नितीन सावंत परभणीकर
कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळगड हा शौर्याची गाथा सांगणारा किल्ला तर आहेच, पण तिथे गंगा-जमुनी संस्कृतीचा आणि हिन्दु-मुस्लिम आध्यात्मिक विचारांचा संगमही झाला आहे. पन्हाळ्याचे ग्रामदैवत आणि सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर शाहदुद्दीन खतालवली यांचा उरूस सध्या मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. ९०० वर्षांहून अधिक काळ सामाजिक सलोख्याचा वारसा जपणारा हा सोहळा महाराष्ट्रात रुजलेल्या सुफी परंपरेचे दर्शन घडवतो. या उरुसानिमित्त, इराणमधून पन्हाळ्यावर आलेल्या या महान संताचा इतिहास आणि गडावरील त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण दर्गा यांचा इतिहास आणि वैशिष्ट्य सांगणारा विशेष लेख…
"या जगातील सर्व गोष्टी नष्टत्व पावतात, देव मात्र एकटा अक्षय रहातो"
(हजरत पीर शहादुद्दीन कत्तालवली उर्फ सादोबा यांच्या दर्ग्यातील कबरीवरील वाक्य)
निसर्गाच्या समृद्ध वारशाने संपन्न असलेली ही भारतीय भूमी, बौद्ध-चिनी प्रवासी ह्युएनत्सांग आणि फाहियानपासून तर अरबस्तानातून आलेल्या अनेक सुफींपर्यंत सर्वांना अत्यंत मोहित करणारी ठरलेली आहे. भारतीय भूमीला सर्वोच्च असे स्वर्गाचे विशेषण वापरणे, या भूमीला 'स्वर्ग' म्हणून संबोधणे, या देशासाठी अत्यंत गौरवाचे आहे.
भारतीय भूमीबद्दल अमीर खुसरो म्हणतात,
"हस्त मेरा मौलीद व मावा वत्तन,
किश्वरे हिंद बहिश्ते बर जमीन"
(हिंद माझी जन्मभूमी आणि हिंद माझा देश आहे. आणि तो पृथ्वीवरील स्वर्ग आहे.)
एवढेच काय, सुफी संतांनी वसवलेल्या शहराला 'जन्नतचे शहर' (खुल्ताबाद) हे नाव देणे हे या भूमीचे मोठेपण सांगणारे तर आहेच, शिवाय ही उदार, व्यापक आणि सर्वव्यापी दृष्टी लाभलेले ते महान सुफी देखील किती मोठ्या मनाचे होते, हे आपल्याला लक्षात घ्यावे लागते. नाहीतरी शेतकऱ्यांना 'नागरगट्ठे' म्हणून हिणवणारे समूहदेखील या देशात आहेतच.

हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतीय भूमीची आणि येथील गोरगरीब जनतेची सेवा करून, या मातीत देह ठेवणाऱ्या अनेक सुफींच्या मजारी, दर्गे आणि पीर आपल्याला इतिहासाच्या पाऊलखुणा दाखवत आहेत. कोल्हापूरच्या मजारी, पीर आणि दर्ग्यांच्या विश्वात पन्हाळा किल्ल्यावरील 'सादोबा' दर्गा असेच आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही.
कोल्हापूर शहरापासून साधारणतः २० किमी अंतरावर पन्हाळगडाच्या प्रवेशद्वार असलेल्या दरवाजाजवळ हा सुंदर, मनमोहक दर्गा आहे. हा दर्गा अंदाजे १५ गुंठे परिसरात असून बाजूला असणाऱ्या दोन्ही ऐतिहासिक तलावांच्या मध्ये आहे. तत्कालीन राज्यकर्ता इब्राहिम आदिलशहाच्या कारकिर्दीत त्याचा मुख्य वजीर खिजर खान याने हा दर्गा बांधलेला आहे. दर्ग्याच्या प्रवेशद्वारासमोरील पराशर तलाव अत्यंत जुना मानला जातो. त्याचे बांधकाम बहामनी आणि शिलाहार राजांच्या राजवटीतही झाल्याचे समजते.
दर्ग्याच्या कमाणीवर लिहिलेले "हजरत पीर शहादुद्दीन कत्तालवली . दर्गाह पन्हाळा" हे ठळक अक्षरातील नाव पाहताच क्षणी आपले लक्ष वेधून घेते. या छोट्या दरवाजावजा कमानीतून आत प्रवेश केला की, अत्यंत सुंदर दगडी नक्षीकाम केलेल्या अनेक मजारी आपल्याला दिसू लागतात. महाराष्ट्रातील इतर मजारींपेक्षा या मजारींवरील दगडावर केलेले नक्षीकाम आणि रचना अत्यंत वेगळी असल्याचे आपल्या लक्षात येईल.
अधिक माहिती घेतली असता त्या 'तुर्की' पद्धतीच्या असल्याची माहिती स्थानिक मुस्लिमांकडून मिळाली. या प्रकारच्या नक्षीदार मजारी महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही नाहीत. या मजारी मुख्य दर्ग्याच्या समोरील भागात एका रांगेत आहेत. मुख्य दर्ग्यात प्रवेश केल्याबरोबर आतमध्ये एकूण तीन मजारी आहेत. डाव्या हाताकडील मुख्य मोठी मजार हजरत शाहदुद्दीन कत्ताल वली . यांची आहे.
मधली छोटी मजार त्यांचे सुपुत्र मासूम साहब . यांची आहे. फार वर्षांनी हजरत शाहदुद्दीन कत्ताल वली यांना ही पुत्रप्राप्ती झाली होती, परंतु लहान वयातच मासूम साहब यांचा मृत्यू झाला. मासूम साहब यांच्या मजारीवर सुफी संत शाहदुद्दीन कत्ताल वली यांनी आपल्या पुत्रप्रेमापोटी फारसी भाषेत अतिशय हृदयस्पर्शी कविता कोरल्या आहेत. तिसरी मजार त्यांच्या पत्नी माँसाहेबी . यांची आहे.
स्थानिक लोकभाषेत 'सादोबा' (साधू बाबा) म्हणून प्रसिद्ध असणारे हे सुफी संत इराण देशातील जनजाण प्रांतातून १२ व्या शतकात साधारणतः ९०० वर्षांपूर्वी संपूर्ण कुटुंबासह पन्हाळगडावर आले होते. त्यांचा काळ इ.स. १३७६ ते १३९७ चा आहे. या काळात शाहदुद्दीन बाबांना बहामनी राजांकडून शाही संरक्षण मिळाले.
इ.स. १३४७-१५२७ या काळात हा किल्ला जरी बहामनी मुस्लिमांच्या राजवटीत असला, तरी स्थानिक किल्लेदार मराठा (शिर्के) होते. सादोबा बाबा पहिल्यांदा पन्हाळ्यावर आले, तेव्हा त्यांनी त्या परिसरात पहिली मुस्लिम वस्ती 'नबीपूर' (नेबापूर) नावाने स्थापन केली. सादोबा यांचे वडील इराणचे बादशाह होते. एकेश्वरवादाच्या प्रचारासाठी त्यांनी राजवैभवाचा त्याग केला आणि ते महाराष्ट्रात आले.
पन्हाळगडावरील सादोबा यांच्या कबरीवर आणि आजूबाजूला फारसी भाषेतील अनेक शिलालेख आहेत. या दर्ग्याचे बांधकाम विजापूरचे बादशाह इब्राहिम आदिलशहा दुसरे यांचे वजीर खिजर खान यांच्या देखरेखीत झाले आहे. पुढे पन्हाळा मोगलांकडे गेल्यानंतर औरंगजेबानेही दर्ग्याला भेट दिल्याचे दाखले मिळतात.
मराठा राजवटीत हा दर्गा पन्हाळा परिसराचे 'ग्रामदैवत' बनला आणि उरुस उत्सवाला लोकाश्रय मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या मंदिरातून दरवर्षी उरुसाच्या काळात सादोबा दर्ग्यास गलेफ चढवण्याची प्रथा आहे. ही प्रथा आजही पन्हाळा तहसीलदार यांच्या माध्यमातून 'सरकारी गलेफ' म्हणून सुरू आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या दर्ग्याच्या देखभालीसाठी जमीन इनाम दिली होती आणि सोन्याचा नारळही दान दिला होता.
मुस्लिम हिजरी दिनदर्शिकेप्रमाणे रज्जब महिन्याच्या २४ तारखेला हा उरूस भरतो. आदल्या दिवशी सर्वधर्मीय महिला माँसाहेबांची ओटी भरतात. हा दर्गा आदिलशाही आणि शिवकाळापासून आजही सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून लोकांच्या मनात वंदनीय आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईपासून ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत येथे समतेचे दर्शन घडवणारे अनेक महापुरुष होऊन गेले.
सुफी परंपरेनेही या शहरात माणुसकी आणि समतेचा विचार पेरला आहे. सुफींनी कधीही भेदभाव पाळला नाही; त्यांनी सर्वांना एकाच पंगतीत स्थान दिले आणि लोकांचे दुःख दूर केले. म्हणूनच आजही जनता म्हणते की, बाबांच्या दरबारात गेल्यावर समस्यांवर उपाय निघतोच. हजरत पीर शहादुद्दीन कत्ताल वली यांच्या कवनाप्रमाणे— हे जग नश्वर असले, तरी ईश्वरी तत्त्व आणि माणुसकीचा हा वारसा मात्र अक्षय राहतो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -