सध्या सुरू असलेल्या हंता विषाणूच्या (Hantavirus) संसर्गामुळे जागतिक स्तरावर सार्वजनिक आरोग्याच्या चिंता वाढल्या आहेत. हा विषाणू कोविड-१९ (Covid-19) प्रमाणे पसरेल का आणि यामुळे पुन्हा लॉकडाऊन लागेल का, असे प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गुरुवारी स्पष्ट केले की, हा विषाणू कोविड किंवा इन्फ्लूएन्झासारखा नाही आणि तो पसरण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या साथरोग आणि महामारी व्यवस्थापन संचालक डॉ. मारिया व्हॅन केरखोव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या क्रूझ शिपवरील कोणत्याही प्रवाशाला किंवा कर्मचाऱ्याला लक्षणे नाहीत. हा विषाणू कोविड नाही आणि ही कोणत्याही नवीन महामारीची सुरुवात नाही. हा विषाणू खूप आधीपासून अस्तित्वात असून, सध्याचा संसर्ग एका मर्यादित आणि बंदिस्त जागेत झाला आहे.
'अलर्ट अँड रिस्पॉन्स को-ऑर्डिनेशन' विभागाचे संचालक डॉ. अब्दिरहमान महमूद यांनी २०१८-१९ मधील अर्जेंटिनातील अशाच एका घटनेचा संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरण याद्वारे या विषाणूची साखळी खंडित करणे शक्य आहे. हा संसर्ग प्रामुख्याने दीर्घकाळ एकमेकांच्या जवळ आल्यानेच होतो.
हंता विषाणू आणि कोविड-१९ मधील मुख्य फरक म्हणजे, हंता हा प्रामुख्याने उंदीर आणि घुशींसारख्या प्राण्यांमधून माणसात पसरणारा (झुनोटिक) आजार आहे. याउलट, कोविड-१९ हा अतिशय वेगाने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरणारा श्वसनाचा आजार आहे. हंता विषाणू जास्त प्राणघातक असला तरी, तो माणसांमधून माणसांत वेगाने पसरत नसल्याने यामुळे जागतिक महामारी येण्याची शक्यता फारच कमी असते. कोविड-१९ हवेत राहू शकतो आणि एकाच खोलीतील मोठ्या गटाला संक्रमित करू शकतो, तर हंता विषाणूचा मानवी संसर्ग दीर्घकाळ जवळच्या संपर्कातूनच शक्य आहे.
हंता विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने संक्रमित उंदराची लघवी, विष्ठा किंवा लाळेच्या संपर्कात आल्याने होतो. मानवाकडून मानवाला होणारा संसर्ग अत्यंत दुर्मिळ आहे. क्रूझ शिपवरील अलीकडील संसर्गामध्ये 'अँडीज स्ट्रेन' (Andes strain) आढळून आला आहे. हा एकमेव प्रकार माणसांमधून माणसात पसरतो, मात्र त्यासाठी अत्यंत जवळचा संपर्क आवश्यक असतो. 'डब्ल्यूएचओ'चे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, अँडीज विषाणूचा उबवणुकीचा काळ सहा आठवड्यांपर्यंत असू शकतो, त्यामुळे आणखी काही प्रकरणे समोर येऊ शकतात. मात्र, यातून सार्वजनिक आरोग्याला असलेला धोका सध्या तरी कमी आहे.