पंतप्रधान मोदींकडून मिशन दृष्टीचे कौतुक; अंतराळ क्षेत्रात भारतीय स्टार्टअपची ऐतिहासिक झेप

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅलेक्सआय (GalaxEye) या स्टार्टअपच्या 'मिशन दृष्टी' या जगातील पहिल्या 'ऑप्टोसॉर' (OptoSAR) उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे जोरदार कौतुक केले आहे. हे यश देशातील तरुणांमधील नवकल्पना आणि राष्ट्र उभारणीच्या उत्कटतेचा पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बंगळुरू येथील स्पेस स्टार्टअप गॅलेक्सआयने रविवारी कॅलिफोर्नियातून स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटद्वारे हा उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात सोडला.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत म्हटले की, "गॅलेक्सआयचे मिशन दृष्टी आपल्या अंतराळ प्रवासातील एक मोठा टप्पा आहे. जगातील पहिल्या 'ऑप्टोसॉर' उपग्रहाचे आणि भारतातील सर्वात मोठ्या खाजगीरीत्या तयार केलेल्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हे आपल्या तरुणांच्या कल्पकतेचे प्रतीक आहे." पंतप्रधानांनी यावेळी गॅलेक्सआयच्या संस्थापकांचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करून त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तांत्रिकदृष्ट्या प्रगत उपग्रह

'मिशन दृष्टी' हा जगातील पहिला 'ऑप्टोसॉर' उपग्रह आहे. गॅलेक्सआय कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या उपग्रहामध्ये इलेक्ट्रो-ऑप्टिकल (EO) आणि सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) या दोन्ही सेन्सर्सचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. ही दोन्ही यंत्रणा एकाच प्लॅटफॉर्मवर कार्यरत असणारा हा जगातील पहिलाच प्रयोग आहे. यामुळे कोणत्याही हवामानात आणि दिवसा किंवा रात्री, पृथ्वीची अत्यंत स्पष्ट छायाचित्रे मिळवणे शक्य होणार आहे.

भारतातील खाजगी अंतराळ क्षेत्रात हे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची अंतराळ तंत्रज्ञानातील शक्ती जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.