निवडणूक आयोगाच्या C-Vigil ॲपला मतदारांचा मोठा प्रतिसाद

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 28 d ago
 C-Vigil
C-Vigil

 

भारतीय निवडणूक आयोगाचे C-Vigil ॲप हे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करण्याच्या घटनांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेले एक प्रभावी साधन बनले आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत या अॅपवर ७९,००० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ९९% पेक्षा जास्त तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापैकी जवळपास ८९% तक्रारींचे नोंदणी झाल्यानंतर केवळ १०० मिनिटांत निराकरण करण्यात आले आहे. गती आणि पारदर्शकता हे C-Vigil ॲपचे आधारस्तंभ आहेत.

५८,५०० हून अधिक तक्रारी (एकूण ७३%) बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्सच्या विरोधात आहेत. पैसे, भेटवस्तू आणि दारू वाटपाच्या संदर्भात १४०० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जवळपास ३% तक्रारी (२४५४) मालमत्तेच्या विद्रुपीकरणाशी संबंधित आहेत, तर शस्त्र दाखवणे आणि धमकावणे या प्रकरणात प्राप्त झालेल्या ५३५ तक्रारींपैकी ५२९ प्रकरणे याआधीच निकाली काढण्यात आली आहेत. १००० तक्रारी निश्चित कालावधीच्या पलीकडे प्रचार प्रकरणी नोंदवल्या गेल्या होत्या, यात परवानगी देण्यात आलेल्या वेळेपलीकडे स्पीकरचा वापर अशा घटनांचा समावेश आहे.

C-Vigil ॲपने निवडणूक पर्यवेक्षण आणि प्रचारातील गोंधळ कमी करण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.  २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन तसेच मतदारांना कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाचे वितरण यासारख्या घटनांची तक्रार नोंदवण्यासाठी या ॲपचा वापर करावा, अशी सूचनाही केल्याचे लक्षात येते.

C-Vigil हे वापरकर्त्यास अनुकूल आणि हाताळण्यास सोपे ऍप्लिकेशन आहे, जे सतर्क नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्ष, निवडणूक अधिकारी आणि भरारी पथकांशी संपर्क साधण्यास मदत करते. या ॲपचा वापर करून नागरिकांना राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची तक्रार निवडणूक अधिकारी कार्यालयात गर्दी न करता काही मिनिटांत करता येईल. C-Vigil ॲपवर तक्रार नोंदवताच तक्रारदाराला एक युनिक आयडी मिळेल ज्याद्वारे तक्रारदार व्यक्ती आपल्या मोबाईलवरून तक्रार निवारण प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकेत.

एकाच वेळी कार्य करणाऱ्या घटकांची त्रिसूत्री C-Vigil ला यशस्वी बनवते. ॲपचे वापरकर्ते रिअल-टाइममध्ये ऑडिओ, फोटो किंवा व्हिडिओ मुद्रीत करु शकतात. अशा तक्रारींना वेळेनुसार प्रतिसाद देण्यासाठी '१००-मिनिटांचे' काउंटडाउन सुनिश्चित केले जाते. वापरकर्त्याने नियम उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी C-Vigil मधील कॅमेरा सुरु केल्यावर ॲप स्वयंचलितपणे जिओ-टॅगिंग वैशिष्ट्य सक्षम करते. यामुळे भरारी पथकाला नियम उल्लंघनाचे नेमके स्थान कळू शकते आणि नागरिकांनी घेतलेली छायाचित्रे न्यायालयात पुरावा म्हणून वापरली जाऊ शकतात. नागरिक आपले नाव गुप्त ठेवूनही तक्रारी नोंदवू शकतात. हे ॲप तंत्रज्ञानाचा फायदा घेत मतदार आणि राजकीय पक्षांना सुविधा देण्यासाठी आयोगाने तयार केलेल्या अनेक ॲप्सपैकी एक आहे.