भारतात आयफोन युनिटचा होणार विस्तार! टाटांचा मेगाप्लॅन

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 4 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जगभरात अॅपलच्या उत्पादनांची वेगळीच क्रेझ आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात आयफोनची क्रेझ खूप वाढली आहे. बर्‍याच लोकांकडे आयफोन असल्याचे पाहिले जाते. बरेच लोक अॅपलच्या किंमतीमुळे ते खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहेत.

 
अॅपल सुरुवातीपासूनच आपल्या महागड्या किंमती आणि चांगल्या फिचर्समुळे चर्चेत आहे. यातच आता भारतीय कंपनी टाटाने देशातच आयफोन बनवण्याची योजना आखली आहे. कंपनीला भारतात आयफोन निर्मितीचा वेग दुप्पट करायचा आहे. यासाठी टाटा देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेसाठी भारतात अॅपल आयफोनचे उत्पादन सुरू करणार आहे.

टाटा समूहाची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडने विस्ट्रॉन इन्फोकॉम मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडला 125 दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केले आहे. टाटा आयफोन युनिटमध्ये सुमारे 28,000 लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची योजना आखत आहे.

या युनिटमध्ये एकूण 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 1 ते 1.5 वर्षात कंपनी 25 ते 28 हजार लोकांना रोजगार देणार आहे.

ब्लूमबर्ग मीडिया रिपोर्टनुसार, टाटा समूह अॅपलचा प्रमुख पुरवठादार विस्ट्रॉनच्या मालकीचा कारखाना ताब्यात घेतला आहे. दक्षिणेकडील कर्नाटक राज्यात असलेला विस्ट्रॉन कारखाना ताब्यात घेण्याचे टाटा समूहाचे उद्दिष्ट होते.

विस्ट्रॉन आपला व्यवसाय का विकत आहे?
याआधी विस्ट्रॉन भारतातील आपला व्यवसाय विकण्याच्या तयारीत होती. कारण अॅपलने लादलेल्या अटींमुळे कंपनीच्या नफ्यात घट होत होती, त्यामुळे विस्ट्रॉन आयफोन निर्मितीच्या क्षेत्रातून बाहेर पडण्याच्या तयारीत होती.

अहवालानुसार, विस्ट्रॉनला कंपनीच्या लहान आकारामुळे आणि व्यवस्थापनातील समस्यांमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त चीन आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक फरकांमुळे विस्ट्रॉनच्या कामगारांना टिकवून ठेवणे कठीण होऊ लागले.

टाटा आयफोनचे उत्पादन वाढवणार
विस्ट्रॉनने आपली आयफोन असेंबली सुविधा टाटा समूहाला विकण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाचा विस्ट्रॉन कारखान्यात आयफोन उत्पादन क्षमता वाढवण्याचा मानस आहे. याशिवाय टाटा समूह सध्या भारतात आगामी iPhone 15 मॉडेलच्या असेंब्लीची चाचणी करत आहे.