नाशिक शहरात मुस्लिमांकडून परंपरेनुसार अशुरा सण रविवारी साजरा करण्यात आला. घरोघरी फातेहा पठण करण्यात आला. फातेहा पठणानंतर सायंकाळी ताजिया आणि सवारीची परिसरातूनच मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले. मोहरम पर्वाची अशुरा सणाने सांगता होते.
शहरात ठिकठिकाणी मशिदींमध्ये अशुराची विशेष नमाज झाली. तसेच कुराण खानी तसेच नात-ए-पाकची मैफिल झाली. बडी दर्गासह शहराच्या विविध दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी ताजिया आणि सवारीची मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आली. सारडा सर्कल येथील प्रसिद्ध हालोका ताजियाची परंपरेनुसार इमामशाही दर्गा सारडा सर्कल परिसरातून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर दर्गा परिसरातच मिरवणुकीचा समारोप करत विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे सरस्वती नाला येथील हजरत सय्यद शहावली बाबा दर्गा स्थापना करण्यात आलेल्या ताजिया आणि सवारीची दर्गा परिसरातच मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले.
आदिवासी बांधवांना खांदेकरीचा मान
हलोका ताजिया तयार करून स्थापना करण्याचा मान इमाम शाही दर्गा येथील सय्यद कुटुंबीयांना आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे खांदेकरीचा मान हा आदिवासी बांधवांना देण्यात येतो. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. वर्षभर हे आदिवासी बांधव कुठेही असोत, विसर्जनावेळी मात्र ते उपस्थित राहतात.