जॅक डोर्सी यांच्यावर ‘हिंडेनबर्ग रिसर्च’चे लक्ष

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
कॅश ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचा आरोप
कॅश ॲपच्या माध्यमातून फसवणुकीचा आरोप

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योगसमूहाला धक्का दिल्यानंतर ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने आता ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रातील कंपनी ‘ब्लॉक’ला लक्ष्य केले आहे. हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालामध्ये कोरोना काळामध्ये ब्लॉक कंपनीच्या कॅश अॅपने सरकारच्या प्रोत्साहनपर कार्यक्रमांचा गैरफायदा घेऊन हेराफेरी करणाऱ्यांना मोठा लाभ मिळवून दिल्याचा आरोप केला आहे.

हिंडेनबर्गच्या या अहवालाचे रोखे बाजारामध्ये पडसाद उमटले. ब्लॉक कंपनीच्या शेअरमध्ये २० टक्क्यांनी घसरले. मागील तीन वर्षांतील कंपनीच्या रोख्यांमधील ही पहिलीच मोठी घसरण आहे. डोर्सी यांच्या नेतृत्वाखालील वित्तीय कंपनीची तब्बल दोन वर्षे चौकशी करण्यात आली होती. डोर्सी यांनी स्थापन केलेली ‘ब्लॉक’ ही कंपनी व्यापारी आणि ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट आणि मोबाईल बँकिंगची सेवा पुरविण्याचे काम करते.
 
ही कंपनी २००९ मध्ये स्थापन झाली होती तिचे नाव ‘स्क्वेअर’ असे होते. या कंपनीने एका छोट्या कार्ड रिडरचा वापर केला होता. स्मार्टफोनच्या हेडफोनच्या जॅकमध्ये ते सहज बसविता येऊ शकते. यामुळे कलाकार आणि व्हेंडरना क्रेडिट कार्ड पेमेंट स्वीकारणे शक्य झाले होते. ब्लॉक कंपनीने लोकांना मदत करण्याच्या नावाखाली फायदा उचलला. ग्राहकांच्याविरोधातील हेराफेरीलाच बळ देण्याचे काम ‘ब्लॉक’ कंपनीकडून करण्यात आले यामध्ये ग्राहकांबरोबरच सरकारची देखील फसवणूक झाली. कंपनीने या माध्यमातून कर्ज बुडवेगिरी, नियमांना बगल देणे, तंत्रज्ञानाबद्दल शुल्क आकारणे, गुंतवणूकदारांची दिशाभूल करणे असे प्रकार केल्याचे हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.‘ब्लॉक’ कंपनीने खऱ्या यूजरची आकडेवारी जाणीवपूर्वक फुगवून सांगितली. यातील बहुतांश युजरचे अकाउंट हे बनावट असल्याचे आढळून आले.