न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन (MSG) येथे विनोदी कलाकृती सादर करताना झाकीर खान
ओनिका माहेश्वरी
भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदवीर झाकीर खान यांनी एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. झाकीर खान यांनी न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन (एमएसजी) येथे प्रथमच आपली विनोदी कलाकृती सादर केली. त्यांची ही संपूर्ण विनोदी कलाकृती हिंदीत होती. या ऐतिहासिक क्षणाने त्यांच्या चाहत्यांना आनंदित केले आहे. भारतीय विनोद विश्वात एक नवे पर्व सुरू झाले आहे.
झाकीर खान आपल्या शुद्ध देशी शैलीतील हिंदी विनोदासाठी प्रसिद्ध आहेत. या शोमध्ये त्यांनी आपली खास शैली अधिक प्रभावीपणे सादर केली. हा शो केवळ हास्याचा खजिना नव्हता, तर दर्शकांना गमतीदार आणि खऱ्या मुद्द्यांवर विचार करायला भाग पाडणारा होता. या हिंदी विनोदी कलाकृतीमध्ये झाकीर यांनी साध्या पण प्रभावी शैलीचा संगम सादर केला. त्यांच्या अनोख्या शैलीने आणि दर्शकांशी जोडल्या जाणाऱ्या संवादाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली आहे. हा डेब्यू त्यांच्या या ओळखीला अधिक बळकटी देणारा आहे.
झाकीर खान यांचे हे पाऊल विनोद आणि हिंदी भाषेप्रती त्यांच्या प्रेमाचे द्योतक आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी हा क्षण अत्यंत खास होता. झाकीर नेहमीच आपल्या विनोदातून सामान्य माणसाच्या भावना व्यक्त करतात. यामुळे प्रत्येक दर्शकाला त्यांनी मांडलेल्या भावना आपल्याशा वाटतात. हा शो केवळ भारतीय दर्शकांसाठी नव्हता, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदी भाषिक समुदायासाठीही एक खास भेट होती. या ऐतिहासिक क्षणाने झाकीर खान यांना आणखी लोकप्रिय केले आहे. त्यांच्या विनोदी प्रवासाला नवी दिशा मिळाली आहे.
विनोद हा संगीतासारखा जागतिक स्तरावर लोकप्रिय आहे. भारतीय स्टँड-अप विनोदवीर सुपरस्टार झाकीर खान यांनी १७ ऑगस्टला न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे प्रथमच आपली विनोदी कलाकृती सादर केली. यात त्यांचा एक सेट पूर्णपणे हिंदीत होता. ३७ वर्षीय खान यांचे यूट्यूबवर ८२ लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत. त्यांच्या प्रतिनिधींच्या मते, गेल्या तीन वर्षांत त्यांनी जगभरात २ लाखांहून अधिक तिकिटे विकली आहेत. आउटबॅक प्रेझेंट्सद्वारे प्रायोजित आंतरराष्ट्रीय दौऱ्यांतर्गत त्यांनी या प्रसिद्ध स्थळी प्रस्तुती दिली. हा दौरा त्यांना डेट्रॉइट, शिकागो, अटलांटा, लॉडरहिल, फ्लोरिडा आणि फिनिक्स तसेच कॅनडातील मॉन्ट्रियल आणि टोरंटो या शहरांतही घेऊन जाणार आहे.
झाकीर खान यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले की, "मॅडिसन स्क्वेअर गार्डनचा मी कधीच विचार केला नव्हता. ही जागा नेहमीच चित्रपटातील दृश्ये आणि मोठ्या स्टार्ससाठीच आहे, माझ्यासारख्या छोट्या शहरातील मुलासाठी नाही, असे वाटायचे. पण कधी कधी आयुष्य तुम्हाला तुमच्या स्वप्नांपेक्षा पुढे घेऊन जाते.'
ते पुढे म्हणतात, “हा शो केवळ मोठे यश नाही तर, तुम्ही तुमच्या ध्येयाशी प्रामाणिक राहिलात तर मोठ्या मंचावर आपली जागा बनवू शकता, याची जाणीव आहे. अशा जागतिक मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि माझ्या दृष्टिकोनातून विनोद जगाच्या या भागात पोहोचवणे, हे एक समाधानकारक पण जबाबदारीचे स्वप्न आहे, जे जगण्याची मला उत्सुकता होती."
इंदौरमध्ये कॉलेज सोडल्यानंतर खान यांनी रेडिओ डीजे म्हणून करिअर सुरू केले. पण विनोदात त्यांना रस निर्माण झाला. २०१२ मध्ये त्यांनी कॉमेडी सेंट्रल इंडियाच्या 'इंडियाज बेस्ट स्टँड-अप' स्पर्धेत विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी जगातील काही मोठ्या मंचांवर आपली छाप पाडली. २०२३ मध्ये ते रॉयल अल्बर्ट हॉल येथे एकल प्रस्तुती देणारे पहिले आशियाई विनोदवीर ठरले. त्यांचा उम्मीद पॉडकास्ट भारतातील सर्वाधिक स्ट्रीम केल्या जाणाऱ्या पॉडकास्टपैकी एक आहे. इंग्रजी बोलणारे प्रेक्षक त्यांचे विनोद अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरील पाच विशेष कार्यक्रमांमधून पाहू शकतात. यांमध्ये 'हक से सिंगल' आणि यंदाचा 'डेलुलु एक्सप्रेस' यांचा समावेश आहे.
एमएसजीमधील त्यांच्या कलाकृतीच्या घोषणेत खान यांचा विनोद 'भारतीय कुटुंबे आणि आधुनिक भारतात यश मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांच्या भावना, संघर्ष आणि स्वप्ने दाखवणारा' असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी सांगितले की, लहानपणी त्यांना भेडसावलेल्या छळाविरुद्ध त्यांनी विनोदाचा ढाल म्हणून वापर केला. त्यांची कथाकथन शैली 'सख्त लौंडा' सारख्या म्हणींनी परिपूर्ण आहे, ज्याचा अर्थ 'कठोर माणूस' असा होतो.
झाकीर खान हे विनोद विश्वातील एक असे नाव आहे, ज्यांना परिचयाची गरज नाही. त्यांच्या व्हिडिओं आणि विनोदासाठी ते लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. १३ ऑक्टोबर २०२३ ला त्यांनी परदेशात एक नवा इतिहास रचला. लंडनमधील प्रसिद्ध रॉयल अल्बर्ट हॉल येथे त्यांनी विनोदी कलाकृती सादर केली. हे सादरीकरण करणारे ते पहिले आशियाई विनोदवीर ठरले आहेत.