मानवाधिकार दिन :१४०० वर्षांपासून एका परीक्षेत आपण वारंवार नापास होतोय!

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 Months ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

ओवैस सकलेन अहमद

तिचे नाव होते 'बेबी जेन डो'. तिला तिची ओळख लपवायची होती म्हणून हे नाव दिले गेले नव्हते, तर तिची खरी ओळखच हिरावून घेण्यात आली होती. मॅनहॅटनमधील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये एका इंडोनेशियन घरकामगार महिलेला एका शक्तिशाली कुटुंबाने क्रूरपणे गुलाम म्हणून ठेवले होते. त्यांनी तिचा पासपोर्ट जप्त केला होता. दिवसातील १६-१६ तास तिला राबवून घेतले जायचे आणि त्या बदल्यात तिला कवडीमोलाचा मोबदला मिळायचा. हे आधुनिक गुलामगिरीचे एक ढळढळीत उदाहरण होते.

हिंमत एकवटून ती तिथून पळून गेली. तिला आश्रय मिळाला आणि तिने या गुन्ह्याची तक्रार केली. पण इथे एक मोठी अडचण आली. तिचे मालक, माजी राजनयिक मिशाल अल-हसन आणि त्यांची पत्नी यांना 'राजनैतिक संरक्षण' होते. त्यामुळे कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत.

हा एकच प्रसंग नाही. हा अन्याय म्हणजे जागतिक संकटाची फक्त एक छोटीशी झलक आहे. आपण जे बोलतो आणि जे वागतो, यात खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. ही 'अदृश्य अर्थव्यवस्थे'ची वास्तविकता आहे. आज जगात २ कोटी ७६ लाख (२७.६ मिलियन) लोक वेठबिगारीत किंवा सक्तीच्या मजुरीत अडकले आहेत. यातील एक तृतीयांश पेक्षा जास्त लोक मानवी तस्करीचे बळी ठरले असून त्यांना घरकामासाठी जुंपले गेले आहे.

केवळ घरकामाच्या क्षेत्रात या क्रूर शोषणातून वर्षाला अंदाजे २.६ अब्ज डॉलर्सचा बेकायदेशीर नफा कमवला जातो. जागतिक स्तरावर, सक्तीच्या मजुरीतून २३६ अब्ज डॉलर्सची उलाढाल होते. ही एक अशी अर्थव्यवस्था आहे जी समाजातील सर्वात कमकुवत लोकांच्या जीवावर उभी आहे.

पण प्रश्न हा उरतोच: जेव्हा तुमचा दर्जा आणि विशेषाधिकार न्यायाच्या आड येतात, तेव्हा तुमची खरी किंमत कशावरून ठरते?

आपण आधुनिक गुलामगिरीबद्दल अशा गप्पा मारतो की जणू हा इतिहासजमा झालेला विषय आहे. पण तसे नाही. हे आजही घडतेय. मोठमोठ्या लक्झरी अपार्टमेंट्समध्ये. अगदी आता, या क्षणी. ही परीक्षा जवळपास १४०० वर्षे जुनी आहे. ही परीक्षा तुमचा प्रभाव मोजत नाही, तर तुमचा 'विवेक' तपासते.

दरवर्षी १० डिसेंबरला आपण 'मानवाधिकार दिन' साजरा करतो. न्यायाबद्दलचे मोठे इन्फोग्राफिक्स आणि पोस्ट शेअर करतो. पण घरी आल्यावर, आपली फरशी पुसणाऱ्या व्यक्तीला विचारतो का की, "तुम्ही जेवलात का?" उलट आपण त्यांना उशिरापर्यंत काम करायला लावतो.

चौदाशे वर्षांपूर्वी, प्रेषित मोहम्मद (स.) यांनी मदिनेच्या बाजारात सलमान अल-फारसी नावाच्या एका व्यक्तीला खजूरच्या झाडाच्या फांद्या वाहून नेताना पाहिले. सलमान स्वतंत्र नव्हते. ते वेठबिगारीत अडकले होते. ते इतके जड ओझे वाहत होते की, सामान्य माणसाचे कंबरडे मोडेल.

प्रेषितांनी तिथे कोणतेही भाषण दिले नाही. त्यांनी त्यातील काही फांद्या स्वतः उचलल्या आणि सलमान यांना मदत केली. जेव्हा सलमानच्या मालकाला हे समजले, तेव्हा तो संतापला. तो म्हणाला, "तुम्ही माझ्या गुलामाला मदत केली?"

त्यावर प्रेषितांचे उत्तर साधे आणि स्पष्ट होते: "तो कराराने तुमचा सेवक असण्याआधी, माणुसकीच्या नात्याने तुमचा भाऊ आहे."

काही आठवड्यांतच सलमान मुक्त झाले. पुढे जाऊन ते इस्लामच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात आदरणीय व्यक्तींपैकी एक बनले.

कुराण स्पष्टपणे सांगते:

"हे मानवांनो! आम्ही तुम्हाला एका पुरुष आणि एका स्त्रीपासून निर्माण केले आहे आणि तुम्हाला विविध समाज व कुळांमध्ये विभागले आहे, जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. अल्लाहच्या दृष्टीने तुमच्यात सर्वात सन्माननीय तोच आहे, जो सर्वात जास्त सदाचारी आहे." (४९:१३)

तुमच्या कामाचे पद तुमची किंमत ठरवत नाही, तर तुमचे चारित्र्य ठरवते.

२०२२ मध्ये कतारमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान, प्रसिद्ध फुटबॉलपटू मोहम्मद सलाह याने एक टी-शर्ट परिधान केला होता. त्यावर लिहिले होते: "कामगारांच्या हक्कांसाठी उभे राहा."

त्यावर लगेच प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी म्हटले, "फक्त खेळावर लक्ष दे," तर काहींनी सुनावले, "राजकारण करू नकोस."

पण सलाहला त्या स्टेडियमच्या उभारणीसाठी राबणाऱ्या स्थलांतरित मजुरांबद्दल माहित होते. त्यांचे मृत्यू, मजुरीची चोरी आणि जप्त केलेले पासपोर्ट याबद्दल त्याला कल्पना होती. नंतर त्याने स्पष्ट केले, "माझे आजोबा बांधकाम मजूर होते. जर त्यांच्या हक्कांचा आदर केला गेला नसता, तर कितीही प्रार्थना करून परिस्थिती सुधारली नसती."

प्रेषित मोहम्मद एकदा म्हणाले होते: "अत्याचाराबद्दल तुमचे मौन तुम्हाला त्या अत्याचारात सहभागी करते."

इस्लामचा पहिला घटनात्मक दस्तऐवज प्रार्थनेच्या वेळापत्रकाबद्दल नव्हता. इसवी सन ६२२ मध्ये लिहिलेली 'मदिना सनद' (Medina Charter) ही कामगारांच्या हक्कांची सनद होती. त्यातील कलम १५ मध्ये म्हटले होते: "कामगारांचा घाम सुकण्याआधी त्यांना त्यांची मजुरी मिळाली पाहिजे." कधीतरी मिळेल असे नाही, तर त्वरित मिळाली पाहिजे.

कलम २३ मध्ये तर आणखी पुढे जाऊन म्हटले होते: "कोणत्याही कामगारावर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त बोजा टाकला जाऊ नये आणि कोणत्याही कामासाठी त्याच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली जाऊ नये."

जेव्हा एका श्रीमंत व्यापाऱ्याने कामगारांचे पैसे देण्यास उशीर केला, तेव्हा प्रेषित पहाटेच त्याच्या घरी गेले. त्यांनी विचारले, "ज्यांनी तुमच्यासाठी कष्ट करून हे वैभव कमावले, ते चिंतेत झोपले आहेत आणि तुम्ही रेशमी गादीवर शांत कसे झोपू शकता?" त्या कामगारांची मजुरी त्याच सकाळी दिली गेली.

आज आखाती देशांमध्ये अंदाजे २४ लाख (२.४ मिलियन) घरकामगार राबत आहेत. यातील अनेक महिला दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतून आलेल्या आहेत. त्यांनी वर्षाानुवर्षे आपल्या कुटुंबीयांना पाहिलेले नाही.

दुबईमध्ये काम करणाऱ्या आयशाचे उदाहरण घ्या. ती बांगलादेशची आहे. तिच्या मालकाने तिचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवून घेतला आहे. हे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे, पण ती तक्रार कोणाकडे करणार? ती दिवसाचे सोळा तास काम करते. जेव्हा तिने कायद्याने मिळालेली आठवड्याची सुट्टी मागितली, तेव्हा तिच्या मालकाने म्हटले, "तुझा धर्म तुला संयम शिकवत नाही का?"

शोषण करण्यासाठी कोणाच्या तरी श्रद्धेचा हत्यार म्हणून वापर करणे म्हणजे इस्लाम नाही. ही धार्मिक सबबीखाली केलेली क्रूरता आहे.

एकदा प्रेषितांनी पाहिले की त्यांची पत्नी एका सेवकाला भांडे फोडल्याबद्दल रागावत होती. त्यांनी तिला थांबवले आणि विचारले, "तुमच्या मुलीकडून अशी चूक झाली असती, तर कोणी तिच्याशी असे बोललेले तुम्हाला चालले असते का?"

नंतर ते सेवकाकडे वळले आणि म्हणाले, "तिने जे तोडले (भांडे) त्याची काहीतरी किंमत आहे. पण शब्द जे तोडतात - तुमची प्रतिष्ठा - ती अमूल्य आहे."

सत्य हेच आहे की, सांस्कृतिक प्रथा म्हणजे इस्लामिक तत्त्वे नाहीत. महिलांना बंधनात ठेवणे? ही परंपरेच्या नावाखाली केलेली सांस्कृतिक सोय आहे. कामगार परदेशी आहेत म्हणून त्यांना कमी पगार देणे? हे धार्मिक कारण देऊन केलेले आर्थिक शोषण आहे. "आम्ही त्यांना पगार देतो" असे म्हणून आराम नाकारणे? ही पगाराच्या बदल्यात केलेली आधुनिक गुलामगिरी आहे.

खरा श्रद्धाळू कोण, असा प्रश्न प्रेषितांना विचारला गेला होता. त्यांच्या उत्तराचा तुमच्या फॉलोअर्सच्या संख्येशी किंवा तुमची पोस्ट किती परफेक्ट दिसते, याच्याशी काहीही संबंध नव्हता. त्यांचे उत्तर होते: "जे तुमच्यासाठी काहीही करू शकत नाहीत, अशा लोकांशी तुम्ही कसे वागता, यावर ते अवलंबून आहे."

खरे समर्थन म्हणजे "आपल्या माणसांचा" बचाव करणे आणि इतरांवर होणाऱ्या अन्यायाकडे दुर्लक्ष करणे नव्हे. परदेशातील अन्यायाबद्दल पोस्ट करणे आणि आपल्याच स्वयंपाकघरातील शोषणाला सामान्य मानणे, हे योग्य नाही. आपली फरशी पुसणाऱ्या व्यक्तीमध्येही तोच ईश्वरी अंश आहे जो आपल्यात आहे, हे मान्य करणे म्हणजे खरी माणुसकी.

धर्मग्रंथ स्पष्ट आहेत. ऐतिहासिक उदाहरणे नोंदवलेली आहेत. कुराणातील वचने स्पष्ट आहेत. प्रेषितांनी सलमानला मुक्त केले ते 'ट्रेंड' होते म्हणून नाही, तर ते 'योग्य' होते म्हणून. सलाहने आवाज उठवला तो स्वतःच्या ब्रँडिंगसाठी नाही, तर गप्प राहिल्याने त्याचा विवेक मेला असता म्हणून. इस्लाममधील मानवाधिकार गुंतागुंतीचे नाहीत. फक्त ज्यांना दुसरीकडे बघायचे आहे, त्यांच्यासाठी ते गैरसोयीचे आहेत.

यंदाच्या मानवाधिकार दिनी, जगाच्या पाठीवर कुठे तरी होत असलेल्या अन्यायाबद्दल पोस्ट करण्याआधी, आपल्या आसपास बघा. तुमच्या जागेत अशी एखादी व्यक्ती काम करत आहे का, जिचे नाव तुम्हाला माहित नाही पण जिच्या कष्टावर तुमचे अवलंबून आहे?

त्यांचे नाव जाणून घ्या. त्यांच्या कुटुंबाची चौकशी करा. त्यांना वेळेवर पगार मिळतोय ना, याची खात्री करा. त्यांना हक्काच्या सुट्ट्या द्या. जसे तुम्ही तुमच्या मुलाला वागवता, तसेच त्यांनाही वागवा.

तुमची श्रद्धा एखाद्या ॲपवरील प्रार्थनेच्या संख्येवरून मोजली जात नाही. ज्यांना तुमच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, अशा लोकांशी तुम्ही कसे वागता, यावर ती मोजली जाते. असा मजकूर किंवा वागणूक खऱ्या अर्थाने 'व्हायरल' झाली पाहिजे.

संदर्भ सूची:

  • इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO): "मॉडर्न स्लेव्हरीचा जागतिक अंदाज" (२०२१)

  • इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO): "नफा आणि गरिबी" (सप्टेंबर २०२४)

  • द स्वॅडल: १७ वर्षीय घरकामगार मुलीचे प्रकरण (गुडगाव)

  • ह्युमन राइट्स वॉच: आखाती देशांतील घरकामगारांची स्थिती

  • कुराण: सूरह अल-हुजुरत (४९:१३)

  • हदीस: सुनन इब्न माजाह २४४३

  • इस्लामिक ऐतिहासिक स्रोत: सलमान अल-फारसी आणि प्रेषित मोहम्मद यांची चरित्रे