भारतात तयार होतोय 'सुपर डुपर' संगणक ‘परम शंख’

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सध्या अस्तित्वात असलेल्या महासंगणकांपेक्षा एक हजार पटींनी अधिक वेगवान असलेल्या ‘परम शंख’ या महासंगणकाची निर्मिती भारत करत आहे. अमेरिका आणि जपाननंतर असा प्रयत्न करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरेल. एक्झास्केल (१०चा १८ वा घात) क्षमतेचा हा महासंगणक २०२८-२९ पर्यंत अस्तित्वात येईल, अशी माहिती प्रगत संगणन विकास केंद्राचे (सी-डॅक) कार्यकारी संचालक कर्नल ए.के.नाथ (निवृत्त) यांनी दिली.

‘राष्ट्रीय महासंगणन मोहीमे’अंतर्गत (एनएसएम) देशभरात महासंगणकांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून परम शंखची निर्मिती करण्यात येत आहे. सी-डॅकच्या पुण्यातील प्रयोगशाळेत निर्मित होणाऱ्या या महासंगणकासाठी देशभरातील संशोधन संस्था मदत करण्यात आहे. कर्नल नाथ म्हणाले, ‘‘वैद्यकीय आणि जीवशास्त्रातील भविष्यकालीन विश्लेषण क्षमतांसाठी देशाला एक्झास्केल महासंगणाची गरज आहे.

तोच उद्देश लक्षात घेऊन पहिला स्वदेशी एक्झास्केल महासंगणकाची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या ३०० हून अधिक शास्त्रज्ञ यावर कार्यरत असून, पूर्णतः स्वदेशी बनावटीचा महासंगणक असणार आहे.’ या संगणकासाठीचे सुटे भाग आणि मायक्रोप्रोसेसर देशातच विकसित करण्यावर शास्त्रज्ञांचा भर आहे.

बंगळूरमध्ये आत्ताचा वेगवान महासंगणक -
सध्या अस्तित्वात असलेला देशातील सर्वाधिक वेगवान महासंगणक बंगळूर येथील संशोधन संस्थेत बसविण्यात येत आहे. सुमारे २० पेटाफ्लॉप क्षमतेचा हा महासंगणक परम श्रेणीतील असून, पुढील काही आठवड्यातच तो कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती नाथ यांनी दिली. नॅशनल सुपरकंप्युटींग मिशनच्या अंतर्गत आजवर २४ पेटाफ्लॉप क्षमतेचे १५ महासंगणक कार्यान्वित करण्यात आले आहे. पुढील काळात ४४ पेटाफ्लॉप क्षमतेचे नऊ महासंगणक कार्यान्वित होतील, असेही त्यांनी सांगितले.

खोल समुद्रातील मोहिमांसाठी मदत 
खोल समुद्रातील मोहिमांचे संगणन आणि सॉफ्टवेअर प्रणाली विकसित करण्यासाठी सी-डॅक मदत करणार आहे. जलीय अर्थव्यवस्था हा देशाच्या विकासात महत्त्वाचा भाग असून, संशोधन संस्थांना शोध मोहिमांसाठी आवश्यक संगणकीय विश्लेषण क्षमता याद्वारे उपलब्ध होईल. खोल समुद्रातील जीवविज्ञान, संसाधन आणि औषधी घटकांच्या संशोधनासाठी संगणकीय विश्लेषण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.