राजीव नारायण
सध्या जागतिक पातळीवर एक वेगळीच आणि जीवघेणी शर्यत सुरू आहे. जगात स्वतःचं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि अब्जावधी डॉलर्सचा निधी खिशात घालण्यासाठी बड्या एआय (AI) कंपन्या वाट्टेल ते करायला तयार आहेत. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षित बनवण्याची जबाबदारी ज्या तज्ज्ञांवर होती, तेच तज्ज्ञ आता भीतीने नोकऱ्या सोडत आहेत. त्यामुळे भारतासह जगातल्या सर्वच सरकारांसमोर आता एक मोठं संकट उभं राहिलं आहे.
काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. एका भल्या पहाटे भारतीयांना एका मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागलं. एका बड्या राजकीय नेत्याचा 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) वापरून बनवलेला एक खोटा (डीपफेक) व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. बोगस खात्यांवरून हे खोटे व्हिडिओ एखाद्या शस्त्रासारखे वापरले गेले आणि बघता बघता करोडो मोबाईल स्क्रीनवर ते 'सत्य' म्हणून पाहिले गेले. तो व्हिडिओ पूर्णपणे खोटा होता, पण तो पाहून लोकांच्या मनात उसळलेला संताप मात्र १०० टक्के खरा होता. लोक रस्त्यावर उतरले, रास्तारोको झाला, गाड्या आणि सरकारी मालमत्तेची जाळपोळ झाली. यात शेकडो लोक जखमी झाले, काहींना रुग्णालयात तर तितक्याच लोकांना थेट तुरुंगात जावं लागलं.
या एकाच घटनेने आजच्या युगातली एक विदारक आणि भीषण विसंगती चव्हाट्यावर आणली. माणसाने आता अशी अचाट यंत्रं निर्माण केली आहेत, जी आपल्या कल्पनेच्याही पलीकडच्या वेगाने माहिती, भाषा, चित्र आणि निर्णय तयार करू शकतात. एआय तंत्रज्ञान आज जगातली अर्थव्यवस्था आणि आपला समाज मुळापासून ढवळून काढत आहे. पण यातली सर्वात धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे, ज्यांच्या खांद्यावर हे एआय सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे, तीच माणसं आता काम सोडून जात आहेत. फक्त आणि फक्त नफा कमवण्याच्या हव्यासापोटी सुरक्षेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे. सध्या बाजारात फक्त पैसा आणि मक्तेदारी याच दोन गोष्टींना देव मानलं जात आहे.
'सिलिकॉन रश': नफ्याच्या शर्यतीत हरवलेले नियम
हे सगळं कुठे घडतंय? तर जगातल्या सर्वात शक्तिशाली एआय कंपन्यांच्या बंद दारांमागे! एआय तंत्रज्ञान हे माणसाच्या फायद्याचं, नैतिक आणि नियंत्रणात राहील, हे पाहण्याचं काम काही तज्ज्ञ संशोधक करतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, केवळ २०२६ या एका वर्षात एआय सुरक्षेवर काम करणाऱ्या शेकडो वरिष्ठ संशोधकांनी 'ओपनएआय' (OpenAI) आणि 'अँथ्रोपिक' (Anthropic) सारख्या मातब्बर कंपन्यांमधून राजीनामे दिले आहेत. ते काही गुपचूप बाहेर पडले नाहीत, तर त्यांनी जगाला उघडपणे धोक्याचा इशारा दिला आहे. सध्या कंपन्यांची व्यावसायिक भूक ही माणसाच्या सुरक्षिततेवर भारी पडत आहे. बाजारात 'नंबर वन' बनण्याच्या या जीवघेण्या शर्यतीत समाजाला सुरक्षित ठेवणारे उपायच नष्ट केले जात आहेत.
या सगळ्या गोंधळामागे एक खूप मोठं व्यावसायिक सत्य लपलेलं आहे. एआय आता फक्त एक नवं तंत्रज्ञान राहिलेलं नाही, तर ते जगातला सर्वाधिक पैसा खेचणारं चुंबक बनलं आहे. वेगाने नवीन गोष्टी आणणे आणि बाजारपेठ काबीज करणे यालाच सुरक्षिततेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जात आहे.
"जग सध्या मोठ्या संकटात आहे."
- मृणांक शर्मा (संशोधक, अँथ्रोपिक कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर)
'अँथ्रोपिक' ही सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देणारी कंपनी मानली जाते. पण जेव्हा त्यांनी बाजारातून प्रचंड मोठा निधी मिळवला आणि कंपनीचं मूल्य गगनाला भिडलं, अगदी त्याच वेळी सुरक्षेवर काम करणाऱ्या त्यांच्या वरिष्ठ संशोधकांनी कंपनी सोडली. ज्यांच्यावर एआयच्या धोक्यांचा अभ्यास करण्याची जबाबदारी आहे, तेच लोक जर अशी भीती व्यक्त करत असतील, तर समाजाने नक्कीच क्षणभर थांबून विचार करायला हवा.
'ओपनएआय'मध्येही अशीच मोठी गडबड सुरू आहे. एआयच्या भविष्यातील धोक्यांचा अभ्यास करणारा त्यांचा 'सुपरअलाइनमेंट' विभाग आधीच बंद करण्यात आला आणि नुकतीच त्यांची 'मिशन अलाइनमेंट' टीमही काढून टाकण्यात आली. ओपनएआयचे माजी शास्त्रज्ञ जॅन लेक यांनी स्पष्टच सांगितलं की, "चकचकीत आणि नवीन उत्पादनं बाजारात आणण्याच्या नादात सुरक्षेच्या नियमांना आता दुय्यम स्थान दिलं गेलं आहे."
भारतासमोरील भीषण धोका आणि वास्तव
हे सगळं अमेरिकेत घडतंय, त्याला एखाद्या दूरच्या नाटकासारखं समजण्याची चूक भारत अजिबात करू शकत नाही. भारत हा जगातल्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल देशांपैकी एक आहे. इथे सरकारची कामं, बँकिंग, शिक्षण, आरोग्यसेवा आणि अगदी रोजच्या ऑनलाईन खरेदीत एआयचा वापर प्रचंड वाढला आहे. याच अफाट वापरामुळे, कोणत्याही बंधनाशिवाय एआय वापरण्याच्या धोक्यांना आपण सर्वात लवकर बळी पडू शकतो. हे धोके आताच दिसायला लागले आहेत:
खोटी माहिती आणि डीपफेक: एआयने बनवलेली खोटी माहिती ओळखणं आता अशक्यप्राय झालं आहे. राजकारणी, अभिनेते आणि सामान्य माणसांना टार्गेट करणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत.
सायबर सुरक्षा आणि फसवणूक: ऑनलाईन फसवणूक, ओळख चोरणे हे प्रकार वाढले आहेत. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नेही याला सायबर सुरक्षेतील सर्वात मोठा अडथळा मानलं आहे.
डेटा आणि प्रायव्हसी (गोपनीयता): एआय प्रणाली चालण्यासाठी समुद्राएवढा अफाट डेटा लागतो. आपले बोलणे, चेहऱ्याचे फोटो, पैशांचे व्यवहार हा त्यांच्यासाठी कच्चा माल आहे. आपले कायदे कमकुवत असतील, तर लोकांवर पाळत ठेवणं आणि माहितीचा गैरवापर होणं अत्यंत सोपं होईल.
भारत सरकारने या संकटाचं गांभीर्य ओळखलं आहे, ही निश्चितच एक जमेची बाजू आहे. डिजिटल डेटा प्रोटेक्शनचे नवीन नियम आणि डीपफेक रोखण्यासाठी कंपन्यांवर टाकलेली जबाबदारी यातून सरकारची जागरूकता दिसते. पण दुसरीकडे, तंत्रज्ञान ज्या भयंकर वेगाने पळतंय, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी आपले कायदे आणि नियम आजही धडपडत आहेत.
एआयची मानवी किंमत
सायबर गुन्हेगारीच्या पलीकडे आणखी एक भयंकर संकट उभं आहे, ते म्हणजे माणसाचं महत्त्वच संपुष्टात येणं. आधी वाटायचं की यंत्र फक्त मजुरीची कामं करतील. पण आज एआय कोडिंग करणारे इंजिनिअर, डिझायनर, लेखक आणि डेटा विश्लेषक अशा 'पांढरपेशा' नोकऱ्याही गिळंकृत करत आहे.
जेव्हा आपण योग्य नियम आणि शिक्षणाचे उपाय करण्याआधीच नवीन तंत्रज्ञान आंधळेपणाने स्वीकारतो, तेव्हा समाजातली दरी वाढते. पैसा मोजक्याच लोकांच्या हातात एकवटतो आणि व्यवस्थेवरचा सामान्य माणसाचा विश्वास उडतो. लोकांच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणारी ही यंत्रणा काम कशी करते, हेच सर्वसामान्यांना समजेनासं होतं. म्हणूनच सुरक्षेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांचे राजीनामे गंभीर आहेत. ते तंत्रज्ञानाला विरोध करणारे कार्यकर्ते नाहीत, तर तेच लोक आहेत ज्यांनी हे एआय बनवायला मदत केली होती. त्यांची मुख्य भीती हीच आहे की, फक्त विकासाच्या वेगासाठी मानवजात सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
शेवटचा संरक्षक उपाय
आजचे जग हे एखाद्या जुन्या औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीसारखंच दिसत आहे. फरक इतकाच की, या क्रांतीचा वेग प्रचंड आहे आणि त्याचे परिणामही खूप मोठे आहेत. प्रचंड मोठी लोकसंख्या आणि वाढणारा डिजिटल वापर यामुळे भारत आज एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. भारताला असा बेजबाबदार तंत्रज्ञानाचा वेडेपणा परवडणारा नाही आणि केवळ भीती बाळगूनही चालणार नाही.
भारताने आता एक तिसरा मार्ग निवडला पाहिजे: नवीन शोध आणि त्यासोबतच जबाबदारी.
याचा सरळ अर्थ असा की:
एआयची तपासणी करणे आणि कामात पारदर्शकता आणणारे कडक नियम बनवणे.
आपला डेटा सुरक्षित ठेवणारी भक्कम साधने निर्माण करणे.
एआयमुळे होणाऱ्या चुकांची नोंद ठेवण्यासाठी संरक्षक उपाय योजणे.
सुरक्षेवर काम करणाऱ्या तज्ज्ञांना त्यांचे अधिकार मिळतील आणि त्यांना बाजूला ढकलले जाणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकदा का लोकांचा तंत्रज्ञानावरचा विश्वास उडाला, तर तो पुन्हा मिळवणं हे कोणतीही नवीन मशीन बनवण्यापेक्षा खूप कठीण असतं.
एआय हा मानवाचा सर्वात मोठा शोध ठरू शकतो. पण जर एआय सुरक्षित ठेवणारे रक्षकच स्वतः भीतीने दूर जात असतील, तर आपल्याला एका भयंकर वास्तवाला सामोरं जावं लागेल. आपल्या अफाट महत्त्वाकांक्षेसोबतच 'माणसाचं शहाणपण' टिकून राहू शकतं का, हे पाहण्याची ही शर्यत आहे. आणि हे आव्हान पार पाडणं, माणसासाठी खरोखरच खूप कठीण असू शकतं.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -