ऐतिहासिक पन्हाळगडावर मुसळधार पावसाच्या सरी, थंडगार वारा अंगावर घेत भक्तिमय व भावपूर्ण वातावरणात नगारा व ताशाच्या कडकडाटात, प्रसादाचे वाटप करत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरमची सांगता केली. यावेळी पीरपंजांना निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
आषाढी एकादशी व मोहरम एकाच दिवशी आल्याने सकाळपासून विठ्ठल भक्तीत रमलेल्या हिंदू बांधवांनी दुपार होताच पीरपंजांना निरोप देण्यासाठी उपस्थिती लावली. त्यामुळे पन्हाळगडावरील हिंदू-मुस्लिम ऐक्य अधोरेखित झाले. शनिवारी खत्तल रात्र साजरी केली. आज दफन विधीचा कार्यक्रम झाला. यामध्ये प्रथम हैदर मशीद येथे दुपारी तीन वाजता मोहरम विधी झाला. यानंतर ४.४० वाजता बाराईमाम येथे मोहरम विधी केला.
यावेळी पन्हाळगडावरील सर्व पंजे उपस्थित होते. त्यानंतर हजरत पीर शहादुद्दीन खत्तालवली दर्गा येथे मोहरम विधी झाला. यानंतर मोहरमची सांगता होऊन पीरपंजांचे विसर्जन केले. प्रसादाचे वाटप केले. यावर्षी मोहरम रविवारी सुटीदिवशी आल्याने पन्हाळगडावर पर्यटकांबरोबरच भाविकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे जकात नाका येथे गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती; पण पन्हाळा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
दर्गा ट्रस्टी अब्दुलसत्तार मुजावर, माजी नगराध्यक्ष असिफ मोकाशी, सद्दाम मुजावर, समीर आगा, शौकत मुजावर, मोहसीन मुजावर, असिफ मुजावर, राहुल गवंडी, माजी पोलिसपाटील भीमराव काशिद आदींनी परिश्रम घेतले. मंगळवारी जियारत विधी होऊन रात्री सात वाजता हजरत पीर शहादुद्दीन दर्गा येथे भंडारा अर्थात महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
पन्हाळ्यासह परिसरातील मंगळवारपेठ, आपटी, सोमवारपेठ, रविवारपेठ, धबधबेवाडी, पावनगड, बुधवारपेठ, रामपूर, तर तालुक्यातील माले, कोडोली, पोखले, मोहरे, हरपवडे, वेतवडे पैकी मुसलमानवाडी, पोहाळवाडी, कोतोली, कळे आदी ठिकाणी मोहरमची सांगता केली.