सूफी संगीत लोकांना जोडण्याचं काम करते - मुख्तियार अली

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
मीर मुख्तियार अली.
मीर मुख्तियार अली.

 

मुख्तियार अली हे देशातील प्रसिद्ध सूफी गायकांपैकी एक आहेत. मुख्तियार अली मूळचे राजस्थानमधील बिकानेरचे आहेत. ते मिरासी समाजाचे आहेत. त्यांच्या घरात ८०० वर्षांपासून गाण्याची परंपराअव्याहतपणे सुरू आहे. कबीर, बुल्लेशाह आणि मीरा यांचे काव्य गाण्यासाठी ते देशात आणि जगात प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे त्यांची लोकप्रियता दक्षिण भारतात अधिक आहे. मुख्तियार अली काही काळापूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्याशी सुफी संगीतावर झालेली चर्चा.
 

 
प्रश्न. सूफी संगीताबाबतचा तुमचा दृष्टिकोन काय आहे?
- संगीत कोणत्याही प्रकारचं असो, ते लोकांना जोडण्याचं काम करतं. मात्र, सूफीसारख्या लोकसंगीताचं वैशिष्ट्य म्हणजे लोकांची मनं जोडणं, यावर भर दिला असतो. आपल्या गाण्यातून, संगीतातून लोकांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची, आत्मीयतेची भावना कशी निर्माण होईल, याची शिकवण आम्हाला दिली जाते. संतांनी आपल्याला हेच शिकवलं आहे आणि तेच संगीताच्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो.

काही शतकांची परंपरा असलेल्या सूफी संगीताचं अनेकांना आकर्षण आहे. हिंदी चित्रपटांमध्येही या संगीताचा, गाण्यांचा खुबीनं वापर केलेला आहे. परंपरा जपण्यातच खरा आनंद असतो. आपण सर्व एक आहोत, हीच शिकवण या संतांनी दिली आहे. परंपरेनं मला दिलं आहे, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकलो, तरच समाधान वाटेल.

प्रश्न. संत कबीरांवर तुमचं विशेष प्रेम आहे.
- संत कबीरांनी आपल्या आयुष्यात कधी तडजोड केली नाही. लोकांना एखादा संदेश देणं आवश्यक आहे, असं वाटल्यावर त्यांनी तो संदेश अत्यंत स्पष्टपणे दिला. असं करताना त्यांना कोणत्याही प्रकारचं भय वाटलं नाही. त्यामुळेच मी कबीरांना मानतो.

प्रश्न. चित्रपटांसाठी काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता?
- काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘हद-अनहद’ या चित्रपटात मी सूफी संगीताबाबत बोललो होतो. कॅमेऱ्यासमोर आम्ही लोककलाकाराच्या भूमिकेतून मनात असलेलो बोललो. काय बोलतो आहोत, हे नीट समजत नव्हतं.

चित्रपट पूर्ण झाल्यावर तो पाहिल्यावर लक्षात आलं, की आम्ही बोलण्याच्या भरात बरीच मोठी मोठी विधानं केली होती. यामुळं अंतर्मुख झालो. बोललो तसंच वागण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीव झाली. या चित्रपटामुळे देशविदेशात प्रसिद्धी मिळाली.

मात्र, आमच्या लक्षात येत गेलं की, आम्ही तर कबीर, बाबा बुल्लेशाह यांना गाणारे कलाकार आहोत. चित्रपट हे आमचे क्षेत्र नाही. त्यामुळे आम्ही आमच्या अपेक्षा सीमित केल्या, फार मोठी स्वप्नं पाहण्याची गरज आम्हाला उरली नाही.

चित्रपटांसाठी काम करणं, हा एक वेगळाच अनुभव आहे. मी ‘फाईंडिंग फॅनी’ आणि इतर काही चित्रपटांसाठी काम केलं आहे. परंतु, हा माझा मार्ग नाही, हे मला समजलं आहे. मला माझी २६ पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा सांभाळायची आहे.

मी बॉलिवूडमध्ये गेलो, तर ही परंपरा कोण सांभाळणार? मला परंपरेनं दिलं आहे, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकलो, तरच समाधान वाटेल. त्यामुळे केवळ सूफी गाणी गाण्याचाच माझा निर्णय आहे. कबीर, बाबा फरीद यांच्यासारख्या संतांची वाणी गायची असेल, तरच मी चित्रपटांसाठी गाणे म्हणेन, नाहीतर नाही.

प्रश्न. फ्रेंच संगीतकार मॅथियस डुप्लेसी यांच्याबरोबरही तुम्ही काम केलं आहे. पाश्चिमात्य संगीत आणि आपलं संगीत यात काय फरक जाणवतो?
- डुप्लेसी यांच्याबरोबर मी ‘फाईंडिंग फॅनी’साठी आणि नंतरही एक अल्बमसाठी काम केलं आहे. लोकांना हे खूप आवडलं, परंतु मला आपलं संगीत अधिक पक्कं असल्याचं जाणवलं. आपल्याकडील संगीताला शास्त्रीय आधार आहे. सूफी हेदेखील शास्त्रीय असल्याचं मी मानतो. जास्तीत जास्त लोकांना आवडलं पाहिजे, कार्यक्रमाला भरपूर लोक आले पाहिजेत, हा पाश्चिमात्य संगीताचा उद्देश असतो. आपलं संगीत शांती देणारं असतं. ते आपल्याला देवाशी जोडतं.

प्रश्न. तुमचा मुलगा तुमच्याकडून शिकतोय का?
- हो, मी जे माझ्या वडिलांकडून शिकलो, तेच त्याला शिकवतो. मात्र, दोघांच्या शिकण्यात फार फरक आहे. मुलाला वाटतं, की आपलं जुनं गाणं आता कोणी ऐकत नाही. त्याला व्यावसायिक गायक व्हायचं आहे. मी मात्र गाण्यातून जीवनाचा आनंद लुटला. त्याच्या नशिबात असेल तर, त्यालाही तसा आनंद घेता येईल.

तुम्ही अजूनही राजस्थानात मूळ गावी राहता. मोठ्या शहरात येऊन राहावं, असं नाही वाटत का?
गावात जी मजा आहे, ती दुसरीकडं नाही. मी ज्यांच्याबरोबर वाढलो, शिकलो; त्यांच्याबरोबर राहण्यातच मला आनंद वाटतो. शहरात राहणं माझ्या स्वभावाला झेपत नाही. शिवाय मी इतका मोठा माणूसही नाही.

प्रश्न. सूफी संगीत कलेसमोर कोणती आव्हानं असल्याचं तुम्हाला दिसतं?
- सूफी संगीत लोकांना आवडत असलं आणि त्यामध्ये ताकद असली, तरी हे संगीत मूळ स्वरूपात टिकवून ठेवणं अवघड होत चाललं आहे. संगीतात प्रचंड वेगानं बदल होत आहेत, लोकांच्या आवडीनुसार बदल करावे लागत आहेत.

मात्र, सूफीमध्ये लोकांच्या आवडीनुसार बदल करता येत नाहीत. हे संगीत ऐकणारे लोक कमी झाले आहेत. सूफी संगीताला वेगानं लोकप्रिय करायचं, तर पाश्चिमात्य संगीताचा, वाद्यांचा आधार घेता येईल; परंतु मग हे संगीत आमचं राहणार नाही.

(शब्दांकन : सारंग खानापूरकर) 
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

 

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter