स्वातंत्र्यलढ्यातील प्रगतिशील शायर: ज्यांच्या शब्दांनी पेटवली क्रांतीची ज्योत

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 d ago
स्वातंत्र्यलढ्यातील प्रगतिशील शायर
स्वातंत्र्यलढ्यातील प्रगतिशील शायर

 

 जाहिद खान

प्रगतिशील चळवळीतून पुढे आलेल्या सर्व प्रगतिशील शायरांचे स्वप्न भारताचे स्वातंत्र्य हेच होते. १९४२ ते १९४७ हा काळ प्रगतिशील चळवळीचा सुवर्णकाळ होता. ही चळवळ हळूहळू देशाच्या सर्व भाषांमध्ये पसरत गेली आणि प्रत्येक भाषेत एका नवीन सांस्कृतिक आंदोलनाने जन्म घेतला.

या आंदोलनांचे अंतिम ध्येय देशाचे स्वातंत्र्य हेच होते. या आंदोलनाने जिथे धार्मिक अंधश्रद्धा, जातिवाद आणि सर्व प्रकारच्या धर्मांधता व सरंजामशाहीला विरोध केला, तिथेच साम्राज्यवादी शत्रूंनाही जोरदार टक्कर दिली.

फैज अहमद फैज, मखदूम मोहिउद्दीन, अली सरदार जाफरी आणि वामिक जौनपुरी यांसारखे प्रसिद्ध शायर प्रगतिशील चळवळीचे सहकारी होते. फैज अहमद फैज यांनी आपल्या लेखणीतून देशवासियांना वेळोवेळी एका निर्णायक युद्धासाठी आवाहन केले. ‘शीशों का मसीहा कोई नहीं’ या शीर्षकाच्या कवितेत ते म्हणतात, 

‘‘सब सागर शीशे लालो-गुहर, इस बाजी में बद जाते हैं
उठो, सब खाली हाथों को इस रन से बुलावे आते हैं।’’

फैज यांच्या अशाच एका दुसऱ्या गझलमधील शेर आहे, 

‘‘लेकिन अब जुल्म की मियाद के दिन थोड़े हैं
इक जरा सब्र कि फ़रियाद के दिन थोड़े हैं।’’

लाखो लोकांच्या बलिदानानंतर अखेरीस तो दिवसही आला जेव्हा देश स्वतंत्र झाला. पण हे स्वातंत्र्य आपल्याला फाळणीच्या रूपात मिळाले. देश दोन भागांत विभागला गेला, भारत आणि पाकिस्तान! फाळणीपूर्वी झालेल्या जातीय हिंसेने संपूर्ण देशाला होरपळून काढले होते. 

रक्तरंजित आणि जळणारी शहरे पाहून फैज यांनी ‘सुबह-ए-आज़ादी’ या नावाने एक कविता लिहिली. या कवितेत फाळणीचे दुःख ज्या प्रकारे व्यक्त झाले आहे, तसे उर्दू साहित्यात दुसरीकडे मिळणे जवळजवळ अशक्य आहे.

ये दाग-दाग उजाला, ये शबग़जीदा सहर
वो इंतिज़ार था जिसका, ये वो सहर तो नहीं।

(अर्थ: हा दागाळलेला प्रकाश, ही अंधारगिळित पहाट...
सकाळची आम्ही वाट पाहत होतो, ती ही सकाळ नक्कीच नाही.)

मखदूम मोहिउद्दीन

कष्टकऱ्यांचे आवडते, क्रांतिकारी शायर मखदूम मोहिउद्दीन यांची गणना देशातील त्या व्यक्तिमत्त्वांमध्ये होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेचा लढा लढण्यात घालवले. लाल झेंड्याखाली त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्याच्या चळवळीदरम्यान त्यांनी केवळ साम्राज्यवादी इंग्रज सरकारलाच टक्कर दिली नाही, तर जनतेला सरंजामशाहीविरोधातही जागृत केले.

मखदूम यांच्या राष्ट्रीय कवितांना तोड नव्हती. सभांमध्ये जेव्हा त्यांच्या कविता कोरसच्या रूपात गायल्या जात, तेव्हा एक वेगळेच वातावरण निर्माण होत असे. हजारो लोक आंदोलित होत असत. त्यांच्या ‘आज़ादी-ए-वतन’ आणि ‘ये जंग है, जंग-ए-आज़ादी के लिए’ या कवितांनी त्यांना भारतीय जनतेचा लाडका शायर बनवले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीदरम्यान इंग्रज सरकारला विरोध केल्याच्या गुन्ह्याखाली मखदूम अनेक वेळा तुरुंगातही गेले, पण त्यांचे विचार बदलले नाहीत. त्यांनी केवळ स्वातंत्र्याच्या चळवळीतच भाग घेतला नाही, तर अवामी थियेटरमध्ये (लोकरंगभूमी) मखदूम यांची गीते जोश आणि उत्साहाने गायली जात होती. शेतकरी आणि मजुरांमध्ये जेव्हा क्रांतिकारी मुशायरे होत, तेव्हा मखदूम त्यात आघाडीवर असत.

त्यांच्या लेखणीतून साम्राज्यवादविरोधी 'आझादी-ए-वतन' आणि सरंजामशाहीविरोधी 'हवेली', 'मौत के गीत' यांसारख्या अनेक क्रांतिकारी कविता जन्माला आल्या. जागतिक युद्धाच्या काळात युद्धाचे खरे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या मोजक्याच कविता लिहिल्या गेल्या असतील आणि त्यापैकी निम्म्याहून अधिक मखदूम यांच्या आहेत. ‘सिपाही’ या कवितेत ते युद्धावर टीका करताना लिहितात:

कितने सहमे हुए हैं नज़ारे
कैसे डर-डर के चलते हैं तारे

क्या जवानी का ख़ूं हो रहा है
सूखे हैं आंचलों के किनारे

जाने वाले सिपाही से पूछो
वो कहां जा रहा है ?’’

(अर्थ: ही दृश्ये किती घाबरलेली आहेत, तारे किती भीत-भीत चालत आहेत. तरुणाईचे रक्त का सांडत आहे, पदरांचे काठ सुकले आहेत. जाणाऱ्या सैनिकाला विचारा, तो कुठे चालला आहे?)

अली सरदार जाफरी

अली सरदार जाफरी एक जोशीले लेखक आणि क्रांतिकारी शायर होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ते आपल्या बंडखोर वृत्तीमुळे आणि क्रांतिकारी विचारांमुळे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये लवकरच लोकप्रिय झाले. अभ्यासापेक्षा त्यांचे मन स्वातंत्र्याच्या आंदोलनात अधिक लागत असे.

एकदा जेव्हा विद्यापीठात व्हॉईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आले, तेव्हा त्यांनी त्यांच्या विरोधात संप पुकारला. या आरोपाखाली अली सरदार जाफरी यांना विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. इंग्रज सरकारविरोधातील आंदोलन आणि साम्राज्यवादविरोधी कवितांमुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगात जावे लागले.

त्यांच्या अनेक उत्कृष्ट कविता तुरुंगाच्या गजाआड लिहिल्या गेल्या आहेत. ‘बग़ावत’, ‘अहद-ए-हाज़िर’, ‘सामराजी लड़ाई’, ‘इंक़लाब-ए-रूस’ इत्यादी कवितांमधून त्यांनी आपल्या काळातील मोठ्या प्रश्नांना वाचा फोडली. बंगालमध्ये जेव्हा भीषण दुष्काळ पडला, तेव्हा त्यांनी लिहिले, ‘‘चंद टुकड़ों के लिए झांसी की रानी बिक गई...खित्ता-ए-बंगाल है या एक कब्रिस्तान है।’’

देशाचे स्वातंत्र्य फाळणी घेऊन आले. तमाम प्रगतिशील शायरांप्रमाणे अली सरदार जाफरी सुद्धा या फाळणीच्या विरोधात होते. ‘आंसुओं के चराग’ या कवितेत ते आपल्या भावना अशा प्रकारे मांडतात:

"ये कौन जालिम है जिसने क़ानून के दहकते हुए क़लम से
वतन के सीने पै ख़ून-ए -नाहक़ की एक गहरी लकीर खींची।"

(अर्थ: हा कोणता जुलमी आहे ज्याने कायद्याच्या जळत्या लेखणीने, देशाच्या छातीवर रक्ताची एक खोल रेषा ओढली आहे.)

वामिक जौनपुरी

‘‘भूका है बंगाल रे साथी, भूका है बंगाल’’ ही ती कविता आहे, ज्यामुळे शायर वामिक जौनपुरी यांची कीर्ती संपूर्ण देशात पसरली. या कवितेची पार्श्वभूमी १९४३ मध्ये बंगालमध्ये पडलेला भीषण दुष्काळ आहे, ज्यात सुमारे तीस लाख लोक भुकेने मरण पावले होते.

हे तेव्हा घडले, जेव्हा देशात धान्याची कोणतीही कमतरता नव्हती; गोदामे भरलेली होती. एकीकडे लोक भुकेने तडफडून मरत होते, तर दुसरीकडे इंग्रज सरकार दुर्लक्ष करत होते. बंगालच्या याच अमानवीय परिस्थितीचे चित्रण ‘भूका है बंगाल’ या कवितेत आहे.

इप्टाच्या (IPTA) कलाकारांनी या कवितेला चाल लावून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. या कवितेने लाखो लोकांच्या मनात देशभक्ती आणि एकतेची भावना जागृत केली. हे गीत गाऊन बंगाल रिलीफ फंडासाठी हजारो रुपये आणि धान्य गोळा केले गेले, ज्यामुळे लाखो देशबांधवांचे प्राण वाचले.