गुलाम कादिर
रमजान २०२६ हा जगभरातील मुस्लिमांसाठी रोजाच्या कालावधीच्या दृष्टीने तुलनेने संतुलित आणि सुसह्य मानला जात आहे. खगोलशास्त्रीय गणनेनुसार, पवित्र रमजान महिना १९ किंवा २० फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होण्याची शक्यता आहे, तर ईद-उल-फित्रचा पहिला दिवस बहुतांश देशांमध्ये शुक्रवार, २० मार्च रोजी असू शकतो. अर्थात, अंतिम तारखा चंद्रदर्शनावर अवलंबून असतील. यावेळच्या रमजानचे वैशिष्ट्य म्हणजे, उत्तर गोलार्धात हिवाळ्याचा शेवट आणि वसंत ऋतूची सुरुवात होत असताना हा महिना येत आहे. यामुळे दिवसाचा कालावधी तुलनेने कमी असेल आणि गेल्या काही वर्षांच्या तुलनेत रोजाची वेळही कमी असेल.
तज्ज्ञांच्या मते, २०२६ मध्ये बहुतांश अरब देशांमध्ये आणि मुस्लीम बहुल क्षेत्रांमध्ये रोजाचा कालावधी सरासरी १२ ते १३ तास असेल. यामुळेच या वर्षाचा रमजान अलिकडच्या वर्षांतील सर्वात 'मध्यम' मानला जात आहे. जसजसा महिना पुढे सरकेल, तसतशी दिवसाची लांबी हळूहळू वाढत जाईल, त्यामुळे सुरुवातीच्या दिवसांच्या तुलनेत शेवटच्या दिवसांमधील रोजा काही मिनिटांनी मोठा असेल.
भौगोलिक स्थिती आणि वेळेतील फरक
देशोदेशांमधील रोजाच्या कालावधीत जो फरक दिसतो, त्याचे मुख्य कारण भौगोलिक स्थान आहे. विषुववृत्ताजवळ असलेल्या देशांमध्ये वर्षभर दिवस आणि रात्रीचा कालावधी जवळपास समान असतो. मात्र, जे देश उत्तर किंवा दक्षिण दिशेला अधिक दूर आहेत, तिथे ऋतूंनुसार दिवस-रात्रीच्या लांबीत मोठा फरक पडतो. रमजान २०२६ वसंत संपाताच्या (Spring Equinox) आधी सुरू होत असल्याने मध्य पूर्व, आखाती देश आणि उत्तर आफ्रिकेत दिवस लहान असतील.
आखाती आणि अरब देशांतील स्थिती
इजिप्तची राजधानी कैरोमध्ये रमजानच्या सुरुवातीला रोजाचा कालावधी सुमारे १२ तास ४० मिनिटे असेल, जो महिन्याच्या अखेरीस १३ तासांपर्यंत पोहोचेल. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (UAE), कतार, कुवेत, बहरीन आणि ओमानमध्ये रोजाचा वेळ साधारणपणे १२ ते १३ तासांच्या दरम्यान असेल. विविध शहरांतील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार यात काही मिनिटांचा फरक असू शकतो. सीरिया, जॉर्डन, पॅलेस्टाईन आणि इराक यांसारख्या देशांमध्येही हीच स्थिती असेल.
अमेरिका आणि युरोपमधील प्रदीर्घ रोजा
उत्तर गोलार्धात जसे आपण वरच्या बाजूला जातो, तसा रोजाचा कालावधी वाढताना दिसतो. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात रमजानच्या सुरुवातीला रोजा साडेबारा तासांचा असेल, जो मार्चच्या सुरुवातीस १३ तासांच्या पुढे जाऊ शकतो. युरोपमध्ये परिस्थिती थोडी वेगळी आहे. ब्रिटन, जर्मनी आणि उत्तर युरोपातील देशांमध्ये मुस्लिमांना १३ ते १४ तासांचा रोजा ठेवावा लागू शकतो. स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये (उदा. स्वीडन, नॉर्वे) अक्षांश अधिक असल्याने तिथे दिवस अधिक मोठे असतात, परिणामी तिथे रोजाचा वेळही वाढतो.
ध्रुवीय क्षेत्रातील आव्हाने
जगाच्या अति उत्तरेकडील भागात राहणाऱ्या मुस्लिमांसाठी रमजान नेहमीच विशेष आव्हान घेऊन येतो. रशियाचा उत्तर भाग, ग्रीनलँड आणि आइसलँड सारख्या ठिकाणी दिवसाचा कालावधी १६ तासांहून अधिक असतो. काही ठिकाणी तर सूर्य अनेक दिवस मावळत नाही किंवा उगवत नाही. अशा परिस्थितीत इस्लामिक विद्वानांच्या सल्ल्यानुसार, तेथील लोक एकतर जवळच्या संतुलित दिवस-रात्र असलेल्या शहराच्या वेळेचे पालन करतात किंवा मक्का मुकर्रमाच्या वेळेनुसार रोजा ठेवतात.
भारत आणि आशियाई देशांतील चित्र
२०२६ मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये रोजाची वेळ साधारणपणे १२ ते १३ तासांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या विषुववृत्ताजवळील देशांमध्ये संपूर्ण महिनाभर ही वेळ स्थिर राहील.
यंदाच्या रमजानचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आल्हाददायक हवामान. उन्हाळ्यात येणाऱ्या रमजानच्या तुलनेत यंदा तहान आणि थकवा कमी जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे केवळ रोजा ठेवणे सोपे होणार नाही, तर रात्रीची तरावीह नमाज, कुराण पठण आणि इतर इबादतींसाठीही उत्साह राहील. विशेषतः वृद्ध, मुले आणि काम करणाऱ्या लोकांसाठी हा रमजान शारीरिकदृष्ट्या कमी आव्हानात्मक असेल.
एकंदरीत, रमजान २०२६ हा जगभरातील मुस्लिमांसाठी संतुलित, शांततापूर्ण आणि इबादतीसाठी अनुकूल महिना ठरणार आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -