नब्ज़: मुस्लीम समाजाचे सांस्कृतिक प्रतिबिंब

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 20 d ago
‘नब्ज़’ या ईद विशेषांकाचे मुखपृष्ठ
‘नब्ज़’ या ईद विशेषांकाचे मुखपृष्ठ

 

प्रेषित मुहम्मद यांना झालेल्या साक्षात्कारातील पहिला शब्द होता ‘इकरा’. या शब्दाचा अर्थ आहे वाचने किंवा शिकणे. यावरून इस्लाममधील ज्ञानाचे महत्व अधोरेखित होते. आज सभोवताली जातीधर्मात द्वेष पसरवणाचे प्रमाण वाढले आहे. वाचनाचा अभाव, सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे आणि कट्टरवादी विचारसरणीमुळे तरुण पिढी विद्वेषकडे ओढली जात आहे. व्हॉट्सअॅप युनिव्हरसिटीद्वारे परधर्मियांविषयी गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे अन्य धर्मियांविषयी विशेषता मुस्लिम समजाविषयी लोकांच्या मनातील पूर्वग्रह दूर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या धर्माविषयी, संस्कृतीविषयी जाणून घेणे. 

हीच गरज ओळखून परस्परांची धार्मिक संस्कृती, भाषा, खानपान, वेशभूषा यांची ओळख करून देण्याचे काम ‘नब्ज़’ करत आहे. नब्ज़ हा महाराष्ट्रातील पहिला ईद विशेषांक. महाराष्ट्रातील दिवाळी अंकांच्या परंपरेच्या धर्तीवर ईद विशेषांक प्रकाशित व्हावा या कल्पनेतून मिनाज लाटकर गेल्या ४ वर्षांपासून नब्ज़चे प्रकाशन करतात. 

शाहू महाराजांच्या मुस्लिम बोर्डिंगमध्ये प्रकाशन 
कोल्हापूरमधील मुस्लिम बोर्डिंग येथे 'नब्ज' या ईदोत्सव अंकाचे नुकतेच प्रकाशन झाले. अंकाचे प्रकाशन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिप्पूरकर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तन्वी शेख, माजी महापौर निलोफर आजरेकर, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण यांच्या हस्ते झाले. 
 

वाचनातून संस्कृतीचा संवाद
नब्जच्या संकल्पनेविषयी बोलताना संपादक मिनाज लाटकर म्हणाल्या की, “मला ज्यावेळी दिवाळी अंक या संकल्पनेबद्दल समजले त्यावेळी दिवाळी अंकांसारखाच ईदला सुद्धा आपण असा एखादा अंक प्रकाशित करावा असा विचार माझ्या मनात आला. २०२१ पासून मी नब्ज़चे प्रकाशन सुरू केले. गेल्या काही वर्षांत आपल्या सभोवताली हिंसेचे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणात समाजात एकता कशी टिकून राहील यासाठी मी प्रयत्नात आहे. नब्ज़च्या माध्यमातून दोन्ही समाजांना एकमेकांच्या संस्कृतींची ओळख आणि समजाविषयीचे गैरसमज देखील दूर करण्याचे काम केले आहे.” 

त्या पुढे म्हणतात, “समाजात कटुता निर्माण होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे एकमेकांच्या धर्मांबद्दल पसरलेले गैरसमज. आज समाजात बहुसंख्यांक आणि मुस्लिमांमध्ये कोणत्याच पद्धतीचा संवाद होत नाही. हे दोन्ही घटक एकमेकांच्या सान्निध्यात राहूनही एकमेकांच्या संस्कृतींबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या दोन्ही घटकांमध्ये संवादाची बीजं रुजवण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. फक्त दाढी, टोपी, हिजाब म्हणजे मुस्लिम समाज नाही तर या पलीकडेही या समाजाची वेगळी ओळख आहे. मुस्लिम समाजातील चांगुलपणाची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे नब्ज़ आहे.”

‘ईद विशेषांक’ विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नाही
नब्ज़ अंकामध्ये दडलेले विचार आणि भावना केवळ एका विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित नाहीत. यामध्ये सलोख्याच्या एक व्यापक दृष्टिकोनदेखील पाहायला मिळतो. अगदी कमी वेळात महाराष्ट्रभरातील वाचकांपर्यंत नब्ज़ कसा पोहोचला याविषयी संपादक मीनाज लाटकर सांगतात, “महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागात देखील नब्ज़चा वाचकवर्ग विखुरलेला आहे. एवढेच नाही तर अनेक भागांमधून आम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया येतात. साहित्याशी संबंध नसलेल्या अगदी सर्वसामान्य कष्टकरी वर्गातील माणूसही नब्जशी जोडला गेला आहे. कोल्हापूरमधील एका खाटीकाला हा अंक इतका महत्त्वाचा वाटला की त्यांनी त्यांच्या दुकानात दर्शनी भागात तो ठेवलेला होता. ग्राहकांनी तो पाहावा अशी त्यांची भावना होती.”

त्या पुढे म्हणतात, “नब्ज़ हा केवळ इस्लाम किंवा मुस्लिमांपुरता मर्यादित नाही. आपल्या भारत देशाला हिंदू-मुस्लिम सौहार्दाचा मोठा इतिहास लाभलेला आहे. ही परंपरा पुढेही अशीच सुरू राहावी यासाठी नब्ज़च्या माध्यमातून मी काम करत आहे. यंदाच्या अंकामध्ये संपादकीय विभागात मी एकतेच्या परंपरेचे एक उदाहरण दिले आहे. मथुरेमधील एक मुस्लिम कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून भगवान श्रीकृष्णासाठी आकर्षक पोशाख तयार करते. या परंपरेला काही लोकांकडून विरोध करण्यात आला. परंतु तेथील काही पूजऱ्यांनी पोशाख तयार करणाऱ्याचे समर्थन केले. हा पोशाख तयार करण्याची त्या कुटुंबाची जुनी परंपरा आहे आणि ही विशिष्ट कला फक्त त्यांनाच जमते, असे पूजऱ्यांचे म्हणणे होते. आपल्या देशाची हीच सौहार्दाची परंपरा मला टिकवून ठेवायची आहे.” 

मुस्लिमांच्या संस्कृतीत योगदानाची दखल 
नब्ज़ अंकामध्ये मिनाज यांनी भारतीय इस्लामिक संस्कृतीवर विशेष भर दिला आहे. मुस्लिमांनी भारतीय संस्कृतीत दिलेल्या योगदानाबद्दल संपादक मीनाज लाटकर म्हणतात, “सर्वच मुस्लिम राजे चांगले नव्हते. परंतु, अकबर, शेरशहा सुरी, रजिया सुलतान आणि चांदबिबी यांच्यासारख्या अनेक राजांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी अनेक कामे केली. त्यामुळे हिंदू असो किंवा मुसलमान कोणत्याही शासकाचे मूल्यमापन हे त्याच्या काळाच्या कसोटीवरच करायला हवे. अशा व्यक्तींचे योगदान सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”  

त्या पुढे म्हणतात, “भारताच्या स्थापत्यकलेच्या इतिहासात मुस्लिम शासकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी  अनेक भव्य वास्तूंची निर्मितीच केली नाही, तर भारतीय स्थापत्यकलेत अनेक नवीन शैली आणि तंत्रज्ञानाचा समावेश केला. या काळात दोन्ही संस्कृतींच्या परस्पर संवादातून अनेक कलाप्रकारांची निर्मिती झाली. या कलांमध्ये हिंदू आणि इस्लामी घटकांचे मिश्रण दिसून येते. 

मराठी साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रांत मुस्लिमांनी भरीव योगदान दिले आहे. याविषयी मिनाज सांगतात, “अब्दुल रहमान, नज़रुल इस्लाम, अमीर खुसरो आणि मिर्झा गालिबपासून ते आपल्या कलेतून गंगा-जमनी तहजीब, हा उदारमतवाद आयुष्यभर जोपासणाऱ्या झाकीर हुसेन यांच्यासारख्या मुस्लिम कवींनी आणि कलाकारांनी भारतीय कला आणि संस्कृतीला समृद्ध केले. सुफी संतांनी प्रेमाचा, शांतीचा आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या परंपरांची ओळख नब्जच्या माध्यमातून करून देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे.” 
 

त्या पुढे म्हणतात, “महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मुस्लिमांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठी साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रांत मुस्लिमांनी मोठे योगदान दिले आहे. संत कवी शेख महंमद यांच्यापासून ते आधुनिक काळातील हमीद दलवाई, रफिक सूरज, इलाही जमादार, खलील मोमीन यांच्यापर्यंत अनेक मुस्लिम साहित्यिकांनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. तरीही मुसलमानांचा मराठीशी काय संबंध, अशी मानसिकता रुजवली जात आहे. त्यामुळे नब्ज म्हणजे समाजाची नाडी आणि हीच नाडी जिवंत ठेवण्यासाठी मी हा ईदोत्सवाचा अंक तयार केला. जेणेकरून ईदची अन् इस्लामची सांस्कृतिक परंपरा सर्वांपर्यंत पोहोचेल.”

नेमकं काय आहे यावर्षीच्या ‘नब्ज ईद विशेषांकात’ 
'नब्ज' हा ईद विशेषांक म्हणजे साहित्य, कला आणि संस्कृतीचा एक अनोखा संगम आहे. हा विशेषांक मानवी भावनांना स्पर्श करतो आणि विचारांना नवीन दिशा देतो. या अंकातून ईदच्या सणाचा आनंद तर साजरा होतोच, शिवाय मानवतेच्या मूल्यांचा गहिरा आलेखही उलगडतो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नब्जने वाचकांना विशेष पर्वणी दिली आहे. नब्जच्या सूचिमधील 'कला-संस्कृती दर्पण' या विभागात आशय गुणे, विजय विनित, कौस्तुभ पटाईत या लेखकांनी कलेतील विविध पैलू आणि सांस्कृतिक वारसा यांचे सुंदर दर्शन घडवले आहे. 'परीघ ओलांडताना' या विभागात रेणुका कल्पना,हुमायून मुरसल या लेखकांनी सामाजिक बंधने आणि मर्यादा ओलांडून नव्या विचारांचा स्वीकार करण्याचा संदेश देणारे लेख लिहिले आहेत. 

'विचारमंथन' या विभागाच्या माध्यमातून कुणाल पुरोहित, अंजली चिपलकट्टी, मुक्ता चैतन्य या लेखकांनी जीवन, धर्म, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांवर सखोल चिंतन मांडले आहे. ‘इन्सानियत की कहानियाँ’ या विभागात रफिक सूरज, प्रदीप आवटे, बशीर मुजावर, मोहम्मद रफिक या लेखकांनी माणुसकीच्या हृदयस्पर्शी कथा लिहिल्या आहेत. या कथांमधून प्रेम, करुणा आणि एकता यांचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला आहे. शेवटी 'हकीकत' हा विभागात विशद कुमार, शहेबाज म. फारुक मनियार, लक्ष्मीकांत देशमुख, दत्ता देसाई, डॉ. मेधा पानसरे, प्रकाश अकोलकर, रजिया सुलताना या लेखकांनी वास्तवाचे प्रामाणिक चित्रण केले आहे. यामध्ये सामाजिक वास्तव, संघर्ष आणि त्यावर मात करण्याच्या कहाण्या आहेत.

मुस्लीम समाजाचे सांस्कृतिक प्रतिबिंब मराठी साहित्यात अभावाने दिसते. दिवाळी अंकांची मोठी साहित्यिक परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात मुस्लीम संस्कृतीचे हे प्रतिबिंब पडावे, या समाजाविषयी, त्यांच्या संस्कृतीविषयी इतरांना माहिती व्हावी, त्यातून धार्मिक सौहार्दाला हातभार लागावा या उद्देशाने प्रसिद्ध होणाऱ्या नब्ज रमजान विशेषांकाला आणि त्यांच्या टीमला आवाज मराठीच्या शुभेच्छा…
    
- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter