जळगाव शहरात गुरुवारी सांयकाळी 'पेहरन-ए-शरीफ'ची मिरवणूक सर्वधर्मीयांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात काढण्यात आली. सुर्दशन चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पेहरण मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. काहींनी डोली खालून निघताना मागणे मांगितले. शहरासह जिल्हाभरातून सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने त्यातून एकात्मतेचे दर्शन घडले.
शहरातील या उत्सवाला सुमारे १००हून अधिक वर्षांची परंपरा आहे. उर्दू वर्षानुसार मोहरमच्या १४ तारखेला हा उत्सव साजरा करतात. सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन म्हणजेच तब्बरूकचे (पवित्र वस्त्र) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी येथे हजेरी लावली. शहरातील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांच्या आणलेल्या पेहरन अर्थात पवित्र वस्त्रांना सजविलेल्या डोलीत ठेवण्यात आले होते. बाबुजीपुरा मोहल्ला समितीकडून हा उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी धार्मीक गीत (नाते पाक) गात मिरवणूक काढण्यात आली. डांगपुरा येथून सायंकाळी मिरवणुकीला सुरवात झाली. उत्सवात हिंदू-मुस्लिमसह सर्वधर्मीय बांधव सहभागी झाल्याने त्यातून एकात्मतेचे दर्शन घडले. येथे जळगाव जिल्ह्यासह मुंबई, मालेगाव, बहऱ्हाणपूर, सुरत, खंडवा येथील भाविक आले होते. पेहरन शरीफ मिरवणूक सुर्दशन चौकात दाखल झाल्यावर येथे विविध मान्यवरांनी मिरवणुकीचे स्वागत केले.
उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष शेख नईम, उपाध्यक्ष मोहसिन खान, शेख शाहिर, सचिव निसरारूद्दीन, सहसचिव इरफान खानसह सदस्यांनी परिश्रम घेतले. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.