जुन्या स्वप्नांसहच... नव्या संसद भवनच्या व्हिडीओला शाहरुख खानचा आवाज

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 11 Months ago
शाहरुख खान व पंतप्रधान नरेंद्र मोदी
शाहरुख खान व पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

देशाच्या नव्या संसद भवनचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा काल २८ मे रोजी दिल्लीत पार पडले. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या नव्या संसद भवनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. यानिमित्ताने पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करणाऱ्या स्टार्सची झुंबड उडाली आहे. अक्षय कुमार, शाहरुख खान, हेमा मालिनी, रजनीकांत, इलैयाराजा यांसारख्या सेलिब्रिटींना ट्विट करून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. तर, नुकतेच अभिनेता शाहरुख खाननेदेखील नव्या संसद भवनचा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहे. या व्हिडीओला त्याने व्हॉईस ओव्हर दिले आहे.

किंग खान व्हॉईस ओव्हरमध्ये काय म्हणाला?
दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खान म्हणाला, “भारताचे नवीन संसद भवन आमच्या आशांचे नवीन घर आहे. आपल्या संविधानाची काळजी घेणाऱ्यांसाठी एक असे घर जिथे १४० कोटी भारतीय एक कुटुंब असेल. हे नवीन घर इतकं मोठं असावं की त्यात देशातील प्रत्येक प्रांत, राज्य, गाव, शहर यांसाठी जागा असेल. या घराचे हात इतके लांब असावेत की देशातील प्रत्येक जाती-वर्णातील प्रत्येक धर्मावर प्रेम करता येईल. त्याचे डोळे इतके खोल असावेत की ते देशातील प्रत्येक नागरिकाला पाहू शकेल. त्यांना तपासू शकेल, त्यांच्या समस्या ओळखू शकेल. येथे ‘सत्यमेव जयते’ हे केवळ घोषणेपुरते मर्यादित नसून त्यावर प्रत्येकाला विश्वास असेल. इथे हत्ती-घोडा, सिंह आणि अशोक चक्राचा स्तंभ हा लोगो नसून तो एक इतिहास असेल.”

 

शाहरुखने हा व्हिडीओ पोस्ट करत त्याला कॅप्शन देत लिहिले आहे कि, “आपल्या संविधानाचे समर्थन करणारे, या महान देशाच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करणारे आणि त्यातील वयक्तिक लोकांच्या विविधतेचे रक्षण करण्यांसाठी नरेंद्र मोदींनी किती सुंदर घराची निर्मिती केली आहे. नवीन भारतासाठी नवीन संसद भवन, भारताच्या गौरवासाठी जुन्या स्वप्नांसह. जय हिंद! माझे संसद भवन माझा अभिमान.”


शाहरुख खानच्या या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. ती अशी, “फारच सुंदर. नवीन संसद भवन हे लोकशाहीची ताकद आणि प्रगतीचे प्रतीक आहे. ते परंपरेला आधुनिकतेशी जोडलेले असेल.” 

 

९७१ कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या नवीन संसद भवनात ८८८ लोकसभा आणि ३०० राज्यसभा सदस्यांसाठी जागा असेल. लोकसभेची रचना संयुक्त अधिवेशनासाठी केली गेली आहे.