आयफोन हॅकिंग प्रकरणाचा केंद्राकडून तपास सुरू

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 6 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अ‍ॅपल कंपनीने काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांना एक इशारा दिला होता. यामध्ये 'स्टेट-स्पॉन्सर्ड' हॅकर्स त्यांचा आयफोन हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. आता केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आयटी मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी याबाबत माहिती दिली. भारताची कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) याबाबत तपास करणार असल्याचं आयटी सचिवांनी स्पष्ट केलं. तसंच, अ‍ॅपल कंपनी या तपासात सहकार्य करणार असल्याचं देखील कृष्णन यांनी यावेळी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षातील आणि इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी आपले आयफोन सरकार हॅक करत असल्याचा आरोप केला होता. अ‍ॅपल कंपनीने त्यांना एक इशारा दिला होता, ज्यामध्ये म्हटलं होतं, की काही State-Sponsored हॅकर्स त्यांच्या आयफोनला अ‍ॅक्सेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट करत कित्येक नेत्यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

इशारा मिळालेल्या व्यक्तींमध्ये केसी वेणुगोपाल, महुआ मोईत्रा, शशी थरुर, प्रियांका चतुर्वेदी, पवन खेरा, सीताराम येचुरी, अखिलेश यादव आणि राहुल गांधींच्या कार्यालयातील काही कर्मचारी यांचा समावेश होता.

कंपनीने याबाबत बोलताना म्हटलं होतं, की काही वेळा सिस्टीम चुकीचे अलार्म पाठवू शकते. मात्र, त्यांची सिस्टीम सायबर हल्ल्यांचा प्रकार कशी निश्चित करते याबाबत अधिक माहिती देणं अ‍ॅपलने टाळलं होतं. आता अ‍ॅपल कंपनी सरकारसोबत मिळून या प्रकरणाचा तपास करणार आहे.