३४ वर्षांनंतर बंगालमध्ये घुमला सलोख्याचा स्वर; हुगळीच्या जागतिक इज्तेमातून शांततेचा संदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुनावर हुसेन 

नवीन वर्षाच्या सुरुवातीला, २ ते ५ जानेवारी २०२६ या काळात पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील पोइनान (दादपूर) येथे १६० एकरच्या विस्तीर्ण मैदानात 'जागतिक इज्तेमा' पार पडला. १९९१-९२ नंतर, म्हणजेच तब्बल ३४ वर्षांनंतर बंगालच्या भूमीवर हा महान आध्यात्मिक सोहळा परतला होता. विविध माहितीनुसार, या सोहळ्यात भारतासह जगातील ९० हून अधिक देशांतून ५० लाखांपासून ते १ कोटीपर्यंत (काही अहवालांनुसार ८० लाखांहून अधिक) भाविकांनी सहभाग घेतला होता.

या सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या १० ते १२ पत्रकारांशी मी संवाद साधला. विशेष म्हणजे हे सर्व पत्रकार गैर-मुस्लिम होते. यामध्ये टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी, बंगाली आणि हिंदी वृत्तपत्रांचे बातमीदार आणि यूट्यूब चॅनेलचे पत्रकार होते. या सर्वांच्या बोलण्यातून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे एवढी प्रचंड गर्दी असूनही हा सोहळा अत्यंत शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडला. या चार दिवसांत ना कोणती राजकीय विधानबाजी झाली, ना कोणावर टीका झाली. कोणाही नेत्याची स्तुती करण्यात आली नाही किंवा कोणत्याही पंथाविरुद्ध चकार शब्द काढला गेला नाही. या पूर्ण आयोजनाचा केंद्रबिंदू केवळ इस्लामची शिकवण, शांतता, बंधुभाव, नैतिक मूल्ये आणि मानवाचे कल्याण हाच होता. तबलिगी जमातचे जागतिक अमीर मौलाना साद कांधलवी यांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या प्रभावशाली भाषणांनी या सोहळ्याला एक वेगळीच आध्यात्मिक उंची प्राप्त करून दिली.

या आयोजनाचा सर्वात सुखद आणि सकारात्मक पैलू म्हणजे इज्तेमाच्या परिसरात असलेल्या दुकानांपैकी ८० टक्क्यांहून अधिक दुकाने गैर-मुस्लिम बांधवांची होती. खाण्यापिण्याचे स्टॉल्स, चहाच्या टपऱ्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने हिंदू दुकानदारांनी थाटली होती. इतकेच काय, तर काही महिलाही न घाबरता आपल्या स्टॉलवर बसल्या होत्या. जेव्हा पत्रकारांनी या दुकानदारांना विचारले की, "एवढ्या मोठ्या मुस्लिम समुदायात दुकान लावताना तुम्हाला भीती वाटली नाही का?" तेव्हा प्रत्येकाने हसतमुख चेहऱ्याने एकच उत्तर दिले, "आम्हाला अजिबात भीती वाटली नाही." हा विश्वास म्हणजेच हिंदू-मुस्लिम सलोख्याचा जिवंत पुरावा आहे, जो आजच्या काळात दुर्मिळ होत चालला आहे.

या महान सोहळ्याने समाजासमोर काही महत्त्वाचे धडे ठेवले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा मोठा जनसागर पूर्णपणे संयमित राहिला. यामुळे स्थानिक हिंदू बांधवांमध्ये हा विश्वास निर्माण झाला की, मुस्लिमांच्या अशा धार्मिक मेळाव्यांमुळे शांतता आणि सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होत नाही. गैर-मुस्लिम दुकानदारांशी कोणीही भेदभाव केला नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आजच्या या राजकीय वातावरणात कोणत्याही पक्षाच्या नेत्याने याविरोधात चिथावणीखोर विधान केले नाही. हे सर्व घटक मिळून एक सुंदर संदेश देतात की, कितीही मोठे धार्मिक कार्यक्रम असले तरी ते पूर्ण शांततेत आणि प्रेमाने साजरे होऊ शकतात.

या इज्तेमामुळे समाजात कायमस्वरूपी आध्यात्मिक किंवा सामाजिक बदल होईल की नाही, हे मला ठाऊक नाही. कारण सोशल मीडियावर आजकाल अनेक चांगले विचार सांगितले जातात, पण प्रत्यक्ष कृती मात्र कमी दिसते. मात्र, हुगळीतील हे चार दिवस एक उदाहरण बनून राहिले आहेत. जेव्हा नियत शुद्ध असते, नियोजन पक्के असते आणि एकमेकांचे सहकार्य लाभते, तेव्हा द्वेष आणि भीतीची जागा शांतता आणि विश्वास घेऊ शकतो. हे विलोभनीय दृश्य पाहून मनाला खूप आनंद झाला आणि वाटले की, हे आपल्या सर्वांसोबत शेअर करावे. कारण, शांतता हाच खरा धर्म आहे आणि सलोखा हीच आपली खरी ताकद आहे.

(पब्लिकेशन डिव्हिजन, लेखक माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाचे संयुक्त संचालक आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter