महाशिवरात्रीचा उत्सव हा दरवर्षी हिवाळ्याच्या उत्तरार्धात, म्हणजेच फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो. भगवान शंकराला समर्पित केलेला हा दिवस वर्षातून एकदाच येतो. नुकताच महाशिवरात्रीचा उत्सव भारतभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये देखील महाशिवरात्रीचा उत्साह पाहायला मिळाला.
महाशिवरात्रीच्या पवित्र प्रसंगी श्रीनगरमधील प्रसिद्ध शंकराचार्य मंदिरात श्रद्धाळूंची मोठी गर्दी दिसून आली. हा दिवस काश्मीरमध्ये 'हेराथ' म्हणून ओळखला जातो. या दिवशी विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यानिमित्ताने तेथील पंडित समुदाय रातभर प्रार्थना करतात आणि मातीच्या भांडयामध्ये अक्रोडाचा नैवेद्य चढवतात.
शंकराचार्य मंदिर हे दल सरोवराच्या वरती असलेल्या एका डोंगरावर स्थित आहे. यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात जाणा-या भाविकांची संख्या लक्षणीय होती. पाऊस आणि धुक्याचे वातावरण असतानाही भाविकांनी लांब रांगा लावून मंदिराच्या घसरड्या पाहिऱ्या चढण्याचे धाडस दाखवले. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भाविकांनी अवघड चढाई केली परंतु त्यांच्यातील उत्साह थोडाही कमी झालेला दिसला नाही.
यावेळी स्थानिक प्रशासनाने महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती. प्रशासनाने मंदिर आणि इतर प्रार्थना स्थळांवर सुरक्षा व्यवस्थेची योग्य काळजी घेतली. त्यामुळे भाविकांची कोणतीही गैरसोय झाली नाही.
शंकराचार्य मंदिरात दर्शन घेण्यासाठी मुंबई, दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातून देखील भाविक सहभागी झाले होते. यावेळी 'आवाज द व्हॉईस' सोबत संवाद साधताना दिल्लीच्या कृतिकाने म्हटले की, "महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी शंकराचार्य मंदिरात येऊन खूप आनंद झाला. इथे वातावरण खूप आध्यात्मिक आणि प्रसन्न आहे. प्रशासनाने भाविकांची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आहे."
या धार्मिक सोहळ्यात स्थानिक नागरिकांनी विशेष सहभाग घेतला आणि काश्मीरसह संपूर्ण भारतात समृद्धी शांती आणि सुख पसरण्यासाठी प्रार्थना केली. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि इतर नेत्यांनीही काश्मीरी जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नागरिकांना या धार्मिक उत्सवात पारंपरिक पूजा विधींचा देखील अनुभव घेता आला. सर्वांच्या सहभागाने मंदिराच्या आजूबाजूला आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. काश्मीरच्या स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनीही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. या उत्सवाच्या निमित्ताने काश्मीरच्या सांस्कृतिक वारशाची महत्त्वपूर्ण झलक पहायला मिळाली.