बाबा गुरुनानक अन्‌ एकेश्‍वरवाद!

Story by  आवाज़ मराठी | Published by  sameer shaikh • 7 Months ago
बाबा गुरुनानक
बाबा गुरुनानक

 

शेख हुसेन गुरुजी

बाबा गुरुनानक यांच्या उदात्त शिकवणीत ईश्‍वराच्या अनेक गुणवैशिष्ट्यांचा उपयोग करण्यात आला आहे. या विभिन्न नावाच्या वर्णनाचा उद्देश लोकांमध्ये खुदाचा वेगवेगळ्या प्रकारे परिचय करून देत, त्यात 'एकेश्‍वरवाद' अर्थात 'एक ओंकार'च्या प्रसाराचा विवेक जागृत करणे होय. पवित्र कुराणाने विश्‍वातील आध्यात्मिक वाङ्‌मयात ईश्‍वराच्या सृजनात्मक ईशसामर्थ्य, रचनात्मक शक्‍ती आदी निरनिराळ्या विशेषणांवर विचारचिंतन करण्याचे आवाहन करून मानवाच्या वैचारिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त केला आहे...

बाबा नानक फर्मावतात, मानवी शरीर खुदाची नगरी असून, ईश्‍वर त्याच्या अंत:करणात निवास करतो. तो संपूर्ण ब्रह्मांडाचा रचिता आणि समस्त प्राणिमात्रांचा निर्माता आहे. साऱ्या सृष्टीस तो एकटाच नियंत्रित करतो. त्याने कोणत्याही आधाराविना आकाशाची उभारणी केली. यासाठी बाबा नानक यांनी ईश्‍वरीय शक्‍ती व सामर्थ्य या शब्दांचा प्रयोग केला आहे. ते म्हणतात, ही सृष्टी ईश्‍वराची लीला अर्थात 'स्टेज ड्रामा' असून, जो रात्रीच्या अंध:कारात खेळला जातो. येथे अमर्याद क्षेत्र आणि अनेक जग आहेत. आत्मा स्वत:च्या व्यक्‍तिगत कारणांमुळे खुदाकडे अनेक प्रवृत्तींनी प्रकट होत असतो. ज्याअर्थी प्रवृत्ती आत्म्याचा भाग आहे. ईश्‍वर प्रत्येक दोषापासून पवित्र असून, सर्वप्रकारे परिपूर्ण आहे. तो निर्गुण आणि सगुणसुद्धा आहे. त्याचा कोणता चेहरा व आकार नाही; किंबहुना कोणते रूप नाही. त्याचे विभिन्न पैलू आत्यंतिक उपासनेने माहीत होतात. जी. सी. नारंग यांच्यानुसार ईश्वराला गुरुनानक यांनी 'जिनिअस मास्टर माइंड'च्या स्वरूपात सादर केले आहे.

बाबा गुरुनानक यांनी 'एकेश्‍वरवादा'च्या संकल्पनेशी जनतेला जोडण्याचे कार्य केले. अडीचशे वर्षांपूर्वी पंजाबमध्ये बाबा फरीद आध्यात्मिक लोकशाहीच्या चळवळीचे उत्थान करीत होते. ते प्रथम इतिहास घडविणारे व्यक्‍तिमत्त्व होते. ज्यांनी आपल्या संघटनेद्वारे विविध संस्कृती-धर्म-परंपरेच्या लोकांच्या दरम्यान परस्परांत सुसंवादाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यांनी एकाच मार्गातून ईश्‍वर व भक्‍ताच्या दरम्यान संपर्क अधिकाधिक सुदृढ करण्याचा आपल्या काव्यातून संदेश दिला. या चळवळीस बाबा गुरुनानक यांनी प्रगतिपथावर नेण्याचे कार्य केले.

बाबा नानक या काळातील भारतामधील प्रत्येक धर्म वैयक्तिक बाब बनली होती. म्हणून त्यांनी जीवनाचे असे तत्त्वज्ञान सादर केले, जे सत्य- सरळ मार्गाने ईश्‍वर आणि दासाच्या संबंधावर बळ देणारे आहे. हाच विचार दिव्य कुराण सादर करतो. ज्यास त्या काळातील मुस्लिम पेश करीत नव्हते. गुरुसाहेबांनी आधुनिक जगास ईमानची अशी व्याख्या प्रस्तुत केली; जी नव्या युगातील अपेक्षांशी संबंधित होती. सत्याचा स्वीकार करणे, सत्याचे रक्षण करणे, हाच त्यांचा संदेश बनला. जे धर्मास समजण्याचे उत्कृष्ट साधन ठरतो. खुदाशी व्यक्‍तिगत संबंध आणि आवडमध्ये मुक्‍तीचा मार्ग आहे. धर्माचे ईश्‍वरासमान नि:स्वार्थ आणि सेक्‍युलर होणे, हा शीख धर्माचा आत्मा आहे.

गुरुनानक साहेब यांचे संपूर्ण जीवन एक 'सत्वा सौदा'च्या प्रतिकृतीत तयार झालेली ईशमहिमा आहे. त्यांच्या काळात मागास वर्गात जो सर्वांत खालचा मनुष्य आहे. नानक म्हणतात, मी त्याच्यासोबत चालणार आहे. मी मोठा बनून काय करू? खुदाची कृपादृष्टी त्यांच्यावर पडत असते; जे आपल्यापेक्षा निम्न स्तराच्या लोकांचे रक्षण करतात.

गुरुनानक साहेब यांची ईश्‍वराची संकल्पना केवळ आध्यात्मिकताच नाहीय; किंबहुना मानवतेची वेदनासुद्धा आहे. ते आपल्या सभोवतालच्या व्यथा, पीडा, दु:ख आणि वेदना समाजातील भरकटलेल्या मार्गातून वाटचाल करीत ईश्‍वराला ओळखत, तसेच सकलजनास ओळखण्यास सांगत होते. त्यामुळेच गुरुनानक आणि त्यांच्या'एकेश्‍वरवादा'च्या संकल्पनेविषयी कविराज अल्लामा इक्बाल म्हणतात...

फिर उठी आख़िर सदा तौहीद की पंजाब से
हिन्द को इक मर्द-ए-कामिल ने जगाया ख़्वाब से

- शेख हुसेन गुरुजी