राजकीय इस्लामचा भ्रम आणि वास्तवातील शोकांतिका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
फोटो सौजन्य : सबरंग इंडिया
फोटो सौजन्य : सबरंग इंडिया

 

अमिद सुहैल वानी

अबू अल-आला मौदुदी, सय्यद कुतुब आणि त्यांच्या अनुयायांनी मांडलेली इस्लामची आधुनिक राजकीय कल्पना ही मुस्लीम इतिहासातील सर्वात मोठी बौद्धिक विकृती आहे. इस्लामसारख्या महान नैतिक, आध्यात्मिक आणि जागतिक परंपरेला आधुनिक राजकीय विचारधारेच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणे केवळ चुकीचे नसून हास्यास्पद आहे. वसाहतवादी मानसिकतेतून निर्माण झालेला न्यूनगंड आणि ऐतिहासिक ऱ्हासातून मुस्लिमांची प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याच्या नादात, 'राजकीय इस्लाम'ने धर्माला सत्तेच्या अशा एका व्याकरणात कैद केले, ज्याचा त्याने विरोध करण्याचा दावा केला होता. परिणामी, 'श्रद्धा' ही एका विचारधारेत आणि 'नैतिक खोली' ही केवळ राजकीय दाव्यांमध्ये मर्यादित झाली.

धार्मिक परंपरा नव्हे, तर आधुनिक संकल्पना

राजकीय इस्लाम हा परंपरेकडे परतण्याचा मार्ग नसून तो एक आधुनिक शोध आहे. अभिजात इस्लामने स्वतःला कधीही 'वाद' (ism) किंवा इतर विचारधारांशी स्पर्धा करणारी बंदिस्त व्यवस्था मानले नाही. त्याऐवजी, तो एक नैतिक मार्ग आणि आध्यात्मिक दिशा म्हणून कार्यरत होता, जो विविध राजकीय स्वरूपांमध्ये सामावून घेण्यास सक्षम होता. जुन्या काळातील मुस्लीम कायदेतज्ज्ञ आणि सूफी संतांनी राजकीय दावे करताना कमालीचा संयम बाळगला होता. त्यांनी न्याय, दया आणि मानवी चुकांवर भाष्य केले, परंतु कोणत्याही विशिष्ट राजकीय संरचनेला 'पवित्र' ठरवण्याचे टाळले. आधुनिक 'इस्लामवाद्यांनी' (Islamists) हा संयम तोडला आणि इस्लाम म्हणजे मूलतः एक राजकीय व्यवस्था आहे, जिच्या अंमलबजावणीसाठी राज्यसत्ता आवश्यक आहे, अशी घोषणा केली.

हॅना आरेंड (Hannah Arendt) यांनी विचारधारेच्या मानसिकतेचे जे विश्लेषण केले आहे, त्यात राजकीय इस्लाम चपखल बसतो. आरेंड यांच्या मते, विचारधारा ही केवळ राजकीय श्रद्धा नसते, तर ती संपूर्ण वास्तवाचे एकाच गृहितकातून स्पष्टीकरण देणारी एक मानसिक रचना असते. एकदा ही विचारधारा स्वीकारली की, नैतिक विवेकाची गरज उरत नाही आणि त्याची जागा केवळ 'तार्किक निश्चितता' घेते. मौदुदींची 'हाकिमिया' (ईश्वराची सार्वभौमत्व) ही संकल्पना नेमकी याच पद्धतीने कार्य करते. या एका संकल्पनेतून कायदा, समाज, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि अगदी वैयक्तिक विवेकही एका पूर्वनियोजित राजकीय तर्काखाली दबला जातो. अशा स्थितीत इस्लाम हा देवाकडे नेणारा नैतिक संघर्ष राहत नाही, तर तो एका मानवी अर्थाला समर्पित करणारी विचारप्रणाली बनतो.

जाहिलिया आणि द्वेषाचे राजकारण

सय्यद कुतुब यांनी 'जाहिलिया' या संकल्पनेचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करून या विचारधारेला अधिक आक्रमक बनवले. ऐतिहासिकदृष्ट्या 'जाहिलिया' म्हणजे प्रेषितांच्या मार्गदर्शनापूर्वीची नैतिक अज्ञानता होय. कुतुब यांनी याचे रूपांतर आधुनिक समाजाच्या राजकीय निदानात केले. त्यांच्या दृष्टीने, जे समाज त्यांच्या कल्पनेतील ईश्वरी सार्वभौमत्वाशी जुळत नाहीत, ते सर्व अवैध ठरले. यातून मानवतेची दोन भागांत विभागणी झाली: एक 'प्रबुद्ध' वर्ग आणि दुसरा 'नैतिकदृष्ट्या पतित' समाज. जेव्हा अशी विभागणी स्वीकारली जाते, तेव्हा बहिष्कार हा गुण बनतो आणि हिंसाचार हा उद्धाराचा मार्ग वाटू लागतो. इस्लामचा वैश्विक नैतिक संदेश अशा प्रकारे कायमस्वरूपी शत्रुत्वाच्या राजकारणात बदलला जातो.

एरिक व्होगेलिन (Eric Voegelin) यांनी आधुनिक राजकीय चळवळींची केलेली टीका येथे महत्त्वाची ठरते. त्यांच्या मते, अनेक आधुनिक विचारधारा 'परलौकिक मुक्ती' ही बळजबरीने ऐतिहासिक आणि राजकीय स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करतात. राजकीय इस्लाम हे याचेच उदाहरण आहे. कुराणमधील नैतिक दृष्टीकोन, जो परलोक आणि देवापुढील उत्तरादायित्वावर आधारित आहे, तो जगावर वर्चस्व गाजवण्याच्या प्रकल्पात बदलला जातो. मुक्ती ही आता नैतिक प्रयत्नांनी मिळणारी दैवी गोष्ट राहत नाही, तर ती एका विशिष्ट राज्यसत्तेच्या स्थापनेवर अवलंबून असलेला राजकीय परिणाम बनते.

अभिजात परंपरेचा विरोध

अभिजात इस्लामने या मोहाला नेहमीच विरोध केला. इमाम अल-गझली यांनी राजकीय सत्तेला गोंजारणे नाकारले होते. त्यांच्या मते, राजकीय सत्ता ही केवळ गोंधळ रोखण्यासाठी असलेली एक व्यावहारिक गरज होती, ती मुक्तीचे साधन नव्हती. धर्माचा भ्रष्टाचार तेव्हाच सुरू होतो जेव्हा विद्वान लोक 'बळजबरी'ला 'मार्गदर्शन' मानण्याची चूक करतात, असा इशारा त्यांनी दिला होता. इब्न तैमिया, ज्यांचा संदर्भ आजचे इस्लामवादी वारंवार देतात, त्यांनीही न्यायाला महत्त्व दिले होते. त्यांनी म्हटले होते की, "देव एका अन्यायी मुस्लीम राज्यापेक्षा एका न्यायप्रिय बिगर-मुस्लीम राज्याला अधिक काळ टिकवून ठेवू शकतो." मात्र, राजकीय इस्लामने या तर्काचा उलटा अर्थ लावून न्यायापेक्षा सत्तेला प्राधान्य दिले.

इस्लामच्या आध्यात्मिक-दार्शनिक परंपरेने तर राजकीय इस्लामच्या दाव्यांना पूर्णपणे खोडून काढले आहे. इब्न अरबी यांच्या 'वहदत अल-वजूद' (अद्वैतवाद) या संकल्पनेनुसार, सत्य हे केवळ राजकीय सत्तेद्वारे मक्तेदारी गाजवण्याची गोष्ट नाही. तर जलालुद्दीन रुमी यांनी प्रेमाला आध्यात्मिक जीवनाचे केंद्र मानले. रुमींचा इस्लाम सर्वसमावेशक आणि आनंदी होता, जिथे वर्चस्व गाजवण्यापेक्षा स्वतःमध्ये परिवर्तन घडवण्याला महत्त्व होते.

भारतीय संदर्भ आणि निष्कर्ष

भारताच्या संदर्भात दिल्लीचे शाह वलीउल्लाह यांचे उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी इस्लामिक कायद्याला 'वैचारिक शस्त्र' मानण्याऐवजी एक 'नैतिक पर्यावरण' मानले. त्यांनी ऐतिहासिक बदल आणि सांस्कृतिक विविधतेचा स्वीकार केला होता. त्यांचे उद्दिष्ट राजकीय व्यवस्था निर्माण करणे नसून नैतिक संतुलन आणि सामाजिक सलोखा राखणे हे होते.

आज कुराणमधील "धर्मात कोणतीही सक्ती नाही" (२:२५६) हे तत्त्व बाजूला सारले जात आहे. कुराण न्याय, दया आणि विश्वासावर भर देते, परंतु विशिष्ट राजकीय व्यवस्थेबाबत मौन बाळगते. हे मौनच इस्लामची नैतिक दृष्टी संस्थात्मक स्वरूपापेक्षा जास्त व्यापक असल्याचे सिद्ध करते.

भारतात इस्लाम हा सुफीवाद, स्थानिक भाषा आणि सामायिक सामाजिक जीवनातून एक प्रवाही परंपरा म्हणून विकसित झाला. तो कायमस्वरूपी विरोधाचा नव्हे, तर 'ताअरुफ' (परस्पर ओळख) आणि सलोख्याचा इस्लाम होता. मात्र, मौदुदी आणि कुतुब यांच्या विचारांच्या आयातामुळे मुस्लिमांनी स्वतःला एका बहुसांस्कृतिक संस्कृतीचा भाग मानण्याऐवजी एक विचारप्रणालीत अडकलेला अल्पसंख्याक गट मानण्यास सुरुवात केली. यामुळे सक्षमीकरण न होता केवळ सामाजिक अलिप्तता आणि राजकीय चिंता वाढली.

थोडक्यात, राजकीय इस्लामचे अपयश हे राजकीय असण्यापेक्षा आध्यात्मिक अधिक आहे. त्याने सत्याला सत्तेत आणि श्रद्धेला विचारधारेत मिसळून टाकले आहे. इस्लामला जगावर राज्य करण्याची गरज नाही, तर त्याने विवेकाला प्रकाशित करणे आणि मानवी सद्गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे. इस्लामची प्रतिष्ठा पुनर्प्राप्त करण्यासाठी आपल्याला या वैचारिक कैदेतून बाहेर पडावे लागेल आणि वर्चस्व गाजवण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन जगणारी श्रद्धा पुन्हा जागवावी लागेल.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter