Pulitzer Prize 2026: डिजिटल अरेस्टचा थरार मांडणाऱ्या भारतीय पत्रकारांच्या कार्याची जगात दखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

डिजिटल पाळत ठेवणे आणि सायबर फसवणुकीच्या मुद्द्यावर प्रकाश टाकणाऱ्या दोन भारतीय पत्रकारांना प्रतिष्ठेचा 'पुलित्झर' पुरस्कार मिळाला आहे. आनंद आर. के. आणि सुपर्णा शर्मा अशी या पत्रकारांची नावे आहेत.

सोमवारी या पुरस्कारांची घोषणा झाली. 'सचित्र वृत्तांत आणि भाष्य' (Illustrated Reporting and Commentary) या श्रेणीत आनंद आणि शर्मा यांनी हा सन्मान पटकावला. 'ब्लूमबर्ग'च्या नताली ओबिको पियर्सन यांच्यासोबत त्यांनी हा पुरस्कार विभागून घेतला आहे.

'trAPPed': डिजिटल अरेस्टची थरारक कहाणी

या पुरस्कार विजेत्या कलाकृतीचे नाव 'trAPPed' असे आहे. 'ब्लूमबर्ग'साठी त्यांनी ही विशेष मालिका तयार केली होती. भारतातील एका न्यूरोलॉजिस्टला फोनद्वारे 'डिजिटल अरेस्ट' करण्यात आले होते. या घटनेचा अत्यंत थरारक वृत्तांत त्यांनी यात मांडला आहे.

शब्द आणि चित्रांच्या अचूक संगमातून त्यांनी पाळत ठेवणे आणि डिजिटल घोटाळ्यांच्या वाढत्या जागतिक आव्हानांवर लक्ष वेधले आहे. 'पुलित्झर' पुरस्कारांच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे.

पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान

कोलंबिया विद्यापीठाकडून 'पुलित्झर' पुरस्कार दिले जातात. पत्रकारिता, साहित्य आणि संगीत रचनेतील सर्वोच्च सन्मानांपैकी एक म्हणून या पुरस्काराकडे पाहिले जाते. उत्तम वृत्तांत आणि कथा सांगण्याच्या उत्कृष्ट शैलीचा या माध्यमातून दरवर्षी गौरव केला जातो.