अहिल्यानगरात धार्मिक सलोख्याचा मोहरम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

राज्यभर प्रसिद्ध असलेली अहिल्यानगरची मोहरम मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली. शनिवारी मध्यरात्री काढण्यात आलेली कत्तलची रात्र मिरवणूक रविवारी सकाळी साडेदहा पर्यंत चालली. त्यानंतर दुपारी मोहरम विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. ही मिरवणूकही सुमारे नऊ तास चालली. सर्व धर्मियांच्या उपस्थितीत ही मिरवणूक शांततेत व उत्साहात संपन्न झाली. रात्री नऊच्या सुमारास मिरवणूक दिल्लीगेटच्या बाहेर पडली.

मोहरमनिमित्त कोठला परिसरात स्वारीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी रात्री १२ वाजता कोठला येथील छोटे बारा इमाम यांची स्वारी उठल्यानंतर कत्तलची रात्र मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी मानाचे पाच टेंभे पेटविण्यात आले होते. मंगलगेट हवेली येथून मोठे बारा इमाम यांची स्वारी उठली. कत्तलची रात्र मिरवणूक डाळमंडई, तेलीखुंट, कापडबाजार, मोची गल्ली, भिंगारवाला चौक, लक्ष्मी कारंजा, पटवर्धन चौक, जुने कोर्ट, जुना बाजार, ईदगाह मैदान मार्गेकोठला येथे रविवारी सकाळी स्वारी परत आपल्या जागेवर बसविण्यात आली.

पुन्हा दुपारी १२ च्या सुमारास कोठला येथील हमामे हुसेन यांची सवारी उठवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. आडते बाजार, पिंजार गल्ली, पारशा खुंट, जुना बाजार, खिस्त गल्ली, बांबू गल्ली, पंचपीर चावडी, सबजेल चौक मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने चोख बंदोवस्त ठेवण्यात आला होता. चौकाचौकांत पोलिस तैनात होते, तर संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. संपूर्ण मोहरम मार्गावर पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेली होती. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह सर्व अधिकारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक शांततेत पार पडली.

मंगल गेटला दोन्ही स्वाऱ्या एकत्र
कोठला येथून छोटे बारा इमाम (इमामे हुसेन) यांची सवारी हवेली येथे आल्यानंतर मोठे बारा इमाम (इमामे हसन) यांची सवारी देखील उठविण्यात आली. इमामे हसन-हुसेन या स्वाऱ्या हवेली येथून एकत्रित बाहेर पडल्या. मंगल गेट येथे दोन्ही स्वाऱ्या एकत्र आल्या असता, भाविकांनी एकच जल्लोष केला. मिरवणूक पाहण्यासाठी व स्वाऱ्यांच्या दर्शनासाठी सर्व धर्मियांनी मोठी गर्दी केली होती.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
मिरवणुकीदरम्यान दुपारी दीडच्या सुमारास जुमा मशिदीत दुवा मागण्यात आली. यावेळी हिंद- मुस्लिम ऐक्य दिसून आले. हिंदू बांधवांनी सरबताचे वाटप केले. तसेच मिरवणुकीत सहभागी होत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. दरम्यान, सायंकाळी स्वारीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पाच सरबताच्या गाड्या जुन्या महानगरपालिकेपर्यंत मिरवणुकीत सहभागी होत्या.

बंदोबस्तासाठी एक हजार पोलिस
मिरवणूक वेळेत दिल्ली गेट बाहेर पहाण्यासाठी सवारी खेळविणाऱ्या यंग पाठ्यांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले होते. संवेदनशील ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात होता. सुमारे एक हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. त्यात पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, निरीक्षक अशा ७० अधिकाऱ्यांचा समावेश होता.

मोहरमनिमित्त हिंदू-मुस्लिमांनी राबवले स्वच्छता अभियान
नेप्ती येथे मोहरमनिमित्त गावातील हिंदू-मुस्लिम युवकांनी एकत्रित येऊन धार्मिक एकतेचे दर्शन घडविले. मौलाना मुनीर सय्यद, हुसेन सय्यद व साजिद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सवाऱ्यांची स्थापना केली. सवारी स्थापनेच्या परिसरात हिंदू मुस्लिमांनी एकत्रित स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ व सुंदर केला.
 
 
मोहरमनिमित्त गावात इमाने हसन-हुसेन यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती देणाऱ्या मजलीसचे आयोजन केले होते. मजलीसनंतर भाविकांमध्ये प्रसादचे वाटप करण्यात आले. सरपंच संजय जपकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, प्रा. एकनाथ होले यांच्या हस्ते सवाऱ्यावर चादर अर्पण करून गावाच्या सुख, शांती व धार्मिक ऐक्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

माजी उपसरपंच फारूक सय्यद, माजी उपसरपंच संजय जपकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक वसंतराव पवार, ग्रामपंचायत सदस्य दादू चौगुले, बंडू जपकर, प्रा. बाबूलाल सय्यद, हुसेन सय्यद, परवेज सय्यद, बादशाह सय्यद, आसिफ शेख आदींसह हैदर यंग पार्टी, दोस्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.