ऑस्कर पुरस्कारात भारताने मारली बाजी; पटकावले दोन पुरस्कार

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाणे सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत
RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाणे सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत

 

आजची सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खुप आनंदाची आहे. त्याच कारणही तसच आहे. गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय या बातमीची वाट पहात होते. भारताने ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये बाजी मारली आहे. यावेळी भारतातून तीन चित्रपटांनी ऑस्करसाठी दावेदारी सादर केली होती, त्यापैकी दोन चित्रपट यांनी ऑक्सर जिंकले आहेत.

 

एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत तर द एलिफंट व्हिस्पर्सला सर्वोत्कृष्ट लघुपट प्रकारात पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्तानं देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. तर सेलेब्सकडूनही विजेत्यांचं अभिनंदन करणं सुरु आहे.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ट्विट करत या अभिमानास्पद क्षणाबद्दल देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिलयं, ‘नाटू नाटू’ची लोकप्रियता जागतिक आहे. पुढील अनेक वर्षे स्मरणात राहणारे हे गाणे आहे. संगीतकार एम एम कीरावानी, गीतकार चंद्रबोस यांचे आणि या प्रतिष्ठित सन्मानासाठी संपूर्ण टीम अभिनंदन अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

देशाचे माजी उपराष्ट्रपती आणि दिग्गज नेते एम व्यंकय्या नायडू यांनीही संघाचे अभिनंदन केले. चित्रपटाच्या गाण्याचे पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले, ऑस्कर जिंकून इतिहास रचल्याबद्दल संगीतकार एम एम कीरावानी, गीतकार चंद्रबोस, दिग्दर्शक राजामौली आणि #RRR टीमचे खूप खूप अभिनंदन.

 

साऊथ स्टार आणि बाहुबली फेम राणा दग्गुबती याने पुरस्कार सोहळ्यातील व्हिडिओ शेअर केला असून पुरस्कार जिंकल्याबद्दल चित्रपटाचं अभिनंदन केले आहे.

यासोबतच गुनीत मोंगा यांनाही पुरस्कार मिळाला आहे. या भारतीय चित्रपट निर्मात्या असून त्यांनी बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली आहे. इतकेच नाही तर त्यांच्या बऱ्याच चित्रपटांना या आधीही जागतिक पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत.  "द एलिफंट व्हिस्परर्स" ही लोकांची कथा आहे, जे पिढ्यानपिढ्या हत्तींसोबत काम करत आहेत आणि त्यांना जंगलाच्या गरजांची जाणीव आहे, असे गुनित यांनी या डॉक्युमेंट्रीबाबत सांगितले.
 
 
२०१९ मध्येही गुनीत मोंगा यांना बेस्ट डॉक्युमेंट्री या कॅटेगरीमध्ये 'पिरीयड एंड ऑफ सेन्टेन्स' या डॉक्युमेंट्रीसाठी अवॉर्ड मिळाला होता. त्यामुळे आता दुसऱ्यांदा ऑक्सर पटकावणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत. या वेळेस त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 
 
गुनीत मोंगा यांनी हा पुरस्कार  मिळाल्यानंतर नेट फ़्लिक्स आणि अर्थ स्पेक्ट्रम चे आभार मानले.
 
 
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनेही दोन्ही ऑस्कर विजेत्या चित्रपटांचे अभिनंदन केले आणि इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केले. विषेश म्हणजे आलिया देखील या चित्रपटाचा एक भाग होती आणि तिने यात एक छोटी भूमिका साकारली होती. याशिवाय अजय देवगणही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील ऑस्कर सोहळ्याचा आनंद लुटत असून तिनेही पुरस्कार विजेत्या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

त्यांच्याशिवाय कंगना रणौतनेही RRR टीमचे अभिनंदन केले आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल देशाचे आभार मानले. लोकांना ही मोठी बातमी कळू लागल्याने या दुहेरी आनंदाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहे.