मानवाधिकार हा भारतीय संस्कृतीचा गाभा - आरिफ मोहम्मद खान

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान

 

"जगात धर्म, भाषा, प्रांत आणि वर्णाच्या आधारे द्वेष व हिंसेची भाषा बोलली जात होती. म्हणूनच १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला (यूएन) मानवाच्या प्रतिष्ठेच्या आधारावर मानवाधिकारांचे वैश्विक घोषणापत्र स्वीकारावे लागले, पण हजारो वर्षांपासून सार्वभौमिक सर्वसमावेशकतेचा दृष्टिकोन अवलंबिणारी भारतीय संस्कृती प्रत्येक व्यक्तीत दिव्यतेची प्रचिती अनुभवते. मानवाधिकार हा या संस्कृतीचा गाभा आहे," असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

बालगंधर्व रंगमंदिर येथे चाणक्य मंडल परिवाराच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी चाणक्य मंडलचे संस्थापक व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, भूषण केळकर, पूर्णा धर्माधिकारी आदी उपस्थित होते. चाणक्य मंडलचे माजी विद्यार्थी आणि सध्या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ३२ यशस्वीतांचा प्रवास मांडणारे 'यशोगाथा' हे पुस्तक, तसेच प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.

लोकशाही भारताला नवीन नसल्याचे मत खान यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, "गाव पातळीवर असलेली पंचायत आणि गणराज्यांमुळे लोकशाही भारताला नवीन नाही. त्याची नवी प्रक्रिया आपल्या आधी आत्मसात करणाऱ्या देशांनी महिलांना मताचा अधिकार नाकारला होता. आपण मात्र स्वातंत्र्याबरोबरच सर्वाना मताचा अधिकार सुनिश्चित केला. हे केवळ आपल्या संस्कृतीमुळे शक्य झाले." आपण आपल्या देशाचा सांस्कृतिक ठेवा जगाला समजावू शकलो नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

धर्माधिकारी यांनी इतिहासाच्या पुनर्लेखनाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, "आपला देश आणि संस्कृतिबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या जात आहे. साम्राज्यवादी शक्तीनी भारतीय सभ्यतेला अंधश्रद्धा ठरविले होते.
 
भारताच्या इतिहासाची तथ्याधारीत मांडणी करणाऱ्या विद्वानांना सत्तेच्या ताकदीवर दूर केले गेले. आजही शाळा आणि महाविद्यालयांतील पुस्तकांतून चुकीचा इतिहास शिकविला जातो. आमच्या पुस्तकांचे प्रकाशन हे त्याला दिलेले छोटे प्रत्यूत्तर आहे."

आरिफ मोहम्मद खान म्हणाले ...
  • भारतीय संस्कृती ही ज्ञान आणि प्रज्ञेची संस्कृती
  • विश्वगुरू ही भूमिका आहे, पद नव्हे
  • आपल्या देशाला ज्ञानाची सशक्त परंपरा
  • ज्ञान प्राप्त करणे हा मानवाचा जन्मसिद्ध अधिकार
  • आपल्याकडील कुरितींमुळे जातींची उतरंड
  • मठांनी नव्हे तर विचारांनी एकता येते