करीना कपूर खानचा प्राडाला कोल्हापुरी झटका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
अभिनेत्री करीना कपूर खान
अभिनेत्री करीना कपूर खान

 

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा तिच्या स्टाईल आणि स्टेटमेंटमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिने कोणत्याही चित्रपट किंवा रेड कार्पेट लूकने नाही, तर तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे.

आपली कोल्हापुरीच भारी 
गेल्या काही दिवसांपूर्वी इटलीच्या प्राडा या फॅशन कंपनीने मध्येच एक वादळ उठवले होते. त्यांनी काही दिवसांपुर्वी पुरुषांसाठी असणारे चपलांचे समर कलेक्शन लाँच केले आणि त्यात चक्क आपल्या कोल्हापुरी चपलेसारखीच हुबेहूब चप्पल दिसली. हे पाहून जसा कित्येक भारतीयांना झटका बसला तसाच तो करीना कपूरलाही बसला आहे.

या वादावर आता करीनाने स्वत:च्या खास स्टाईलमध्ये मत व्यक्त केले आहे. तिच्या अस्सल कोल्हापुरी चपलांचा एक मस्त फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्या फोटोमध्ये फक्त करीनाचे पाय आणि तिने घातलेली कोल्हापुरी चप्पल दिसते आहे. या तिच्या स्टोरीला तिने फोटो कॅप्शनही “Sorry not Prada but my OG Kolhapuri” असं एकदम साजेसं दिलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?
प्राडाचं हे कलेक्शन जेव्हा जगासमोर आणलं गेलं तेव्हा त्यांच्यावर कोल्हापुरी चप्पल कॉपी केली म्हणून प्रचंड टीका झाली. त्यानंतर त्यांनी स्वतः हे मान्य केलं की त्यांनी ते डिझाईन कोल्हापुरी चप्पल पाहूनच तयार केलेलं आहे. आपली कोल्हापुरी प्राडा नावाने विकली जाणं भारतीयांना अजिबातच आवडलेलं नाही. त्यामुळेच तर त्यांच्यावर सडकून टिका होत आहे. या वादामुळे आता कोल्हापुरी चप्पल आणि तिची मागणी पुन्हा एकदा वाढणार असं दिसून येतंय.