ख्रिश्चन धर्मियांच्या ४० दिवसीय उपवासांना आजपासून सुरुवात

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गुड फ्रायडेच्या ४० दिवस अगोदर येतो तो दिवस 'अॅश वेन्स्डे' (राखेचा बुधवार) म्हणून ओळखला जातो. या दिवसापासून ख्रिश्चन धर्मीयांच्या ४० दिवसांच्या उपवासाला सुरूवात होते. यानिमित्त रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट पंथीय नागरिकांच्या घरोघरी तसेच चर्चमध्येही बुधवार (ता. १४) पासून ४० दिवस कानावर पडतील ती बायबलमधील वचने, प्रभू येशूचा उपदेश आणि विशेष प्रार्थनेचे स्वर!

ख्रिश्चन धर्मीय नागरिक राखेच्या बुधवारपासून उपवासाला सुरूवात करतात. पूर्वी पश्चातापाचे परिमार्जन करण्यासाठी यहुदी नागरिक अंगाला राख फासून घेत असे. तेव्हापासून उपवास सुरू होणाऱ्या पहिल्या बुधवारला किंवा ईस्टर संडेच्या ४० दिवस आधी येणाऱ्या बुधवारला 'राखेचा बुधवार' असे म्हणतात. या ४० दिवसांत कोणतेही धार्मिक कार्य अथवा उत्सव करण्यात येत नाही तर, प्रभू येशूची प्रार्थना करण्यासाठी खिश्चनधर्मीय नागरिक चर्चमध्ये सकाळ, संध्याकाळ एकत्र जमतात.

याबाबत बिशप ॲन्ड्रयु राठोड म्हणाले, "प्रभू येशूनेही ४० दिवस आणि रात्री उपवास केला होता. त्यामुळे सर्वत्र या कालावधीत उपवास केले जातात.” 'द युनायटेड चर्च ऑफ द खाईस्ट'चे (पिंपरी) रेव्ह सुधीर पारकर म्हणाले, "या दिवसांत उपवास करून नागरिक प्रभू येशूची प्रार्थना करतात. काही चर्चमध्ये सकाळी तर काही चर्चमध्ये दोन्ही वेळेस प्रार्थना होते. एखाद्या संकल्पाच्या पूर्तीसाठी किंवा झालेली चूक सुधारण्यासाठी काही नागरिक निरंकार उपवास करतात तर काहीजण रविवारी उपवास सोडतात." 

गुरुवार पेठेतील चर्च ऑफ द होली नेमचे सभासद सुधीर चांदेकर म्हणाले, "ख्रिस्ती बांधव या काळात प्रार्थना, नमन, चिंतन करतात. नम्रता व वागणुकीत प्रेम नसेल तर केलेला उपवास काही कामाचा नसतो, त्यामुळे आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपवास केला पाहिजे."