भारतीय संस्कृती कधीही लोप पावणार नाही - जावेद अख्तर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 6 Months ago
जावेद अख्तर
जावेद अख्तर

 

छत्रपती संभाजीनगर : या देशाने वर्षानुवर्षे राजसत्ता आणि स्थित्यंतरे पाहिली. औरंगजेबाने ५१ वर्षे राज्य केले. पण हा देश हिंदुस्थान राहिला. गंगा-यमुनेला आपण प्रदूषित केले. पण प्रत्येक देशात जमिनीखाली सरस्वतीची धारा अजूनही वाहते आहे. सरस्वती लुप्त नाही, तर ती वाहते आहे. तशीच भारतीय संस्कृती देशाचा आत्मा आहे. ती संपणार नाही. तर सरस्वतीप्रमाणे प्रवाहित राहील, असा विश्वास गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केला.

९ व्या ‘अजिंठा वेरूळ’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जावेद अख्तर यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सिनेमा, संस्कृती, स्त्रीविषयक सामाजिक दृष्टिकोन अशा विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. 
भारतीय संस्कृती कायम प्रवाहित राहील
‘वर्षानुवर्षे स्त्रीचे शोषण केल्यावर तुम्ही स्त्रीला देवी संबोधता, मॉँ की इज्जत करता हुं असे म्हणता, तेव्हा स्त्रीला देवत्व बहाल करता. पण तिला माणूस म्हणून वागविणे नाही. तिचे अधिकार डावलता’, अशी भूमिका त्यांनी मांडली. देश प्रगत झाला, असे म्हणताना आम्ही ८० कोटी लोकांना आम्ही पाच किलो धान्य देतो. हा कुठला विकास आहे? आपली वितरण व्यवस्था सदोष आहे, हे समजून घेतले पाहिजे. अशा असंतुलनात राग, द्वेष, उद्विग्नता जन्माला येते, असेही ते म्हणाले.

टोकाचे देशप्रेम का दाखवायचे?
देशात खूप संभ्रम आहे. स्वातंत्र्यलढ्यात आपण एक होतो. हळूहळू आपण स्वतःकडे वळलो आणि स्वतःचा विचार करू लागलो. पूर्वीपेक्षा आता संघर्ष थोडा कमी झाला. पण मीपणा वाढला. तुम्ही स्वतःसाठी किती जगता, याचीही सीमा असायला हवी. अलीकडे देशप्रेमाचेही उदात्तीकरण होत आहे. ५० वर्षांपूर्वी अंगावर लाठ्या झेलणारे, देशप्रेमी नव्हते का? तर ते होते. पण आपल्याला टोकाचे देशप्रेम दाखवायचा अट्टहास का निर्माण झाला, असा सवाल अख्तर यांनी उपस्थित केला.

आताच्या चित्रपटांत अर्थहीन हिंसा
चित्रपटांच्या वाटचालीबद्दल जावेद अख्तर म्हणाले, मध्यंतरीच्या काळातील सिनेमाचा दर्जा सोडला तरीही त्या काळातील नायक काम करणारे, संघर्षाने पोट भरणारे होते. आताचे हिरो यांना काहीच काम नसते. ते थेट स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवर पाय ठेवतात. म्हणजेच आजच्या कथानकात सामाजिक विषय बाजूला ठेवून वैयक्तिक समस्यांवर भर दिला जातो. आता श्रीमंत लोक श्रीमंतांसाठी सिनेमा बनवतात. जो संघर्ष ''दो बिघा जमीन'' सिनेमात दिसला, तो आजच्या सिनेमात व्यक्त होणार नाही. अर्थहीन हिंसा दाखवताना हिंदी सिनेमा सामाजिक विषयावरून दूर जातोय.

वेरूळ लेण्या पाहून अंतर्मुख
इतक्या वर्षांमध्ये मी वेरूळ (एलोरा) लेणी का पाहिल्या नाही, असे आज वाटले. या लेणी कुणी कुठल्या मोबदल्यात नाही तर जिद्दीने आणि जाणीवपूर्वक बनवल्या. या प्रामाणिकतेचा एक हजारावा हिस्सा जरी आपण अंगीकारला तरी देशाचा स्वर्ग होईल, असे भावोद्गार जावेद अख्तर यांनी काढले.

अगोदर भाषा समजून घ्या
भाषा म्हणजे संवादाचे माध्यम आणि आज मातृभाषेला आपण दूर सारले आहे. आज भाषेमुळे संवाद होत नाही. इंग्रजी भाषा शिकायलाच हवी. पण मातृभाषेचा बळी देऊन नाही. दिल्ली पोलिसांनी नुकतेच १५० शब्द बदलायला सांगितले. कारण ते लोकांना समजत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे ऑक्सफर्ड डिक्शनरी नवीन शब्द जोडते. भाषा शब्द काढून बनत नाही, हे समजून घ्या, असे अख्तर म्हणाले.