नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशातील तरुणांना व्यसनाधिनतेविरुद्ध शपथ घेण्याचे आवाहन केले. अमली पदार्थांमुळे काही क्षण आनंद मिळत असला तरी संपूर्ण आयुष्य आणि करिअर उद्ध्वस्त होते, असे सांगत पंतप्रधानांनी 'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान' या राष्ट्रव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला. मोठ्या संख्येने उपस्थित जेन-झेड (Gen-Z) तरुणांच्या उपस्थितीत त्यांनी या मोहिमेची सुरुवात केली.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाचे शत्रू देश तरुणांना लक्ष्य करण्यासाठी अमली पदार्थांच्या पुरवठ्याचा वापर करतात, कारण त्यांना माहीत आहे की तरुण हेच आपल्या देशाचे भविष्य आहेत. ड्रग्जमुळे काही वेळ आनंद मिळू शकतो, परंतु त्यामुळे संपूर्ण करिअर आणि वैयक्तिक आयुष्य धोक्यात येते. जे तरुण व्यसनातून बाहेर पडतात, ते खरे योद्धे आहेत आणि समाजाने त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ही मोहीम केवळ व्यक्ती किंवा कुटुंबासाठी नसून संपूर्ण राष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. पुढील १०० आठवडे ही मोहीम चालणार असून दर रविवारी खेळ, कला, संस्कृती, योग आणि ध्यानाशी संबंधित विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच, देशात अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. कुटुंबांनीही सामाजिक प्रतिष्ठेपोटी मुलांचे व्यसन लपवू नये, तर वेळीच वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.