अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग कार्यक्रमासह, २०१८ ते २०२५ या काळात दोन लाखांहून अधिक भारतीय निर्यातदारांना एकूण २० अब्ज डॉलर्सची ई-कॉमर्स निर्यात साध्य करण्यास सक्षम केले असल्याचे अॅमेझॉनने जाहीर केले आहे. 'अॅमेझॉन एक्सपोर्ट डायजेस्ट'चे नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अनावरण झाले, त्या वेळी ही माहिती देण्यात आली.
अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग या २०१५ मध्ये सुरू झालेल्या प्रमुख उपक्रमाद्वारे भारतीय निर्यातदारांना जगभरातील कोट्यवधी ग्राहकांना ७५ कोटींहून अधिक 'मेड इन इंडिया' उत्पादने विकण्याची संधी मिळाली असून, गेल्या वर्षभरात विक्रेत्यांची संख्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.
महाराष्ट्राची आघाडी
अॅमेझॉन ग्लोबल सेलिंगमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतील २२,००० हून अधिक निर्यातदारांचा समावेश असून, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, रायगड या शहरांतील निर्यातदारांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे रायगडसारख्या छोट्या शहरांतील निर्यातदारांना २०२४ मध्ये २.२ कोटी डॉलरची विक्री करणे शक्य झाले आहे. देशभरातील २०० हून अधिक शहरांमधील विक्रेत्यांचा यात सहभाग असून, अमेरिका, ब्रिटन, यूएई, सौदी अरेबिया, कॅनडा अशा १८ हून अधिक बाजारपेठांमधील ग्राहकांना आपल्या उत्पादनाची विक्री करण्याची संधी भारतीय विक्रेत्यांना मिळाली आहे.
अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग इंडियाच्या प्रमुख, श्रीनिधी कलवापुडी म्हणाल्या, " वर्ष २०३० पर्यंत ई-कॉमर्स निर्यातीचे ८० अब्ज डॉलरचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. त्याचवेळी तंत्रज्ञानातील नावीन्य, क्षमता विकास आणि परिसंस्थेतील भागीदारीद्वारे ई-कॉमर्स निर्यात सुलभतेवर लक्ष केंद्रित केले आहे.