हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक दौलताबादची हजरत चाँद बोधले यांची दर्गाह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
दौलताबादच्या हजरत चाँद बाबा दर्ग्यात उत्सवात सहभागी हिंदू-मुस्लीम बांधव.
दौलताबादच्या हजरत चाँद बाबा दर्ग्यात उत्सवात सहभागी हिंदू-मुस्लीम बांधव.

 

दौलताबाद : येथील ऐतिहासिक देवगिरी किल्याच्या पायथ्याशी असलेल्या सुफी संत हजरत चाँद बोधले यांच्या दर्ग्यावर हिंदू मुस्लिम ऐक्याचा मिलाप रविवारी (ता. २४) रात्री बघायला मिळाला. दर्ग्यात एका बाजूला हिंदू बांधवानी भजन गायन केले तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम बांधवानी कव्वाली (मिलाप) सादर केली. या रंगतदार सोहळ्याची सांगता सोमवारी पहाटे सहेरीने झाली.

मुस्लिम बांधवांनी भजनाला दाद देत भजनाचा आंनद लुटला तर हिंदू बांधव कव्वालीत दंग झाले. हा अविस्मरणीय हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मिलाप यावेळी भाविकांनी अनुभवला. हजरत चांद बोधले (चंद्रबोध स्वामी) यांच्या वार्षिक संदल उत्सवाला रविवारी (ता. २४) मध्यरात्री सुरुवात झाली.

दोन वर्षे कोरोनाच्या प्रदूर्भावाने हा उत्सव साजरा करताना मर्यादा होत्या. परंतु, यंदा प्रति वर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात हा उरूस साजरा करण्यात आला. एकीकडे राज्यात हिंदू-मुस्लिम समाजात असहिष्णुतेचे वातावरण आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राजकारणी मतांच्या ध्रुवीकरनाकरिता विविध पर्याय आजमावत आहेत. यात शहरांचे नामांतर असो की मस्जिदवरचे भोंगे उतरवा आणि हनुमान चालीसाचे पठण करा, असा मुद्दा उपस्थित करून यावरून जोरदार वाद सुरु आहेत.

मात्र दुसर्‍या बाजूला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या दौलताबाद शहरामध्ये हिंदू-मुस्लीम वादाला फाटा देत एका सुफी संतांच्या दर्ग्यामध्ये एका बाजूला कव्वाली तर दुसऱ्या बाजूला भजनाचा कार्यक्रम होत आहे. अगदी देशात होळी व रंगोत्सव सुरु असताना एका बाजूला मुस्लीम बांधवांनी कव्वाली गायनाचा कार्यक्रम केला तर दर्ग्यामध्ये समाधीच्या दुसऱ्या बाजूला हिंदू बांधवांनी भजन गायले.

हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेला हा अप्रतिम सोहळा सुफी संत हजरत चांद बोधले (चंद्रबोध स्वामी) महाराजांच्या कबरीवर गेल्या शेकडो वर्षापासून चालत आलेला आहे. आणि हा सोहळा सध्या सुरू असलेल्या द्वेषाच्या वातावरणाला उत्तर देणारा ठरतोय. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या दर्ग्यावर महाराष्ट्रासह इतरही राज्यातून हिंदू व मुस्लिम समाजाचे भाविक भेट देत असतात. सध्या महाराष्ट्रासह भारतात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होईल,  असे वातावरण निर्माण केले जात आहे.

शहराचे नामांतर झाल्याने एक समुदाय खुश तर दुसरा समुदाय नाराज झाल्याने निवडणुकीचे राजकीय गणित राजकारणी बांधत आहेत. महाराष्ट्रात कधी हनुमान चालीसा तर कधी मस्जितीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून राजकीय फायदा उचलण्यासाठी वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना या महाराष्ट्राला सुफी संतांचा वारसा लाभलेला आहे व हिंदू मुस्लिम येथे शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. ही परंपरा कायम राहावी, यासाठी आपल्या दौलताबाद परिसरात असलेल्या सुफी संतांचा दर्गा हा महत्वाचा दुवा ठरत आहे.

दौलताबाद परिसरात असलेल्या या दर्ग्याचे वैशिष्ट्य असे की हा दर्गा सुफी संत हजरत चाँद बोधले यांचा असून हे मुस्लिम धर्माचे पवित्रस्थान तर हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून परिसरात ओळखले जाते. या दर्ग्याच्या उत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्य दिसून येते.

रमजान महिन्याच्या तेराव्या रोजच्या सायंकाळी या उत्सवाला सुरुवात होते. सायंकाळी मुस्लिम बांधव जियारत (प्रार्थना) करतात. तर, हिंदू बांधव पूजा अर्चा करतात. या नंतर गोड भात (न्याज) असलेले जेवण दोन्ही समाजाचे बांधव करतात व रात्री नऊच्या नमाजनंतर उरुसाला मुस्लिम बांधव कलमा पढतात व पायथ्याला हिंदू बांधव भजन करतात. या नंतर पहाटे सहेरीनंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात येते. हजरत चाँद बोधले हे हिंदू असल्याचे हिंदू भाविक सांगतात ते नाशिक जिल्यातील सिन्नर तालुक्यातील रहिवाशी असल्याचे काही धार्मिक ग्रंथात नोंद आहे.

ते सुफी संत होतें ते पायी धर्म प्रचार करत. हिंदू आणि मुस्लिम संतांची भूमी असलेल्या देवगिरी गडावर आले व याच परिसरात स्थायिक झाले. पैठणचे संत एकनाथ महाराज यांचे गुरू व देवगिरी किल्ल्याचे तत्कालीन किल्लेदार संत जनार्दन स्वामी यांचे ते गुरू असल्याचे दर्ग्याचे मुजावर सांगतात. तर, संत जनार्धन स्वामी यांनी त्यांच्याकडून गुरूदीक्षा घेतली होती, अशी माहिती मुजावर जमिरोद्दीन शेख देतात.

तर जनार्धन स्वामी हे त्यांचे गुरू असल्याची माहिती हिंदू ग्रथ अभ्यासक देतात. अशी ही हिंदू-मुस्लिम एकत्रित गुरू परंपरा आपल्याला येथे बघावयास मिळते. त्या काळी दौलताबाद खुलताबाद, छत्रपती संभाजी नगर परिसरात मोठ्या संख्येने हिंदू-मुस्लिमांसह सुफी संत महंत वास्तव्यास होते व आजही या सुफी संत व महंतांचे मठ दर्गा परिसरात बघावयास मिळतात.

अशा या सुफीसंतांचा उत्सव मोठ्या उत्साहात येथे नेहमीच साजरा केला जातो. नाथांच्याबरोबर जनार्दनस्वामी नाशिक-त्र्यंबकेश्र्वरच्या तीर्थ यात्रेस गेले होते. तेथे नाशिकच्या चंद्रबोध नावाच्या ब्राह्मणाशी त्यांची भेट झाली. श्रीगोंदे येथील सिद्धांत बोधकर्ते शेख महंमद हे याच चंद्रबोध स्वामींचे शिष्य होते. जनार्दनस्वामींना साक्षात दत्ताचा अनुग्रह असल्याची आख्यायिका आहे. परंतु काही ग्रंथ नोंदीवरून त्यांना उपदेश श्री नृसिंहसरस्वतींनी दिल्याचे सांगतात.

श्री नृसिंहसरस्वतींचे निर्याण शके १३८० मधील व जनार्दनस्वामींचा जन्म शके १४२६ मधील नाथांच्या अभंगगाथेत जनार्दनस्वामींच्या नावे असलेल्या अभंगांतील पहिले चौदा अभंग नृसिंहसरस्वतींना उद्देशून आहेत. अलीकडे जनार्दनपंतांचे गुरू नेमके कोण या विषयाही मतभेद होत आहेत.

ॐ नमोजी श्रीसद्गुरू चांद बोधले ।
त्यांनी जानोपंता अंगिकारलें ।
जानोबानें एका उपदेशिलें।

'दास्यत्वगुणें' असे शेखमहंमद आपल्या ‘योगसंग्राम’ नावाच्या ग्रंथात म्हणतात म्हणून चांदबोधले – जनार्दन व शेख महंमद – एकनाथ अशी नवीनच परंपरा सांगितली जाते. नाथांची गुरु परंपरा या प्रमाणे सूफी पंथीय चांदबोधल्यांकडे जाते. चंद्रभट ब्राह्मण कालांतराने सूफी झाले व त्यांचाच उपदेश जनार्दनपंतांना होता. परंतु या नव्या संशोधनास एकनाथांच्या वाङ्ममयात फारसा आधार नाही. हा सगळा संशोधणाचा विषय राहील सध्या देशाला सुफी संतांच्या शिकवणीनुसार सर्वधर्म समभाव अंगीकारणे हिताचे ठरेल.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter