मुलगी सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांचे मोठे विधान!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
डावीकडून दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल
डावीकडून दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल

 

दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अलीकडेच त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या २०२४ मध्ये झालेल्या लग्नावर भाष्य केले असून या जोडप्याला मेड फॉर इच अदर असे म्हटले आहे. या दोघांचा आंतरधर्मीय विवाह विशेष विवाह कायद्यांतर्गत पार पडला होता. माध्यमांशी बोलताना सिन्हा यांनी या विवाहावरून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

विशेषतः त्यांच्या 'रामायण' नावाच्या घराबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर आणि घरात सर्व काही ठीक आहे का, यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. सिन्हा म्हणाले, "सगळं काही अगदी ठीक आहे. आम्ही खूप आनंदी आहोत. सोनाक्षीचं जे लग्न झालंय, त्यात ते दोघंही एकमेकांसाठी बनलेले वाटतात. जहीर आणि सोनाक्षी खरोखरच 'मेड फॉर इच अदर' आहेत."

हे लग्न कायदेशीर आणि घटनात्मक मूल्यांनुसार असल्याचे सांगताना त्यांनी पुढे नमूद केले, "सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जे काही केले आहे, ते बेकायदेशीर नाही. आम्ही संविधानाच्या विरोधात काहीही केलेले नाही. मुलं तरुण आहेत, ती सज्ञान आहेत. जर ती आनंदी असतील, तर मियाँ-बीवी राजी तर काय करणार काजी. आपण त्यांना साथ दिली पाहिजे. मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे." 

सोनाक्षी आणि जहीर यांचा विवाह त्यांच्या निवासस्थानी जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत एका खाजगी सोहळ्यात झाला होता. यावेळी शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा उपस्थित होते, मात्र सोनाक्षीचे भाऊ या सोहळ्याला आले नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

एका जुन्या मुलाखतीत सोनाक्षीने देखील तिच्या लग्नाबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, "माझा नेहमीच असा विश्वास राहिला आहे की काहीही झाले तरी प्रेमाचाच विजय होतो. लोक तुमच्यावर कितीही द्वेष पसरवू शकतात, पण जिथे प्रेम असते तिथे फक्त प्रेमच असते आणि शेवटी तेच जिंकते. लोकांनी मला म्हटले की तू खूप धाडसी आहेस कारण तू तुझ्या मनाचे ऐकून त्याच्याशी लग्न केले. पण मी फक्त माझ्या आवडत्या व्यक्तीशी लग्न केले आहे. मी हे करणारी पहिली महिला नाही आणि शेवटची नक्कीच नसेन. आम्ही जाणीवपूर्वक काहीही करण्याचा प्रयत्न केला नाही. हे फक्त घडले आणि लग्नानंतर लोकांचा दृष्टिकोन लगेच बदलला. लोकांना आमच्यातील प्रेम, सच्चेपणा आणि प्रामाणिकपणा दिसला, त्यामुळे सर्व बाहेरचा गोंधळ आपोआप शांत झाला."