनंद म्हणाले, "प्रा. जयंत नारळीकर यांना वर्ष 2022 साठी भारतीय खगोलशास्त्र संस्थेच्या गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराने ‘आयुका’मध्‍येच सन्मानित करण्यात आले, याचा  आम्हाला  आनंद झाला आहे. हा खरोखरच एक खास  क्षण आहे. एका पिढीतील सर्वात प्रतिभावान साधन निर्मात्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार त्याच पिढीतील सर्वात प्रेरणादायी विश्वशास्त्रज्ञाला देण्यात आला आहे.”
 
प्रा. नारळीकर यांनी आपले जीवन ब्रह्माण्डाच्या अभ्यासासाठी समर्पित केले आहे, नारळीकर-हॉयल सिद्धांतासह खगोल भौतिकशास्त्राच्या विविध पैलूंमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.त्यांनी अनेक पिढ्यांना त्यांच्या लोकप्रिय संवाद कार्यक्रमांतून, वेगवेगळ्या ध्‍वनिचित्रफिती, माहितीपट  आणि पुस्तकातूर प्रोत्साहन दिले आहे.
 
प्रा. नारळीकर हे भारतात विश्वउत्पत्‍ती शास्त्रामध्‍ये  संशोधन सुरू करण्‍यात  अग्रणी  होते. त्यांनी भारतीय विद्यापीठांमध्ये खगोलशास्त्र अभ्यासक्रम आणि संशोधनाचा प्रसार  करण्यासाठी एक समर्पित केंद्र तयार करण्याची कल्पना मांडली. त्यांचे हे स्वप्न ‘आयुका’च्‍या  स्‍थापनेच्या रूपातून त्यांनी आपल्‍या परिश्रमाने साकार केले.  नारळीकर सर, हे   अनेक दशके होतकरू युवकांसाठी  प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. विज्ञान आणि प्रसारातला  त्यांचा सातत्यपूर्ण  सक्रिय सहभाग आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे
 
वर्ष 2022 मध्ये, सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना, भारतीय खगोलशास्त्र संस्थेने (एएसआय) भारतातील खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र क्षेत्रातल्या  त्यांच्या कारकिर्दीतील योगदानाबद्दल प्रख्यात भारतीय खगोलशास्त्रज्ञांना गौरवण्यासाठी गोविंद स्वरूप जीवनगौरव पुरस्काराची स्थापना केली. गोविंद स्वरूप (1929-2020) यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव या  पुरस्काराला देण्यात आले आहे. प्रा. स्वरूप यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे संस्थापक मानले जाते. भारतीय पर्यावरणासाठी अनुकूल  नाविन्यपूर्ण, कमी खर्चिक  कल्पनांचा वापर करून त्यांनी उटी रेडिओ दुर्बीण  आणि जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ दुर्बिणीच्या निर्मितीची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली. ते   दूरदर्शी होते आणि स्क्वेअर किलोमीटर अॅरे (SKA) च्या प्रारंभिक सर्वात मजबूत समर्थकांपैकी एक होते. ते नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स , पुणेचे संस्थापक संचालक होते.  भौतिकशास्त्रज्ञ प्रा . विष्‍णू  भिडे यांच्यासमवेत त्यांनी विकसित आणि प्रस्तावित केलेल्या विज्ञान शिक्षण संस्थांची रूपरेषा भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या  रूपाने प्रत्यक्षात आली आहे .आता हीच संशोधन कार्यपद्धती देशभरात स्थापन झाली आहे. पहिल्या जीवन गौरव पुरस्काराप्रित्यर्थ  प्रशस्तिपत्र , सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देवून डॉ.जयंत नारळीकर यांचा गौरव केला.भारतीय खगोलशास्त्र संस्थेने या पुरस्कारासाठी प्रा.स्वरूप यांच्या कुटुंबाने दिलेल्या उदार योगदानाची दखल घेतली आहे.