आजच्या धकाधकीच्या आणि कमालीच्या वेगवान आयुष्यात माणूस अनेकदा आपली कर्तव्ये, सामाजिक व्यवहार आणि नैतिक मूल्ये यांचा समतोल विसरून जातो. रोजच्या या धावपळीत आपण एकतर खूप ताठर बनतो किंवा इतके मोकळेढाकळे होतो की आपल्या मूळ श्रद्धा आणि त्यातील मानवतावादी संदेशांपासून दूर भरकटतो.
हीच स्थिती 'दीन' (धर्म) आणि 'दुनिया' (जगणे) यांच्या नात्याबाबतही दिसते. कोणत्याही एका बाजूला पूर्णपणे झुकणे हे व्यावहारिक तर नाहीच, पण ते इस्लामच्या मूळ शिकवणीतही बसत नाही. इस्लाम मुळात समतोल आणि मध्यम मार्गाचा आग्रह धरतो. मात्र, बदलत्या काळानुसार हा तोल सांभाळणे अनेकांसाठी कठीण होऊन बसले आहे.
हीच गरज लक्षात घेऊन 'आवाज़ द व्हॉइस'ने 'दीन आणि दुनिया' या नावाने एका विचारप्रवर्तक पॉडकास्टची सुरुवात केली आहे. आजचा मुस्लिम समाज ज्या शंका, गोंधळ आणि गैरसमजांशी झुंजत आहे, त्यांच्याशी हा पॉडकास्ट थेट संवाद साधतो. धर्म आणि जगणे हे एकमेकांचे शत्रू नसून, योग्य समज असेल तर दोन्ही गोष्टी हातात हात घालून कशा चालू शकतात, हे मांडणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
पॉडकास्टच्या पहिल्या भागात हा उपक्रम सुरू करण्यामागची प्रेरणा आणि त्यामागची जय्यत तयारी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अनेक दिवसांच्या सखोल विचारमंथनानंतर हा कार्यक्रम आकाराला आला. आजच्या काळात अशा चर्चेची किती निकड आहे, हे पहिल्या भागातून स्पष्ट होते. हा संवाद माणसाला कोणत्याही टोकाच्या विचारसरणीकडे न ढकलतो, त्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवतो.
पहिल्या भागात प्रसिद्ध इतिहासकार साकिब सलीम आणि 'आवाज़ द व्हॉइस'चे एडिटर-इन-चीफ आतिर खान यांनी कार्यक्रमाच्या मूळ कल्पनेवर चर्चा केली आहे. या संवादातून केवळ कार्यक्रमाची पार्श्वभूमीच समजत नाही, तर येणाऱ्या भागांमध्ये कोणत्या विषयांवर मंथन होणार आहे, याचीही कल्पना येते. प्रामुख्याने भारतीय मुस्लिमांमध्ये धर्माबद्दल असलेले काही चुकीचे समज आणि एकांगी विचार दूर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. मुस्लिम समाजाने आधुनिक काळातील आव्हाने स्वीकारून आत्मविश्वासाने पुढे जावे आणि आपली श्रद्धा जगण्यापासून वेगळी न ठेवता ती जगण्याचाच एक भाग बनवावी, अशी यामागची भूमिका आहे.
आधुनिक शिक्षण, विज्ञान, महिलांचे अधिकार आणि सामाजिक प्रगती या गोष्टी इस्लामच्या विरोधात नाहीत. उलट त्या इस्लामचा मूळ आधार असलेल्या न्याय, करुणा आणि संतुलनाचाच विस्तार आहेत, यावर हा पॉडकास्ट भर देतो. दर आठवड्याला या कार्यक्रमात इस्लामिक विद्वान, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक विचारवंत सहभागी होऊन समकालीन मुद्द्यांवर साकिब सलीम यांच्याशी मनमोकळेपणाने बोलतील.
या चर्चेत प्रामुख्याने स्त्रियांची भूमिका, जुनाट रूढी, सामाजिक बदल आणि धार्मिक ओळख यांसारखे महत्त्वाचे विषय हाताळले जाणार आहेत. ही मांडणी कोणत्याही उपदेशाच्या थाटात नसून, अत्यंत सहज आणि व्यावहारिक असेल, जेणेकरून तरुण पिढी याच्याशी सहजपणे जोडली जाईल. आजच्या नकारात्मक बातम्यांच्या युगात 'आवाज़ द व्हॉइस'ने एक वेगळी आणि विधायक वाट निवडली आहे. सह-अस्तित्व आणि शांततामय जीवनाचे सकारात्मक विचार मांडणारे हे देशातील महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
आस्था, जात आणि भाषा यांच्या पलीकडे जाऊन आपल्या सर्वांची स्वप्ने आणि आव्हाने सारखीच आहेत. हाच समान धागा समाजाला जोडण्याची मोठी ताकद ठरू शकतो. 'आवाज़ द व्हॉइस' केवळ सकारात्मक पत्रकारिताच करत नाही, तर मुस्लिम समुदायामध्ये प्रगतशील विचारांची पेरणीही करत आहे. 'दीन आणि दुनिया' हे त्याच दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे. हा पॉडकास्ट धार्मिक जाणीव आणि आधुनिक जीवन यांच्यातील एक भक्कम पूल बनेल यात शंका नाही.
ज्यांना हा नवा दृष्टीकोन विकसित करायचा आहे, आणि जागरूक समाज घडवण्याच्या दिशेने पाऊल टाकायचे आहे, अशा प्रत्येकासाठी हा संवाद मार्गदर्शक ठरणार आहे. कारण 'आवाज़ द व्हॉइस'च्या 'दीन आणि दुनिया' पॉडकास्टमधून धर्माचे पालन करत असतानाच जगासोबत सुसंगत राहण्याचा वस्तुनिष्ठ मार्गही सुचवला जाणार आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -