छत्रपती शिवरायांच्या जीवनपटांना मिळणार वाढीव अनुदान - मुंनगंटीवार

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
मराठी चित्रपटांना प्रोत्साहन
मराठी चित्रपटांना प्रोत्साहन

 

मुंबई: राज्यात मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी चित्रपट निर्मितीनंतर दोन वर्षांच्या आत प्रस्ताव सादर करणाऱ्या मराठी चित्रपटांना तीन महिन्यांत शासकीय अनुदान दिले जाईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील किंवा अन्य विषयावरील प्रेरणादायी चित्रपटांसाठी एक कोटी रुपयांचे जास्तीचे अनुदान देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी विधानपरिषदेत जाहीर केले.
 

 
राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांसाठी नामांकन केल्या जाणाऱ्या चित्रपटांसाठी दुप्पट अनुदान देण्यात येणार आहे, असेही मुनगंटीवार यांनी जाहीर केले. शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मराठी चित्रपटांना देण्यात येणाऱ्या अनुदानाबाबत प्रश्‍न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी मराठी चित्रपटांसाठी प्रस्तावित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. मराठी चित्रपटांचा प्रसार होण्यासाठी तालुका पातळीवर चित्रपटगृह उभारण्यासाठी सरकार अनुदान देऊन काही प्रयत्न करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी तालुका पातळीवर चित्रपटगृहे उभारण्याबरोबरच ओटीटी व्यासपीठावर मराठी चित्रपटांना अधिक स्थान मिळावे यासाठी समिती निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रपटांचे अनुदान देण्याबाबत अनियमितता आणि ओळखीच्या व्यक्तींना अनुदान तातडीने दिले जाते याबाबत सचिन अहीर यांनी प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना तीन महिन्यांच्या आत अनुदान दिले जात असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

अनुदानासाठी एकही चित्रपट पात्र ठरला
अनुदानासाठी २०२१ मध्ये १७८ चित्रपट आले, मात्र त्यांपैकी एकाही चित्रपटाचे परीक्षण झाले नाही. पर्यायाने अनुदानासाठी एकही चित्रपट पात्र ठरला नाही. हीच परिस्थिती २०२२ मध्ये होती. २१४ चित्रपट परीक्षणासाठी समितीकडे पडून आहेत. त्यापैकी एकाचेही परीक्षण झाले नाही. मात्र सध्या हे काम वेगाने सुरु असल्याचे, मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.