दीडशे वर्षांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची ऐतिहासिक परंपरा असलेल्या येथील मोहरमनिमित्त आज गगनचुंबी ताबूत भेटीचा सोहळा झाला. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या सोहळ्याला राज्यासह कर्नाटक सीमाभागातून सुमारे लाखांवर भाविकांनी उपस्थिती लावली. अलोट उत्साहात ताबूत भेटीवेळी उपस्थित भाविकांनी ‘दुला दुला’ व ‘मौला अली झिंदाबाद’ असा एकच जयघोष केला.
येथे मोहरमनिमित्त सोहोली, निमसोड व शिवाजीनगर येथील मानकऱ्यांनी आज सकाळी पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरात ताबुतांची पूजा केली. दुपारी बारा वाजता सातभाईचा मानाचा ताबूत उचलण्यात आला. त्यानंतर ताबूत भेटीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. दुपारी साडेबारा वाजता बागवान यांचा ताबूत उचलण्यात आला. या दोन्ही ताबुतांची पटेल चौकात दुपारी एक वाजता भेट झाली. हे ताबूत मिरवणुकीने मुख्य भेटीच्या ठिकाणी निघाले असता वाटेत शेटे, आत्तार, देशपांडे, हकीम, तांबोळी यांचेही ताबूत मिरवणुकीत सहभागी झाले. येथील सुरेशबाबा देशमुख चौकात शेख, इनामदार तसेच सुतार यांचे उंच ताबूत व मजूदमाता ताबूतही दाखल झाले.
देशमुख, शिंदे, शेटे, देशपांडे, कुलकर्णी आदी मानकऱ्यांनी पंजे भेटीच्या ठिकाणी आणले. यावेळी बुधवार पेठ मेल व शुक्रवार पेठ मेल यांच्यात नाथपंथीय गीतांचे सामने झाले. राष्ट्रीय एकात्मतेची गीते गायली गेली. मानकऱ्यांनी तांबुतांची पूजन केल्यानंतर दुपारी दोन वाजता सुमारे लाखावर भाविकांच्या अलोट उत्साहात आणि 'दुला दुला' व 'मौला अली झिंदाबाद'च्या जयघोषात येथे मोहरमनिमित्त मानाप्रमाणे सर्व तांबूतांच्या भेटींचा सोहळा झाला. बागवान यांचा ताबूत जागेवर पोहोचल्यावर आजच्या या सोहळ्याची सांगता झाली.
आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार अरुण लाड, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जितेश कदम, विश्वतेज देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, प्रांताधिकारी रणजित भोसले, तहसीलदार अजित शेलार, मुख्याधिकारी पवन म्हेत्रे आदींसह नगरसेवक, हिंदू-मुस्लिम बांधव, भाविक व नागरिक उपस्थित होते.
- संतोष कणसे