काश्मीरमधील खीर भवानी मेला, हमदानी उर्स सौहार्दाचे प्रतिक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
काश्मीरमधील खीर भवानी मेला आणि हमदानी उर्समधील क्षण
काश्मीरमधील खीर भवानी मेला आणि हमदानी उर्समधील क्षण

 

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी खीर भवानी मेला आणि हजरत मीर सय्यद अली हमदानी यांच्या उर्सच्या एकत्रित साजरेपणाचं स्वागत करत याला काश्मीरमधील सांप्रदायिक सौहार्दाचं प्रतीक म्हटलं. देशाच्या प्रगतीसाठी एकतेची गरज अधोरेखित करत त्यांनी सर्वांना बंधुभाव जोपासण्याचं आवाहन केलं.

अब्दुल्ला म्हणाले, “खीर भवानी मेला आणि हजरत हमदानी यांचा उर्स एकत्र साजरा होणं आनंददायी आहे. खोऱ्यात बंधुभाव आहे, हा देशभर पसरावा. एकत्र राहिलो तरच प्रगती होईल.” खीर भवानी मेला हा काश्मिरी पंडितांचा महत्त्वाचा उत्सव असून, गंदरबालच्या तुल्ला मुल्ला येथील खीर भवानी मंदिरात होतो. हे मंदिर दुर्गेच्या राग्न्या देवी स्वरूपाला समर्पित आहे.

पहलगाममधील २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर वैष्णोदेवी मंदिरातील भाविकांची संख्या कमी झाल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. “कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात यावं, लोकांनी भेट द्यावी. पहलगाम हल्ल्यामुळे भीती आहे, त्याचा परिणाम देशभर जाणवला,” असं त्यांनी सांगितलं.

अब्दुल्ला यांनी पर्यटकांना जम्मू-काश्मीरला परत येण्याचं आवाहन केलं, “आम्हाला शांतता हवी, युद्ध नको. निरपराधांच्या हत्या थांबाव्या.” पहलगाम हल्ल्याने पर्यटन आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर—टॅक्सी चालक, हॉटेल मालक, खेचर मालक—विपरीत परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. “यंदा कोट्यवधी पर्यटक अपेक्षित होते, पण हल्ल्याने सर्व थांबलं. कृपया परत या, अमरनाथ यात्रा सुरू होत आहे, भोलनाथ तुमची वाट पाहत आहेत,” असं भावनिक आवाहन त्यांनी केलं.

खीर भवानी मेल्याला मोठी उपस्थिती हा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर असल्याचं अब्दुल्ला यांनी म्हटलं. काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी जमीन आणि निवास सुविधांची गरज त्यांनी अधोरेखित केली.