मजले गावात शेकडो वर्षांपासून हनुमान मंदिरात केली जाते पंजाची स्थापना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गावात एकही मुस्लिम समाजाचे घर नसतानाही मजले (ता. हातकणंगले) येथे शेकडो वर्षांपासून गावातील सर्व समाजाचे लोक एकत्र येत उत्साहात आणि भक्तिभावाने मोहरम साजरा करत आहेत. या माध्यमातून मजले ग्रामस्थांनी सर्व धर्मसमभावाचा एक आदर्शच ठेवला आहे. विशेष म्हणजे गावातील हनुमान मंदिरात या पंजाची स्थापना केली जाते.

मजलेला मोहरमची ऐतिहासिक परंपरा आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजार आहे. गावांमध्ये एकही मुस्लिम समाजाचे घर नाही. तरीही येथे मोहरम उत्साहात साजरा केला जातो. गावातील मुख्य चौकात असलेल्या हनुमान मंदिरामध्ये दरवर्षी नऊ सवाऱ्याची स्थापना केली जाते. त्यांची सर्वच धर्मातील ग्रामस्थांकडून विधिवत पूजा केली जाते. 

पीर पंजा याच हनुमान मंदिरामध्ये स्थापन केल्यापासून ते विसर्जनापर्यंत गावात पूर्णतः मांसाहार वर्ज्य आहे. नवव्या दिवशी खत्तलरात्र म्हणून हनुमान मंदिरासमोर खाई केली जाते व त्या खाईमधून पीर पंजा यांना नेण्यात येतो. शेवटच्या दिवशी गावामध्ये गोड जेवण करून पाहुण्यांना बोलवण्यात येते व मोहरमची सांगता होते.