नाशिक
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे नागरिकांना तात्पुरता त्रास होत असल्याची कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. एकाच वेळी सर्व कामे सुरू झाल्यामुळे नाशिककरांना सध्या अडचणींचा सामना करावा लागत असून जनतेचा रोष आणि टीका सहन करावी लागत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर हेच नागरिक आपले स्वागत करतील आणि कामाचे कौतुक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तीन दिवसीय 'सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम' कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, परिवर्तन एका रात्रीत होत नाही. चांगल्या कामासाठी काहीशी टीका सहन करण्याची तयारी ठेवावी लागते, मात्र प्रकल्प जनहित डोळ्यासमोर ठेवून आणि पारदर्शकतेने झाले पाहिजेत. कुंभमेळ्यासाठी अवधी कमी असल्याने वेळेत काम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. स्थानिक अधिकारी आणि यंत्रणा या कामासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की, कुंभमेळ्यासाठी 'साधुग्राम' ज्या जमिनीवर उभारले जात आहे, ती जमीन सरकार अडीच हजार कोटी रुपये देऊन कायमस्वरूपी खरेदी करणार आहे. भविष्यातील सर्व कुंभमेळ्यांसाठी या जमिनीचा उपयोग केला जाईल. भारतीय संस्कृती ही जगातील प्राचीन संस्कृती असून महाकुंभ हा आपल्या संस्कृती, परंपरा आणि विविधतेचा एक महान आविष्कार आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी 'सिंहस्थ सहायक समिती'च्या संकेतस्थळाचे आणि मोबाईल अप्लिकेशनचेही उद्घाटन केले.