अनंतनाग
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात एका झऱ्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना प्राचीन हिंदू मूर्ती सापडल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण काश्मीरमधील ऐशमुकामच्या सालिया भागातील करकूट नाग येथे या मूर्ती आणि शिवलिंग सापडले.
या स्थळाचे काश्मिरी पंडितांसाठी विशेष महत्त्व आहे. त्यांचा संबंध ६२५ ते ८५५ या काळात काश्मीरवर राज्य करणाऱ्या करकोटा राजघराण्याशी होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या झऱ्याचे नूतनीकरण आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना, मजुरांना उत्खननादरम्यान या मूर्ती मिळाल्या.
जम्मू-काश्मीरच्या अभिलेखागार, पुरातत्त्व आणि संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी या स्थळाला भेट दिली आहे. या मूर्तींचे वय आणि मूळ निश्चित करण्यासाठी त्यांना श्रीनगरला पाठवले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. "आम्ही त्यांना एसपीएस संग्रहालयात पाठवू, जिथे संशोधक आणि विभागातील लोक त्यांचा अभ्यास करतील," असे ते म्हणाले.
काश्मिरी पंडितांच्या भावना
एका काश्मिरी पंडितानुसार, "या भागात करकोटा राजघराण्याचा प्रभाव होता. त्यामुळे येथे एक मंदिर असण्याची किंवा कोणीतरी त्यांना जतन करण्यासाठी येथे ठेवले असण्याची शक्यता आहे."
जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १६ किमी दूर असलेले हे स्थळ एक तीर्थस्थळ आहे, असे ते म्हणाले. "हे पवित्र तलावातून सापडले आहेत. काही शिवलिंग, एक शिल्प आणि इतर वस्तू मिळाल्या आहेत. आम्ही त्यांचे संरक्षण व्हावे अशी आमची इच्छा आहे. येथे पूर्वी एक मंदिर होते असे आम्ही ऐकले आहे, त्यामुळे येथे एक नवीन मंदिर बांधून हे शिवलिंग तिथे ठेवावे," असे ते म्हणाले.