मेला खीर भवानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची गांदरबलला भेट; मंदिरातील सोयी-सुविधांची पाहणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला माता खीर भवानी मंदिरात सोयी-सुविधांची पाहणी करताना
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला माता खीर भवानी मंदिरात सोयी-सुविधांची पाहणी करताना

 

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गांदरबल जिल्ह्यातील तुलमुल्ला येथे असलेल्या ऐतिहासिक आणि पवित्र माता खीर भवानी मंदिराला भेट दिली. मंदिरात पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण विधीवत पूजा-अर्चना केली आणि परंपरेनुसार माता खीर भवानीला जल अर्पण केले. या विशेष प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरमधील जनतेची खुशहाली, सुख-समृद्धी, शांतता आणि परस्परांमधील सामाजिक सौहार्दासाठी विशेष प्रार्थना केली.

काश्मिरी संस्कृती 
माता खीर भवानीचे हे मंदिर केवळ कश्मीरी पंडित समुदायाच्या अथांग श्रद्धेचे केंद्र नाही, तर ते काश्मीर खोऱ्यातील शतकानुशतके जुनी कश्मीरियत आणि धार्मिक सलोख्याचे एक मोठे उत्तम उदाहरण मानले जाते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली होती. 

मंदिराचे पुजारी आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून त्यांना माता खीर भवानीची चुनरी आणि प्रसाद भेट दिला. उमर अब्दुल्ला यांनी या दरम्यान तिथे उपस्थित असलेले स्थानिक नागरिक आणि भाविकांशी संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली.

खीर भवानी उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी
मंदिराच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले की, ठजून महिन्यात मेला खीर भवानी हा अत्यंत शुभ आणि मोठा उत्सव असतो. या उत्सवासाठी केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून भाविक माता खीर भवानीचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी काश्मीरमध्ये एकत्र येतात. मी या मतदारसंघाचा आमदार आणि राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने येथील प्रशासकीय व्यवस्थांची पाहणी करण्यासाठी आलो आहे. उत्सवासाठी प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आली आहे आणि अजून कोणत्या गोष्टी करणे बाकी आहे, याचा आढावा मी घेतला आहे.ठ

येथील पुजाऱ्यांशी आणि स्थानिक लोकांशी संवाद साधल्यानंतर २ ते ३ महत्त्वाच्या गरजा समोर आल्या आहेत. आगामी २२ जूनपूर्वी या सर्व पायाभूत सुविधा आणि राहिलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दिली आहे. जेणेकरून देशभरातून येणाऱ्या भाविकांना दर्शनात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.