नव्या संसदेतून नवा भारत घडेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून अवघा देश ज्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत होता अखेर तो क्षण आला, वेद मंत्रांच्या उच्चारात विविध धर्मगुरूंच्या साक्षीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देशाला नवी संसद मिळाली.

नवे लक्ष्य, नवे रस्ते, नवे विचार, नवी दृष्टी व नवा विश्वास मनात घेऊन विकसित व श्रेष्ठ भारताची निर्मिती करण्यासाठी नवे संसदभवन ऊर्जास्रोत ठरेल. नव्या संसदेतून नवा भारत घडेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या हस्तेच आज नव्या वास्तूचे एका शानदार सोहळ्यात उद्‍घाटन झाले. यावेळी लोकसभाअध्यक्ष ओम बिर्ला व राज्यसभेचे उपसभापती हरीवंश व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसदभवनाची गरज, भविष्यातील भारताची वाटचाल व समृद्ध वारसा जपण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. जवळपास ४० मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले, हा ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस लोकशाहीला मिळालेली एक भेट आहे. त्यांची नोंद इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने होईल.

देशातील १४० कोटी जनतेच्या स्वप्नांचे प्रतिबिंब या संसदभवनातून पाहायला मिळेल. गेल्या दीड दशकांपासून नवे संसद भवन बांधण्यावर विचार सुरू होता. एका दृढ संकल्पातून ही वास्तू साकार झाली आहे. ही वास्तू आत्मनिर्भर भारताची साक्षीदार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व जग भारताकडे एका आशेने पाहत असल्याचे सांगून ते म्हणाले, ‘‘आता आपण एका विशिष्ट टप्प्यावर आलो आहोत. शंभर वर्षांपूर्वी याच काळात महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढा लढण्यात आला. त्यातून अनेक देशांनी प्रेरणा घेतली. आज पुन्हा १०० वर्षांनी जग भारताकडे त्याच दृष्टीने पाहत आहे. भारत जागतिक लोकशाहीचा आधार झाला आहे. भारताची राज्यघटना हा संकल्प आहे. त्याचे प्रतिनिधित्व या नव्या संसदभवनात होणार आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येक भारतीयांना चालत राहावे लागणार आहे. ही या अमृतकाळाची गरज आहे यातूनच देशाचे अनंत स्वप्न साकार होणार आहे. या भूमीत नवे प्राण फुंकण्याचे काम या संसद भवनातून होणार आहे.’’

नवी संसद सृजनाचा आधार
गेल्या नऊ वर्षांच्या प्रयत्नानंतर ही ऐतिहासिक वास्तू उभी राहिली याचा आनंद मला आहेच परंतु त्याहीपेक्षा अधिक आनंद ४ कोटी लोकांना घरकुल दिल्याचा आहे. ११ कोटी घरांना शौचालय दिल्याचा, ४ लाख रस्ते बांधण्याचा आनंद मला अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. आपण २५ वर्षांनी स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू तेव्हा एक समर्थ भारत निर्माण झालेला जगाला दिसणे आवश्यक आहे. यासाठी या यज्ञात सर्वांनी प्रयत्नांची समीधा टाकण्याची गरज आहे यासाठी नवे संसदभवन हे एका सृजनाचा आधार होईल, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या संदेशाचे वाचन
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचेही यावेळी भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांनी केले. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या संदेशाचे वाचन केले. यानंतर संसदेचे नवनिर्मित भवन व सेंगोल या दोन लघुचित्रफिती दाखविण्यात आल्या. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त डाक तिकीट व ७५ रुपयांचे नाण्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झाले.

या ऐतिहासिक सोहळ्याला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी,

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आसामचे मुख्यमंत्री हिमांता विश्व सरमा, हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना, मनोज सिन्हा हे उपस्थित होते. हवाई दल, नौदलाच्या प्रमुखांसह व लष्करप्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थीही यावेळी उपस्थित होते. 

संसद ही लोकांचा आवाज असते, पंतप्रधान संसदभवनाच्या उद्‍घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत.
- राहुल गांधी, काँग्रेसचे नेते

आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली. पण आपण पुन्हा एकदा देशाला काही वर्षे पाठीमागे घेऊन जातोय की काय? अशी चिंता वाटायला लागली आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही, नेहरूंनी विज्ञानावर आधारित समाज तयार करण्याची संकल्पना मांडली. आज तिथे जे चाललेय, ते याच्या एकदम उलटे आहे.
- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

‘सेंगोल’ (राजदंड) हा पारदर्शक प्रशासनाचे प्रतीक आहे तर त्याविरुद्ध ‘कोदुंगोल’ हे एकाधिकारशाहीचे चिन्ह आहे. मोदी ‘सेंगोल’बद्दल बोलतात परंतु ‘कोदुंगोल’सारखे वागतात.
- सीताराम येचुरी, सरचिटणीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष