सुफी हा माझ्या संगीताचा मूळ गाभा - रब्बी शेरगील

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 5 Months ago
गायक आणि संगीतकार रब्बी शेरगिल
गायक आणि संगीतकार रब्बी शेरगिल

 

१६ एप्रिल १९७३ रोजी जन्मलेला गुरप्रित सिंह शेरगील यांना गायन आणि संगीत यांची विशेष आवड. विशेषतः सुफी संगीताची. २००४ मध्ये 'रब्बी' या आपल्या पहिल्याच म्युझिक अलबममुळे ते प्रकाशझोतात आले. या अलबमसाठी 'बुल्ला की जाणा मै कौन?' ही बाबा बुल्लेहशाह या सुफी संतांची कविता त्यांनी गायली. हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्याने आणि अलबमने विक्रीचे अनेक विक्रम मोडले. यानंतर ते रब्बी शेरगील याच नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे त्यांनी काही हिंदी चित्रपटांना संगीतही दिले. मात्र सुफी गायक अशीच त्यांची ओळख बनली. काही काळापूर्वी ते पुण्यात आले असता त्यांच्या सांगीतिक प्रेरणा आणि आवड यांविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद... 
 

 
प्रश्न. संगीत क्षेत्रातील आजवरच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?
- माझे ‘बुल्लाह की जाना मैं कौन’ हे गाणे जवळपास वीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते. त्यानंतरच्या माझ्या प्रवासाकडे वळून बघताना निश्चितच आनंद वाटतो. या प्रवासात अनेक खाचखळगे आले, पण माझ्या अंतरात्म्याने ठरवलेल्या मार्गावरून मी भरकटलो नाही हे निश्चित.

उत्तम संगीत आणि उत्तम आरोग्य, हे परस्परावलंबी आहेत, असे मला वाटते. कारण उत्तम आरोग्य हे उत्तम संगीत निर्माण करू शकते आणि उत्तम संगीतातूनच उत्तम आरोग्य मिळते. संगीत हा विविध समाजघटकांना एकत्र बांधून ठेवणारा धागा आहे. लोक ज्या प्रकारचे संगीत ऐकतात, त्या प्रकारचा एकात्मतेचा धागा त्यांच्यात विणला जातो.  

प्रश्न. सुफी संगीताबद्दल काय सांगाल?
- सुफी हा माझ्या संगीताचा मूळ गाभा आहे. रॉक संगीत आणि सुफी संगीत, असा मिलाफ करणाऱ्या काही मोजक्या कलाकारांपैकी मी एक आहे. रसिकांना ही गोष्ट सर्वाधिक भावली. मी सुफी संगीत लोकांना आवडेल म्हणून गायले नाही. सुफी संगीत हे माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचे आहे, त्यामुळे मी ते गात राहिलो. रसिकांना कदाचित त्यातील मनापासून केली जाणारी प्रार्थना भावली असेल.के. जे. सिंग यांच्या अस्सल निर्मितीचाही माझ्या यशात खूप मोठा वाटा आहे, मी आवर्जून नमूद करू इच्छितो.

प्रश्न. सध्या पंजाबमध्ये ज्या प्रकारचे संगीत ऐकायला मिळते आहे, त्यापेक्षा तुमचे संगीत अगदी वेगळे आहे. असे का?
- मी दिल्लीत जन्मलो आणि तेथेच लहानाचा मोठा झालो. त्याचा परिणाम म्हणून माझे संगीत नेहमीच वेगळे होते. शिवाय दिल्लीपासून पंजाब दूर असल्यामुळे मी पंजाबच्या समकालीन संगीतापेक्षा कालातीत संगीताच्या अधिक जवळ जाऊ शकलो. तसेच, मी कायमच माझ्या कलात्मक धारणांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला. त्या धारणांमधून निर्मिलेल्या कलाकृती प्रामाणिकपणे सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच मी कालसुसंगत राहू शकलो असेल, असे मी अत्यंत नम्रपणे कबूल करतो.

प्रश्न. चांगले आणि प्रसिद्ध कलाकार असल्यामुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे ओघाने आलेच. अशावेळी त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो का, किंबहुना यात तुम्ही समतोल कसा साधता?
- तुम्ही याबाबत समतोल साधू शकता, असे मला वाटत नाही. तुम्ही फार तर अधिकाधिक कार्यशील राहण्याचा प्रयत्न करू शकता. उलट अतिरिक्त समतोल साधण्याचा प्रयत्न हा तुमच्या कलात्मक प्रेरणांमध्ये बाधा आणू शकतो. त्यामुळे मी फक्त पारंपरिक भारतीय राहणीमानांच्या पद्धतींचा अधिकाधिक अवलंब करण्याचा प्रयत्न मी करतो.

प्रश्न. काळ बदलतो आहे, तशी लोकांची आवडनिवड देखील बदलते आहे. या बदलांशी जुळवून घेण्यासाठी एखाद्या कलाकाराने स्वतःला नवनव्या रूपात आणणे किती महत्त्वाचे आहे?
- पॉप संगीतात कदाचित दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी सतत बदल करीत राहणे महत्त्वाचे असेल. पण इतर ठिकाणी ते गरजेचे नाही, असे मला वाटते. मी ज्या व्यक्तींना आदर्श मानतो, त्यांनी कधीही स्वतःला नव्या रूपात आणण्याबाबत विचार केला नाही आणि तरीही त्यांनी माझ्यासारख्या अनेकांना काय समृद्ध केले आहे.

प्रश्न. संगीतसृष्टीतील बदलांसंदर्भात तुमचे मत काय आहे?
- संगीतसृष्टीला अद्याप खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कॉर्पोरेट प्रकाशनांपासून स्व-प्रकाशनांपर्यंत येणे हा त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. स्व-प्रसिद्धीला अद्याप मर्यादा असल्या, तरी त्यात अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी घडताना दिसत आहेत. स्व-प्रकाशनांमुळे आमच्यातील काही अडथळे समोर आले असले, तरी त्याला मिळणारी मान्यताही वाढते आहे. उदा. निर्मात्याचा फिल्टर लागल्याने टीव्ही, रेडिओवर कोणतेही आक्षेपार्ह मजकूर प्रदर्शित होत नाही, मात्र थेट सोशल मीडियावर गाणी प्रदर्शित झाल्यास काही अप्रिय गोष्टी घडण्याची भीती असते.

(शब्दांकन - महिमा ठोंबरे)
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter