निझामुद्दीन ते देवा शरीफ… देशभरातील सुफी संतांच्या अंगणात होळी साजरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
हजरत निझामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यातील होळीचे क्षण
हजरत निझामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यातील होळीचे क्षण

 

अर्सला खान

होळीला रंगांचा सण म्हटले जाते. पण देशातील काही सुफी दर्ग्यांमध्ये हा सण फुलांच्या सुगंधासोबत साजरा होतो. इथे गुलाल आणि पाण्याऐवजी गुलाब आणि झेंडूच्या पाकळ्या उधळल्या जातात. ही परंपरा केवळ एक उत्सव नाही. ती प्रेम, भाईचारा आणि 'गंगा-जमुनी तहजीब'चे जिवंत उदाहरण आहे. दिल्लीतील प्रसिद्ध हजरत निझामुद्दीन औलिया दर्गा आणि उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील देवा शरीफ दर्ग्यात खेळली जाणारी फुलांची होळी हाच संदेश पुढे नेते.

हजरत निझामुद्दीन औलिया हे चिश्ती परंपरेतील महान सुफी संत होते. त्यांनी आयुष्यभर माणुसकी, प्रेम आणि सेवेचा संदेश दिला. होळीच्या निमित्ताने त्यांच्या दर्ग्यात खास आयोजन केले जाते. दर्गा परिसर फुलांनी सजवला जातो. सुफी कलाम आणि कव्वालीची मैफील रंगते. 'आज रंग है री...' सारखी प्रसिद्ध सुफी गीते निनादतात. या सुरांनी संपूर्ण वातावरण आध्यात्मिक आनंदात न्हाऊन निघते. त्यानंतर भाविक एकमेकांवर फुलांच्या पाकळ्या उधळून होळी खेळतात.

या परंपरेमागे एक रंजक आख्यायिका आहे. अमीर खुस्रो हे हजरत निझामुद्दीन औलिया यांचे लाडके शिष्य होते. एकदा त्यांनी आपल्या गुरूंना उदास पाहिले. खुस्रो खूप काळजीत पडले. त्याच वेळी त्यांनी काही महिलांना होळी खेळताना पाहिले. तेही रंग आणि फुले घेऊन आपल्या गुरूंकडे पोहोचले. त्यांना खूश करण्यासाठी खुस्रोंनी होळीचे गीत गायले. हे दृश्य पाहून हजरत निझामुद्दीन औलिया यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तेव्हापासून दर्ग्यात होळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. सणाचा आनंदही टिकावा आणि दर्ग्याचे पावित्र्यही राखले जावे, यासाठी इथे रंगांऐवजी फुलांचा वापर केला जातो.

फुलांच्या होळीचा अर्थ केवळ उत्सव साजरा करणे एवढाच नाही. ते प्रेमाचे प्रतीक आहे. ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माणसातून जातो, अशी सुफी संतांची धारणा होती. लोक कोणताही भेदभाव न ठेवता एकमेकांवर फुले उधळतात. मनामनात द्वेष नसू नये, केवळ प्रेम असावे, हाच संदेश यातून मिळतो.

बाराबंकीच्या देवा शरीफमध्येही होळीच्या दिवशी अशीच खास रौनक पाहायला मिळते. हा दर्गा सुफी संत हाजी वारिस अली शाह यांचा आहे. बाराबंकीच्या या ऐतिहासिक ठिकाणी होळीच्या निमित्ताने मोठी गर्दी उसळते. इथेही आधी चादर चढवली जाते आणि दुवा मागितली जाते. त्यानंतर सुफी कलामच्या सुरांमध्ये फुलांची होळी खेळली जाते.

सुफी संतांनी नेहमीच माणसांना जोडण्याचे काम केले. त्यांच्या दारात धर्म किंवा जातीचा कोणताही भेदभाव नसतो. होळीसारख्या मोठ्या हिंदू सणाच्या दिवशी दर्ग्यामध्ये फुलांची होळी खेळली जाते. सण केवळ एका समुदायाचा नसून तो सर्वांचा असतो, हाच मोठा संदेश यातून मिळतो. इथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायाचे लोक एकत्र येतात. या दिवशी दर्ग्यात हजेरी लावल्याने नात्यांमध्ये गोडवा वाढतो आणि मनातील इच्छा पूर्ण होते, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे.

वाईटावर चांगल्याचा विजय आणि प्रेमाचा प्रसार हाच होळीचा खरा संदेश आहे. दर्ग्यांमध्ये जेव्हा फुलांची उधळण होते, तेव्हा हा संदेश अधिक गडद होतो. इथे कोणतीही चढाओढ नसते, किंवा कसलाही दिखावा नसतो. इथे असते ती फक्त दुवा, चेहऱ्यावरचे हास्य आणि भाईचाऱ्याचे वातावरण. आजच्या काळात समाजाला एकतेची नितांत गरज आहे. माणसांची मने जोडतो, तोच खरा रंग असतो. निझामुद्दीन औलिया आणि देवा शरीफची ही फुलांची होळी आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देते. रंग कदाचित वाळून जातील, पण फुलांचा सुगंध आणि प्रेमाचा संदेश कायम दरवळत राहतो. हीच या दर्ग्यांमध्ये खेळल्या जाणाऱ्या होळीची खरी ओळख आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter