संतांची भूमी असलेल्या मंगळवेढ्यातील सलतीफ बुवा हे मंगळवेढ्यातील एक मुस्लिम संत. खोमनाळ नाक्याजवळ मुख्य रस्त्याच्या लगत लतीफ बुवांचा दर्गा आहे. लतीफ बुवांचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते धमनि मुस्लिम असूनही कृष्णभक्त होते. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दुवा सांधणारा महाराष्ट्राच्या मातीतील हा दुसरा संत. वारकरी संप्रदायात शेख महंमद यांनी विठ्ठल भक्तीवर लिहिलेल्या अभंगातून त्यांची समन्वयवादी दृष्टी आपल्याला कळते. तशाच पद्धतीने कृष्णभक्तीचे काव्य लिहून संत लतीफ बुवांनी हा समन्वय पुन्हा एकदा उंचीवर नेल्याचे दिसते.
लतीफ शाह नामक एक संत विजापूरच्या शहरातून मंगळवेढ्याला आले होते. मंगळवेढ्यात आल्यावर ते लिंगायत धर्मीयांच्या मठात थांबले होते. पुढे लिंगायत आचार्यांनी त्यांना तिथेच राहण्यास आग्रह धरला आणि ते शेवटपर्यंत मंगळवेढ्यातच आपले सामाजिक व आध्यात्मिक कार्य करत राहिले. आज मंगळवेढ्यात संत लतीफ शाह यांची समाधी असणारा एक दर्गा आहे. बाजूला लतीफ शाह यांच्यासोबत आलेल्या इतर सहकारी संतांच्याही समाध्या आहेत.
लतीफ शाह यांच्याबद्दल सकल संत गाथेत एक अभंग समाविष्ट आहे. म्हणजे हे संत वारकरी संप्रदायात सर्वानुमते मान्यताप्राप्त आहेत. या मान्यतेचा आणखी एक पुरावा असा, की संत तुकोबाराय सुद्धा या संताचा उल्लेख करतात तो असा की, 'कबीर लतीफ मोमीन मुसलमान, सेना न्हावी जान विष्णुदास' म्हणजे संत लतीफ शाह हे सुफी संत होते. त्यामुळे त्यांची समाधी दर्याच्या स्वरूपात आहे. ते लिंगायत धर्मातही प्रिय आहेत आणि वारकरी संतांचे तर ते प्राणप्रिय आहेत. इतका एकात्म संत सापडणे मुश्कील, ज्याअर्थी, संत तुकोबाराय हे संत लतीफ शाह यांचा उल्लेख आपल्या अभंगात करतात, त्याअर्थी ते संत तुकोबारायांच्या आधीचे असण्याचा निकष आपण बांधू शकतो. रा. चिं. ढेरे यांनी आपल्या मराठी मुसलमान संतकवी या ग्रंथात लतीफ शाह यांच्याबद्दल लिहिताना त्यांचा एक अभंग समाविष्ट केला आहे, तो असा...
आता पूजा कुठे वाहू। पहाता देहीच झाला देवू ।।
भावे पूजन करिता। देही देव झाला तत्त्वतः ।।
तोडू गेलो तुळशीपान । तेथे अवघा मधुसूदन ।।
अत्र गंध पुष्प धूप। अवघे विठ्ठल स्वरूप ।।
फल तांदूळ नैवेद्य । पहाता अवघाची गोविंद ।।
म्हने लतीफ ब्रम्हज्ञानी। अवघा पहाता चक्रपाणी ।।
आणि वारकरी धर्माच्या मान्यताप्राप्त सकलसंत गाथेत त्यांचा दुसरा अभंग खालीलप्रमाणे समाविष्ट आहे...
बाजरगीर देख नहीं उपजता नहीं गावदी। आंखया होके दुनिया आंधी ।।
आजब आजब हूं इस तनका । घडी पहेर खेल है नहीं गारुडका ।।
राजा और रंक एक राह सबकी। मट्टी हो जाय घडी पलख तनकी ।।
कहे लतीबशा गुरु मिल जद हमकू। संसार झुटा गारुड हो गया तबकू
- इंद्रजित घुले