सलमानच्या आगामी चित्रपटाचे शुटींग लडाखमध्ये सुरु?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 d ago
सलमान खान
सलमान खान

 

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान हा नावाजलेला अभिनेता आता नव्या टप्प्यावर असल्याचं चित्र दिसतंय. 'सिकंदर' सारख्या बहुचर्चित चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश न मिळाल्यानं सलमान आपल्या पुढील सिनेमांबाबत अधिक विचारपूर्वक पावलं टाकतोय. नुकताच तो अपूर्व लाखिया दिग्दर्शित 'गलवान' या चित्रपटासाठी चर्चेत आहे. 

लडाखमध्ये ३० दिवसांच्या शूटिंगसाठी सलमान सज्ज झाल्याचं बोललं जात आहे. ही एक देशभक्तिपर कथा असल्याची प्राथमिक माहिती आहे; मात्र त्याचसोबत सलमान खान एका नवीन आणि वेगळ्या वाटेवरदेखील विचार करत आहे. एका माहितीनुसार, प्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक महेश नारायणन यांच्यासोबत सलमान खानने चार-पाच बैठका घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

गलवानसारख्या गंभीर विषयांपासून ते दक्षिणेकडील दिग्दर्शकांबरोबरच्या प्रयोगांपर्यंत सलमान आता नवनवीन विषय हाताळण्यासाठी सज्ज होतोय का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. सध्या तो 'बिग बॉस १९'च्या तयारीत व्यग्र असून, हा शो २४ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. छोट्या पडद्यावरही सलमानचा दबदबा कायम आहे आणि त्याचदरम्यान त्याचे मोठ्या पडद्यावरील निर्णयदेखील चर्चेचा विषय ठरत आहेत. महेश नारायणन यांच्याबरोबरचा चित्रपट प्रत्यक्षात येतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.