चांद्रयान-३ चे लँडिंग उद्या झाले नाही तर...; इस्त्रोच्या वैज्ञानिकाने दिली महत्वाची माहिती

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 8 Months ago
चांद्रयान-३
चांद्रयान-३

 

सध्या देशासह संपूर्ण जगाचे लक्ष हे भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागले आहे. २३ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ हे चंद्रावर उतरणार आहे. दरम्यान चांद्रयान-३ च्या लँडिंगमध्ये अडचण आल्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो लँडिंगची वेळ बदलू शकते. इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम. देसाई यांनी ही माहिती दिली आहे. २३ ऑगस्टच्या पूर्वनियोजित तारखेला सॉफ्ट लँडिंगमध्ये अडचण आल्यास ही प्रक्रियाही 2७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले आहे.

अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे (इस्रो) संचालक नीलेश एम. देसाई यांनी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगच्या पुढील योजनेची माहिती दिली, ते एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलत होते. 'चांद्रयान-३ हे उद्या म्हणजेच २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी लँडर मॉड्यूलची हेल्थ आणि चंद्रावरील स्थिती पाहून परिस्थिती लँडिंगसाठी योग्य आहे की नाही याचा निर्णय घेऊ.

जर परिस्थिती आपल्या बाजूने नसेल तर आम्ही २७ ऑगस्टला चंद्रावर मॉड्यूल उतरवू. मात्र कोणतीही अडचण आली नाही, तर आपण २३ ऑगस्टला मॉड्यूल चंद्रावर उतरवू शकू असेही त्यांनी सांगितले. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी चांद्रयान ३ ची स्थिती आणि इस्रोच्या तयारीबद्दलची माहिती त्यांना दिली.

चांद्रयानाचे लँडिंग कुठे पाहाल?
इस्त्रोने रविवारी चांद्रयान ३ हे २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असल्याची माहिती दिली होती. चांद्रयान-३ च्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण इस्रोच्या अधिकृत वेबसाइट (https://isro.gov.in), यूट्यूब (https://www.youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss), फेसबुक (facebook.com/ISRO) वर पाहता येईल.