ऑनलाइनमधून वाढतोय बनावट औषधांचा धोका

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
औषधांच्या गुणकारीपणाबद्दल प्रश्नचिन्ह
औषधांच्या गुणकारीपणाबद्दल प्रश्नचिन्ह

 

पुणे : ‘मला चार दिवसांपासून ताप, सर्दी-खोकला होता. डॉक्टरांनी फोनवरून लक्षणांनुसार औषधे सांगितली. ती ऑनलाइन मागवून घेतली. चार दिवस औषधे घेऊनही फारसा फरक पडला नाही. त्यामुळे परत डॉक्टरांशी बोललो. त्यांनी जवळच्या दुकानात जाऊन औषधे घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार घेतलेल्या औषधाने दोनच दिवसांत आराम मिळाला,’ माहिती-तंत्रज्ञान कंपनीतील अभियंते अजित निगडे बोलत होते.

पुण्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात औषधांची ऑनलाइन खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. मात्र, ऑनलाइन मिळणाऱ्या औषधांच्या गुणकारीपणाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहात असल्याच्या काही घटना पुढे येत आहेत. त्यापैकी अजित यांना आलेला हा अनुभव. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन औषध खरेदीच्या सद्यःस्थितीची माहिती ‘सकाळ’तर्फे घेण्यात आली.

औषध विक्रेत्यांचा विरोध का?
१. ऑनलाइन औषध विक्रीला किरकोळ औषध विक्रेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. ऑनलाइन औषध खरेदी वाढल्याने त्याची थेट स्पर्धा औषध विक्रेत्यांना झाली.
२. बनावट आणि दुय्यम दर्जाच्या औषधांचे बाजारपेठेतील प्रमाण वाढले.
३. फक्त डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच मिळणारी औषधे ऑनलाइन सहज मिळायला लागली.
४. औषध दुकानांमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध मिळत नाही, पण तेच ऑनलाइन मिळते, अशी स्थिती निर्माण झाली.
५. दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या उपस्थितीतच औषध विक्री करण्याचे बंधनकारक आहे. मात्र, ऑनलाइनसाठी हे बंधन नाही.

कायदा काय सांगतो?
- ऑनलाइन औषध विक्रीबद्दल कायद्यात स्पष्टता नाही.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि फार्मासिस्ट नसताना औषधाची विक्री करू नये, या अटी ऑनलाइन औषध विक्रेत्यांवर घातल्या आहेत. याचे पालन न करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येते.
- संयुक्त संसदीय समितीने ऑनलाइन औषध विक्रीच्या कायद्यावर शिफारशी केल्या आहेत. मात्र, त्यावर निश्चित कायदा झाला नाही.
- ऑनलाइनवर बंदीच्या अधिकृत सूचना अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या नाहीत.

काय धोका वाटतो?
एखादी वस्तू किंवा कपडे आपण सहजतेने ऑनलाइन खरेदी करतो. ऑनलाइन खरेदी केलेल्या वस्तू आणि कपड्यांमध्ये दोष असल्यास ते आपण परत करू शकतो. मात्र, औषधांचे तसे नाही, हा धोका ऑनलाइन औषध खरेदीमध्ये असल्याचे मत औषध विक्रेते व्यक्त करतात.

झोपेच्या गोळ्या, दुरुपयोग होऊ शकतो अशी औषधे किंवा गर्भपाताच्या गोळ्या चाचणी म्हणून ऑनलाइनवरून ‘ऑर्डर’ देऊन मागवून घेतो. ही चाचणी नियमितपणे केली जाते. या औषध वितरणात काही त्रुटी असल्यास संबंधित कंपन्यांवर कारवाई केली जाते. बाहेरच्या राज्यातूनही काही वेळा औषध पुरवठा झाला आहे. त्यासाठी संबंधित राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिली जाते.
- श्याम प्रतापवार, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

औषधांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर बंदी घालण्यासाठी ‘एफडीए’कडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. कारण, बाजारात यामुळे बनावट औषधे वाढत आहेत. ग्राहकांना जागृत करण्यासाठी प्रत्येक दुकानावर आता पोस्टर लावणार. रुग्ण डॉक्टरांकडे जाऊन प्रत्यक्ष तपासून सल्ला घेता. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेले औषध प्रत्यक्ष दुकानात जाऊन घ्या. त्यातून तुम्हाला बनावट औषधे मिळणार नाहीत. त्याचे बिलही आवर्जून मागा. त्यातून आरोग्याचं रक्षण होईल.
- जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटना